मुंबई (विशेष प्रतिनिधी) - यवताळ जिल्ह्यातील अरुणावती धरणाच्या पाणथळ क्षेत्रामधून अंशतः अल्बिनो असणाऱ्या छोटा कंठेरी चिखल्या (लिटर रिंग्ड प्लोव्हर) पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे (albino Little Ringed Plover). ज्याला ल्युसिस्टिक असेही म्हणतात (albino Little Ringed Plover). लिटल रिंग्ड प्लोव्हर हा एक लहान आकाराचा पाणथळ प्रदेशात आढळणारा पक्षी असून, तो उन्हाळ्यात द्वीपकल्पीय भारतात जमिनीवर घरटे बांधतो. (albino Little Ringed Plover)
पक्षी अभ्यासक डॉ. राजू कसंबे हे यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील अरुणावती धरणाच्या पाणथळ परिसरात पक्षीनिरीक्षण करत होते. नदीवर नुकत्याच बांधलेल्या या धरणाच्या बॅकवॉटर परिसरात पांढऱ्या रंगाचा छोटा कंठेरी चिखल्या पक्षी दिसला. त्याचा रंग इतर त्याच प्रजातीच्या पक्ष्यांपेक्षा अधिक पांढरट असल्यामुळे तो विशेष लक्ष वेधून घेत होता. त्याचे संपूर्ण पिसांचे आवरण फिकट पांढरे दिसत होते. हा पक्षी इतर पक्ष्यांसोबत एकमेकांचा पाठलाग करताना आणि प्रणय प्रदर्शन करताना त्यांना दिसून आला. सामान्य लिटल रिंग्ड प्लोव्हर पक्ष्याच्या वरच्या पंखांचा रंग एकसारखा वाळूसारखा तपकिरी असतो आणि त्यावर अतिशय अरुंद पांढरी पट्टी असते. त्याची चोच लहान व गडद रंगाची असते. पाय गुलाबी किंवा पिवळसर असतात आणि डोळ्याभोवती आकर्षक पिवळे वर्तुळ असते. शरीराचा वरचा भाग वाळूसारखा तपकिरी, कपाळ पांढरे आणि डोक्यावर तपकिरी टोपीसारखा भाग असतो. काळा डोळ्याभोवतीचा पट्टा, काळा छातीचा भाग, पांढरा गळ्याभोवतीचा पट्टा, पांढरी हनुवटी व घसा आणि खालचा भाग पांढरा असणे ही त्याची प्रमुख ओळख आहे.
या वेगळ्या रंगाच्या प्लोव्हरमध्ये शरीराचा वरचा भाग फिकट क्रीम रंगाचा होता. डोक्यावरील टोपी फिकट होती आणि डोळ्याभोवतीचा पट्टा व कपाळावरील खूण काळ्या ऐवजी गडद तपकिरी रंगाची होती. गळ्यावरील काळा पट्टा अरुंद होता. उडताना त्याचे पंख जवळजवळ पांढरे दिसत होते. डोळ्याभोवतीचे पिवळे वर्तुळ मात्र सामान्य होते. हा पक्षी इतर पक्ष्यांसोबत पाणथळ भागात पूर्णपणे सामान्य वर्तन करताना दिसून आला. कोणत्याही प्रजातीतील अल्बिनो पक्षी दिसणे ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते. अलीकडील काळात पक्षीनिरीक्षकांची संख्या वाढल्यामुळे आणि उत्कृष्ट छायाचित्रण साधने सहज उपलब्ध झाल्यामुळे अशा पक्ष्यांच्या नोंदी वाढत आहेत. अल्बिनिझम किंवा ल्युसिझममुळे पक्ष्यांचे नैसर्गिक छुपे संरक्षण (camouflage) नष्ट होते. त्यामुळे ते भक्षकांसाठी अधिक सहज शिकार बनतात. अशा असामान्य पिसांच्या रंगामुळे पिसांची रचना कमकुवत होणे आणि आयुर्मान कमी होणेही संभवते. अल्बिनो किंवा ल्युसिस्टिक लिटल रिंग्ड प्लोव्हर हा निसर्गातील अत्यंत दुर्मिळ प्रकार आहे. पूर्ण अल्बिनिझममध्ये शरीरातील रंगद्रव्य पूर्णपणे नसते. त्यामुळे पिसे पूर्ण पांढरी, चोच फिकट आणि डोळे गुलाबी दिसतात. परंतु बहुतेक फिकट रंगाचे प्लोव्हर प्रत्यक्षात ल्युसिस्टिक असतात, ज्यामध्ये डोळे, चोच किंवा पायांमध्ये काही प्रमाणात मूळ रंग टिकून राहतो.