दोडामार्गातील तिलारीत भरणार पहिले चतुर आणि टाचणी संमेलन; सहभागी होण्यासाठी...

    23-May-2026
Total Views |
dodamarg dragonfly meet




मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
महाराष्ट्राचे अमेझॉन म्हणून ओळखले जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील वानोशी फॉरेस्ट होम स्टेमध्ये उत्तर पश्चिम घाटातील पहिले चतुर आणि टाचणी संमेलन आयोजित करण्यात आले आहे (dodamarg dragonfly meet). १२ ते १४ जून, २०२६ (शुक्रवार ते रविवार) या कालावधीत कुडासे गावात राष्ट्रीय स्तरावरील हे संमेलन भरणार आहे (dodamarg dragonfly meet). यामध्ये निसर्गभ्रमण, चतुर आणि टाचण्यांचे निरीक्षण, त्यांच्याविषयी शास्त्रीय माहितीसंबंधी तज्ज्ञांची व्याख्याने आणि कोकणी जीवनशैलीचा अनुभव असा भरगच्च कार्यक्रम पार पडेल. (dodamarg dragonfly meet)
 
 
तिलारी दोडामार्ग हा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. मात्र आजपर्यंत या भागात चतुर आणि टाचण्यांना दृष्टीक्षेपात ठेवून असे संमेलन झाले नव्हते. मात्र वानोशी येथील प्रवीण देसाई यांच्या संकल्पनेतून हे आगळेवेगळे निवासी शिबीर साकारत आहे. दोडामार्ग आणि आजूबाजूच्या परिसरतात जवळपास १०० हून अधिक चतुर आणि टाचण्यांची नोंद झालेली आहे. यात पश्चिम घाटातील अनेक प्रदेशनिष्ठ प्रजातींचाही समावेश आहे. याशिवाय दोडामार्ग तालुक्यातून 'कोकण छायासुंदरी (Protosticta shambhaveei) आणि राय भिंगरी (Macromia kannharaiensis) या दोन प्रजातींचाही शोध लागलेला आहे. त्यामुळे हे राष्ट्रीय संमेलन संशोधक आणि निसर्गप्रेमींसाठी एक अनोखी पर्वणी आहे.
 
 
या संमेलनांतर्गत वानोशी, कुंब्रल आणि तिलारीच्या परिसरातील विविध चतुरांचा खजिना सर्वासमोर खुला होणार आहे. शिवाय नव्याने शोधण्यात आलेल्या मिरिस्टिक पाणथळ जागेला भेट देण्याची अमूल्य संधीही यानिमित्ताने मिळणार आहे. या संमेलनाला तज्ज्ञ म्हणून केरळमधील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. विवेक चंद्रन यांची उपस्थिती असणार आहे. डॉ. चंद्रन यांनी चतुर आणि टाचण्यांवर आपली पीएचडी पूर्ण केली असून टाचणी आणि चतुरांच्या ११ नवीन प्रजातींचाही शोध लावला आहे. शिवाय अनेक ख्यातनाम आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकांमध्ये त्यांची ३० हून अधिक संशोधने प्रसिद्ध झाली आहेत. संमेलनातील दुसरे तज्ज्ञ म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉ. दत्तप्रसाद सावंत हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. सावंत हे वैद्यकीय व्यावसायिक असून चतुर आणि टाचण्यांच्या क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. तब्बल २२ नवीन प्रजातींचा शोध डॉ. सावंत यांच्या नावावर आहे.
या दोन मातब्बर आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधकांचा सहभाग असलेल्या चतुर आणि टाचण्यांवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या संमेलनात संशोधक, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमी यांनी आवर्जून सहभाग घ्यावा असे आवाहन प्रवीण देसाई (९४०५८३३६९१), वानोशी फॉरेस्ट होम स्टे यांनी केले आहे. या निवासी शिबिर सशुल्क आहे.