समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी १३७ सुरक्षा रक्षक तैनात होणार; सध्या ९३ लाईफ गार्ड; प्रत्येकी ३ ते ४ किलोमीटर परिसरावर नजर ठेवणार

    23-May-2026
Total Views |
BMC
 
मुंबई : (BMC Beach Security) पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटक आणि मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने लाईफ गार्डची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या पावसाळ्यात १३७ सुरक्षा रक्षक पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत. सध्या केवळ ९३ सुरक्षा रक्षक कार्यरत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा यांनी दिली.
 
अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले की, प्रत्येक लाईफ गार्ड ३ ते ४ किलोमीटरपर्यंतच्या समुद्री परिसरावर नजर ठेवणार आहे. पावसाळ्यात चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करतात, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
स्थायी समितीच्या बैठकीत भाजप नगरसेवक तेजिंदर तिवाना यांनी प्रश्न उपस्थित करत सांगितले की, समुद्रकिनाऱ्यांवर लाईफ गार्ड तैनात करण्याचा ठेका जून २०२५ मध्ये संपला होता, मग नवीन प्रस्ताव आणण्यासाठी एक वर्षाचा विलंब का झाला? या विलंबासाठी अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात येणार, असा सवालही त्यांनी केला. (BMC Beach Security)
 
 
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य यशोधर फणसे यांनी लाईफ गार्ड व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत अनेकदा लाईफ गार्ड केवळ बसून गप्पा मारताना दिसतात, अशी टीका केली. तसेच बोटी कोण उपलब्ध करून देणार, किती जीवरक्षक तैनात असतील आणि आतापर्यंत किती जणांचे प्राण वाचवण्यात आले, अशी विचारणा त्यांनी केली.
 
काँग्रेसचे अशरफ आझमी यांनीही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निविदेची मुदत संपण्यापूर्वी नवीन प्रस्ताव का आणण्यात आला नाही आणि ११ महिन्यांनंतर प्रस्ताव सादर करण्यामागचे कारण काय, असा सवाल केला.
 
सभागृह नेते गणेश खणकर यांनी सांगितले की, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक समुद्रकिनाऱ्यांवर येतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी हा प्रस्ताव मंजूर करणे आवश्यक आहे.स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनीही पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करून या प्रस्तावाला मंजुरी देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. (BMC Beach Security)