मुंबई : (MGX2035 Maharashtra) राज्याच्या भविष्यातील विकास आराखड्याला आकार देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकाच व्यासपीठावर एकत्र येत 'एमजीएक्स २०३५ : महाराष्ट्राच्या स्वयंपूर्ण विकासाचा वेध' या कार्यक्रमात शनिवारी विचारमंथन केले.
परळच्या 'आयटीसी ग्रँड सेंट्रल', मुंबई येथे विवेक पार्क फाउंडेशन आणि दैनिक मुंबई तरुण भारत (महाएमटीबी) आयोजित हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे, कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक या मान्यवरांनी भविष्यातील महाराष्ट्राच्या विकासाचे चित्र मांडले.
यावेळी व्यासपीठावर दै. मुंबई तरूण भारतचे संपादक किरण शेलार, विवेक पार्क फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक विक्रम शंकरनारायणन आणि भारतीय विचार दर्शनचे अध्यक्ष सुश्रूत चितळे उपस्थित होते.
यावेळी सुश्रृत चितळे यांनी सांगितले की, "विवेक पार्क फाऊंडेशन हे एक नामांकित संशोधन केंद्र आहे. तर, मुंबई तरूण भारत हे राष्ट्र प्रथम या विचारांवर चालणारे दैनिक आहे. गुन्हेगारी, हिंसा आणि लैंगिकता हे विषय वगळून प्रकाशित होणारे हे दैनिक असल्याने ते इतरांपेक्षा वेगळे ठरते.
याचे सगळे श्रेय किरण शेलार यांना जाते. देशाला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याच्या उद्दिष्टात महाराष्ट्राचा १ ट्रिलियन डॉलरचा वाटा देण्याचा विडा आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उचलला आहे. तसेच लवकरच महाराष्ट्र हे सर्वाधिक गुंतवणूक आणणारे राज्य ठरेल. २०३५ मध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होणार असून त्यावेळी आपण विकसित भारत २०४७ च्या उद्दिष्टात आपला वाटा देणारे राज्य ठरू. या संपूर्ण पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम महत्वाचा ठरतो." (MGX2035 Maharashtra)
एकूण चार सत्रांच्या या कार्यक्रमातील पहिल्या सत्रात मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी 'महाराष्ट्र : जागतिक गुंतवणुकीचे आकर्षण केंद्र' या विषयावर मार्गदर्शन केले. बदलती भूराजकीय स्थिती, एआयमुळे निर्माण झालेली आव्हाने, ग्रीन ट्रान्झिशन याचा एकूणच आगामी काळात राज्याच्या जडणघडणीवर परिणामावर त्यांनी भाष्य केले.
विवेक पार्क फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक विक्रम शंकरनारायणन यांनी त्यांची मुलाखत घेतली. दुसऱ्या सत्रात मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी 'सागरी आणि बंदर पायाभूत विकासाची दूरदृष्टी' या विषयावर मार्गदर्शन करत सागरी क्षेत्रात सर्वोत्तम महाराष्ट्र घडवण्याचे ध्येय मांडले. तसेच वाढवण बंदर, वॉटर मेट्रो, मत्स्यव्यवसाय, क्लस्टर योजना अशा विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले.
तिसऱ्या सत्रात कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी 'कौशल्य विकासातून महाराष्ट्राचा विकास मॉडेल' या विषयावर आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी राज्याचा विकास, घुसखोरी, नवीन शिक्षण पद्धती, एआय आणि रोजगाराच्या नव्या संधी या विषयांना स्पर्श केला. तर, शेवटच्या सत्रात महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी 'ऊर्जावान महाराष्ट्र : प्रत्येक क्षेत्राला बळ देणारी शक्ती' या विषयावर मार्गदर्शन केले. ऊर्जा क्षेत्रातील राज्याचा विकास, बदल आणि भविष्यातील धोरणांवर त्यांनी प्रकाश टाकला.
विवेक पार्क फाऊंडेशनच्या पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर, जम्मू-काश्मीर विभागाच्या प्रमुख रूचिता राणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर, आभारप्रदर्शन दै. मुंबई तरूण भारतचे संपादक किरण शेलार यांनी केले. (MGX2035 Maharashtra)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....