मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार;पहिली वॉटर मेट्रो सोमवारी मुंबई बंदरात दाखल होणार; विद्युत बोटींच्या चाचण्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात

Total Views |
Mumbai Water Metro
 
मुंबई : (Mumbai Water Metro) मुंबईकरांना बहुप्रतीक्षित मुंबई वॉटर मेट्रोच्या ताफ्यातील पहिली कॅन्डेला पी 12 ही स्वीडिश इलेकट्रीक बोट सोमवार, दि.२५ मे रोजी मुंबई बंदरात दाखल होणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच मुंबई वॉटर मेट्रो मार्गिका चाचण्यांअंती सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
महाराष्ट्राच्या ८७७ किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण किनारपट्टीला आधुनिक जलवाहतुकीद्वारे जोडण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, मुंबईकरांची प्रतीक्षा आता संपणार आहे. राज्यातील पहिली वॉटर मेट्रो सोमवारी मुंबई बंदरात दाखल होणार असून, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून तिच्या चाचण्यांना सुरुवात होणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवार, दि.२२ मे रोजी दिली.
 
राज्य सरकारकडून किनारी भागात जलवाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, पर्यावरणपूरक आणि वेळेची बचत करणारी करण्यावर भर दिला जात आहे. या अंतर्गत विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी चर्चा सुरू असून, सध्या ३० प्रवाशांची क्षमता असलेल्या विद्युत बोटीची चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच नॉर्वेमधील कंपन्यांशीही ५० आणि १०० प्रवासी क्षमतेच्या आधुनिक बोटींसंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहितीही राणे यांनी दिली.
 
 
रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, खड्डे आणि वेळेचा अपव्यय यांना पर्याय म्हणून जलवाहतूक मुंबईकरांसाठी अधिक सोयीस्कर ठरेल. भविष्यात गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात दिसणाऱ्या पारंपरिक लाकडी बोटींच्या जागी आधुनिक, पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक विद्युत बोटींचे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Mumbai Water Metro)
 
बोट नेमकी कशी असेल ?
 
कॅन्डेला P-12 ही इलेक्ट्रिक प्रपल्शन आणि हायड्रोफॉइल तंत्रज्ञान यांचा संगम असलेली जगातील एक अत्याधुनिक प्रवासी फेरी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही फेरी पाण्याच्या पृष्ठभागावर उडते आहे असा आभास होतो. २५ नॉट्स म्हणजेच (सुमारे ४६ किमी प्रति तास) या वेगाने चालणारी ही नौका केवळ जलद नाही, तर डिझेल फेरीपेक्षा ८०% कमी ऊर्जा वापरते आणि शून्य कार्बन उत्सर्जन करते. त्यामुळे ती पर्यावरणपूरक, शांत आणि टिकाऊ वाहतुकीचे उत्तम उदाहरण ठरते. (Mumbai Water Metro)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.