जनगणना २०२७ साठी ‘एसई आयडी’ देणे आवश्यक;पालिकेचे नागरिकांना आवाहन;१६ मे ते १४ जूनदरम्यान गणनाकार गृहभेटी

    23-May-2026
Total Views |
ID verification
 
मुंबई : (ID verification) जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील ‘घरयादी आणि गृहगणना’ प्रक्रिया सध्या सुरू असून, स्व-गणना केलेल्या नागरिकांनी त्यांना मिळालेला ‘एसई आयडी’ संबंधित गणनाकारांना देणे आवश्यक असल्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जनगणना अधिकारी अश्विनी भिडे यांनी केले आहे.
 
पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत नियुक्त गणनाकार नागरिकांच्या घरी भेट देत असून, स्व-गणनेत सादर केलेल्या माहितीची पडताळणी, पुष्टीकरण आणि अंतिम सादरीकरणाची प्रक्रिया पार पाडत आहेत. या प्रक्रियेसाठी नागरिकांनी त्यांचा ‘एसई आयडी’ गणनाकारांना उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. गणनाकारांकडून माहितीची पडताळणी आणि मान्यता झाल्यानंतरच ‘घरयादी आणि गृहगणना’ प्रक्रिया पूर्ण समजली जाणार आहे.
 
 
स्व-गणना पोर्टलवर नागरिकांनी दिलेली माहिती ‘एनक्रिप्टेड’ स्वरूपात सुरक्षित सरकारी सर्व्हरवर संग्रहित केली जात असल्याची माहितीही प्रशासनाने दिली. या प्रक्रियेसाठी अत्याधुनिक सायबर सुरक्षा आणि गोपनीयतेच्या उपाययोजना करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.(ID verification)
 
अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा
 
नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा बनावट संकेतस्थळांपासून सावध राहून केवळ अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा. जनगणना प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि सुलभ करण्यासाठी गणनाकारांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहनही पालिका प्रशासनाने केले आहे.(ID verification)