मुंबईतील चाकरमान्यांना परत गावी न्यायचे आहे - नितेश राणे
23-May-2026
Total Views |
मुंबई : (Konkan Development) "मुंबईतील चाकरमान्यांना परत गावी न्यायचे आहे. कोकणात मुंबईच्या धर्तीवर नोकऱ्या आणि पगार असला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू असून पर्यटनसाठी ५ स्टार हॉटेल , संवादाची कनेक्टिव्हिटी सक्षम करणे.गावच्या कष्टाळू आणि होतकरू ,हुशार विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यानंतर गावात राहूनच काम करावे हा हेतू ठेवून कुठलाच प्रकल्प बंद होऊ द्यायचा नाही आहे.
यातून रोजगार संधी निर्माण होऊन रिव्हर्स मायग्रेशन करणे हा उद्देश आहे.कोकणातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणे, पर्यटनद्वारे सिंधुदुर्ग विकास आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. ए.आय.युक्त जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा आहे."असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शनिवार दि.२३ रोजी केले.
महाराष्ट्र ग्रोथ एसिलीरेटर २०३५ या दैनिक मुंबई तरुण भारत आणि विवेक पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,आय. टी सी.ग्रँड हॉटेल, परळ ,मुंबई येथील कार्यक्रमात ते बोलत होते. बंदरे विकास बाबत बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की,"बंदरक्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीशी बोलणे, पर्यावरण परवानगी या सगळ्यात मोठी अडचण होती.जवळपास ३२ परवानग्या प्रलंबित होत्या,त्यातील ३० परवानग्या मिळाल्या, आजच्या काळात १ ट्रिलियन इकॉनॉमी असण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात आमच्या विभागाचा मोठा वाटा आहे." (Konkan Development)
"वाढवण बंदर बाबत केंद्र आणि राज्य सरकार म्हणून भूमिका स्पष्ट आहे. वाढवण बंदरात राज्य म्हणून आपण २४ टक्के आहोत.बंदर क्षेत्रात १ ते ५ क्रमांकात आपणास मोठी संधी मिळणार आहे.विकास करताना संवादाच्या माध्यमातून बदलास होणारा विरोध कसा कमी करावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले आहे." असेही राणे म्हणाले.
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील क्लस्टर योजनेबाबत अधिवेशनात घोषणा केली आहे. बंदर खाते म्हणून सर्व प्रकारची मदत केली जाणार आहे.प्रत्येकाला राज्यात येऊन गुंतवणूक करायची आहे.२०३० पर्यंत ४०००० नोकऱ्या या क्षेत्रात तयार होऊ शकतात. ज्यात स्थानिक नोकऱ्यांना प्राधान्य असणार आहे.५६००० कोटीची एम. ओ.यू. आपण केली आहे.मोठ्या प्रमाणात राज्यात गुंतवणूक येत आहे."असे राणे यांनी स्पष्ट केले.(Konkan Development)
"मत्स्य व्यवसाय बाबत किनारपट्टीवर असणारा पारंपरिक मच्छीमारास आर्थिक सक्षम करणेचे आहे.तसेच अनधिकृत मासेमारी वर कारवाई करावी लागते. आपणास या क्षेत्रात ज्या राज्यांचे बजेट ८००० कोटी आहे त्यांच्या स्पर्धेस उतरायचे आहे. मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना ही राज्याची अशी पहिली योजना आहे.आपले बजेट १२४० कोटी वर गेले आहे. मच्छी विक्री करणाऱ्या महिलांच्या हातात ग्लब्स पासून अन्य साधनसामुग्री बाबत व किनारा पट्टीवर देखील आपण काम करतो आहोत.
केरळ ,तमिळनाडू च्या तोडीस काम एक वर्षात करण्याचे ध्येय आहे. गेल्यावर्षीचे पैसे खर्च केल्याशिवाय यावर्षीचा निधी मिळत नाही त्यामुळे निधीचे पैसे योग्य पद्धतीने शेवटच्या मच्छीमारापर्यंत नेणे हे आमचे काम आहे.१२०८ मच्छिमारांनी के सी सी योजनेचे कार्ड काढलं होते. कारण योजना जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत लाभ दिसत नाहीत.तसेच निर्यात करणाऱ्या कंपन्यांच्या संपर्कात देखील आहोत." असे राणे यांनी स्पष्ट केले. (Konkan Development)
मुंबई वॉटर टॅक्सीबाबत राणे म्हणाले की, "स्वीडनची मूळ प्रवासी वाहतूक जलवाहतूक आहे.आपल्याकडे त्या क्षमतेने जल वाहतूक होणे गरजेचे आहे. मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बदलण्यात प्रयत्न करताना एम एम आर चे पूर्ण रीजन जलवाहतूकीने जोडण्याचा प्रयत्न आहे.जोपर्यंत लोकांना प्रवासासाठी पर्यायी मार्ग देत नाही तोपर्यंत याबाबत मोठी रचना उभी राहू शकत नाही.तसेच मेक इन महाराष्ट्र बोटी असणे यास प्राधान्य आहे.
येणाऱ्या काळात जलवाहतूकमध्ये राज्य अग्रेसर असेल. दर्जेदार बोटी असतील तर मुंबईकर प्रवासास खर्च करायला देखील तयार आहे.आपली इकडे काही लाकडी बोटी ४० वर्ष जुन्या आहेत. बोट इलेक्ट्रिक करावे याबाबत सकारात्मक प्रयत्न सुरू आहे. इलेक्ट्रिक आधुनिक बोट आली की व्यावसायिक जे दोन फेऱ्या मारायचे ते चार पाच फेऱ्या मारून पैसे कमावतील." (Konkan Development)