विवेक पार्क फाउंडेशच्या माध्यमातून श्वेतपत्रिका सादर;एमजीएक्स २०३५मध्ये श्वेतपत्रिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन; महाराष्ट्राला जागतिक गुंतवणूक केंद्र बनविण्याचा रोडमॅप सादर
मुंबई : (Data Center Maharashtra) महाराष्ट्राला 2035 पर्यंत जागतिक गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या उद्देशाने विवेक PARC फाउंडेशनने “MGX2035 – महाराष्ट्र ग्रोथ अॅक्सेलरेटर या कार्यक्रमादरम्यान 'महाराष्ट्र : द ग्लोबल इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन' ही श्वेतपत्रिका सादर केली आहे. राज्यातील पायाभूत सुविधा, उद्योग, धोरणे, मानवी संसाधन आणि भविष्यातील विकासाच्या संधी यांचा व्यापक आढावा या अहवालात घेण्यात आला आहे.
या श्वेतपत्रिकेनुसार महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असून, भारताच्या एकूण जीडीपीमध्ये सुमारे 14 टक्के, एकूण निर्यातीमध्ये 15 टक्के आणि परकीय गुंतवणूक (FDI) आकर्षित करण्यातही मोठा वाटा उचलत आहे. राज्याचा जीएसडीपी 2025-26 मध्ये सुमारे 51 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
श्वेतपत्रिकेत महाराष्ट्राच्या सागरी आणि बंदर क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला आहे. राज्याला लाभलेला 877 किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा, जवाहरलाल नेहरू बंदराचा वाढता कंटेनर वाहतूक प्रवाह, वाढवण बंदर प्रकल्प आणि सागरमाला योजनेतील विविध प्रकल्प राज्याच्या व्यापार क्षमतेला नवी चालना देणारे ठरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच समृद्धी महामार्ग आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर यांसारखे प्रकल्प उद्योग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी महत्त्वाचे मानले गेले आहेत.(Data Center Maharashtra)
अहवालात राज्यातील पारंपरिक उद्योगांबरोबरच इलेक्ट्रिक वाहन आणि बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स व सेमिकंडक्टर, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCC), ग्रीन हायड्रोजन, एरोस्पेस आणि डेटा सेंटरसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांना पुढील वाढीचे प्रमुख चालक मानण्यात आले आहे.
याशिवाय 37 विविध क्षेत्रांतील हितधारकांशी संवादातून काही महत्त्वाच्या अपेक्षाही समोर आल्या आहेत. उद्योग क्षेत्रासाठी मजबूत पायाभूत सुविधा, व्यवसाय सुलभता, कुशल मनुष्यबळ, जागतिक व्यापार संधी, तंत्रज्ञानाधारित प्रशासन आणि शाश्वत विकास या बाबींना प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
श्वेतपत्रिकेत महाराष्ट्रासाठी चार प्रमुख प्राधान्यक्रम सुचविण्यात आले आहेत. यामध्ये डिजिटल सिंगल विंडो प्रणाली, स्पर्धात्मक वीज दर, कुशल मनुष्यबळासह प्लग-अँड-प्ले औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती आणि एमएसएमई क्षेत्रासाठी योजनांची व्यापक माहिती मोहीम यांचा समावेश आहे.
“महाराष्ट्राला केवळ अधिक कारखान्यांची गरज नाही, तर वेग, विस्तार आणि जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देणाऱ्या परस्परसंबंधित परिसंस्थांची गरज आहे,” असेही या श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.(Data Center Maharashtra)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.