काँग्रेसच्या काळातील महागाई जनता अजून विसरलेली नाही -भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात
23-May-2026
Total Views |
मुंबई : (Petrol Price Hike) "राहुल गांधी ज्या चीनचा उदो उदो करतात त्या चीनमध्ये पेट्रोल - डिझेलच्या दरात २५ टक्के वाढ झाली आहे. पाकिस्तानात जवळपास १०० टक्के वाढ झाली आहे. श्रीलंकेत लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. बांगलादेशात काय झाले पहा. भारतात फक्त ४ ते ५ टक्के पेट्रोल दरवाढ झाली आहे. २००४ साली मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा ४० रुपये लिटर असलेले पेट्रोल ते पायउतार झाले तेव्हा ८५ ते ९० रुपये लिटर म्हणजे दुपटीने वाढले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात सर्वसामान्य जनतेची काळजी घेतली जात आहे. महागाईचा काळ काँग्रेसचाच होता, सामान्य माणूस काँग्रेसच्या काळातील महागाई कधीच विसरणार नाही." अशी घणाघाती टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवार दि.२३ रोजी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला देशभरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. त्याच पावलावर पाऊल ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी बुलेटवरून वर्षा बंगला ते विधान भवन असा प्रवास केला आणि आज एका कार्यक्रमासाठी शिर्डीला जाताना ताफा घेऊन किंवा चार्टरने जाणे टाळून ते सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे वंदे भारत एक्स्प्रेसने रवाना झाले. जी वंदे भारत एक्स्प्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात सुरू झाली त्यातून सर्वसामान्य नागरिक सुसाट प्रवास करत आहेत. आज देवाभाऊ त्याच वंदे भारत एक्स्प्रेसने शिर्डीपर्यंत पोहोचत आहेत.
सर्वसामान्यांची काळजी करणे कशाला म्हणतात हे जाणण्यासाठी देवाभाऊंकडे पहा. काँग्रेसने त्यांच्या बुलेट प्रवासावर टीका केली. पण काँग्रेसचा एकतरी नेता ट्रेनने फिरतोय का? काँग्रेसचा एक तरी नेता ताफा कमी करतोय का? काँग्रेसचे नेते सातत्याने उधळपट्टी करतात त्याचवेळी देवाभाऊ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला केवळ उक्तीतून नव्हे तर कृतीतून प्रतिसाद देत आहेत." असेही बन यांनी स्पष्ट केले.(Petrol Price Hike)
"संजय राऊत ज्याप्रमाणे रोज उठून खोटे बोलतात तशी सवय आता रोहित पवारांनाही लागलेली आहे. संजय राऊतांना गुरु करण्याचे काम रोहित पवारांनी केले आहे. मेलोडी चॉकलेट काय आहे हे देशाला माहिती आहे आणि झुरळ काय आहेत हेही माहिती आहे. रोहित पवार, जास्त झुरळ झुरळ करून ओरडू नका.
या झुरळांनी तुमचा पक्षही पोखरून टाकलाय त्याकडे जरा जास्त लक्ष द्या. तुम्हाला तुमच्या मतदारसंघाची काळजी घेता येत नाही आणि मेलडीला कोणी कुरतडू शकत नाही. भारतीय अर्थव्यवस्थाही कुणी कुरतडू शकत नाही. ती हिंमत कुणामध्येही नाही. ज्या जेन झीच्या नावावर आणि जीवावर या महाराष्ट्रात, या देशात अराजकता माजेल, असे वाटते त्या रोहित पवारांनी लक्षात घ्यावे की, हा देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे. झुरळांच्या पाठीशी तो कधीही उभा राहणार नाही."असे बन यांनी ठणकावून सांगितले.(Petrol Price Hike)