उन्हाच्या वाढत्या झळा : कंपन्यांचा जिव्हाळा!

    22-May-2026
Total Views |
 
Summer Heat Employee Care
 
उन्हाच्या तीव्र झळांनी यंदा भारतातील शहरांच्या तापमानाचे जुने विक्रमही मोडीत काढले. सध्या शाळांना सुटी असल्यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा असला, तरी नोकरदारवर्गाची मात्र उष्णतेच्या लाटांतून सुटका नाहीच. अशावेळी प्रशासनानेही खबरदारीच्या उपाययोजना जारी केल्या. पण, त्याचबरोबर काही कंपन्यांनीही आपल्या कर्मचार्‍यांना उष्णतेच्या या झळांपासून काहीसा दिलासा मिळावा म्हणून प्रयत्न केलेले दिसतात. त्याचाच या लेखात घेतलेला आढावा...
 
एप्रिल, मे आणि जून या उन्हाळ्याच्या कालावधीत वाढत्या गरमीपोटी उष्णता व उष्णतेची लाटसदृश्य स्थिती ही गेल्या काही वर्षांपासून तशी नित्याची बाब समजली जाते. यातूनच सर्वजण ‘नेमेची मग येतो उन्हाळा’ असा रखरखीत अनुभव घेत असतात. जागतिक हवामानतज्ज्ञांच्या अभ्यासानुसार, २०२५ या वर्षीचा उन्हाळा जागतिकसंदर्भात सर्वाधिक उष्ण म्हणून नोंदविण्यात आला होता, हे यासंदर्भात उल्लेखनीय असून, अशा वेळी विविध कंपन्या-कार्यालयांमध्ये, विशेषतः प्रवास करणार्‍या वा कार्यालयाबाहेर राहून काम करणार्‍या कर्मचार्‍यांची वेगळीच कसोटी असते. या उन्हाळी गरमीच्या वार्षिक समस्येवर मात करण्यासाठी कंपनी व्यवस्थापन व व्यवस्थापक पण विशेष स्वरूपात प्रयत्न करीत असतात. यंदापण ऊन व उन्हाळा भरीला आला असताना, याचाच प्रत्यय व परिचय येत आहे.
 
यासंदर्भात मुळात देशांतर्गत भरउन्हाळ्यात निवडक ठिकाणी असणारे तापमान व त्यातील चढ-उतार समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे. यासंदर्भात यावेळच्या उन्हाळ्याच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रीय स्तरावरील तापमान सरासरी स्वरूपात ४० ते ४६ टक्के होते. त्यातही उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एप्रिलच्या शेवटी ४७.६ टक्के सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली असून, आगामी दोन महिन्यांच्या दरम्यान देशातील ऊन आणि उन्हाळा यांची स्थिती विविध प्रदेशांत सर्वसाधारणपणे अशाच स्वरूपाची राहील, असा अंदाज केंद्र सरकारच्या हवामान खात्यातील विषयतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
 
हवामानशास्त्र क्षेत्रातील याच जाणकारांनी हवामान-तापमानाच्या संदर्भात प्रभाव टाकणार्‍या व प्रचलित अशा ‘एल-निनो’चा यासंदर्भात विशेष अभ्यास केला. या अभ्यासानुसार, सर्वसाधारणपणे ‘एल-निनो’चा प्रादुर्भाव व प्रभाव उन्हाळ्यात सागरी क्षेत्रातील तापमान मर्यादेबाहेर वाढल्यामुळे होतो. यावर्षी ‘एल-निनो’चा पर्यावरणीय प्रभाव अधिक राहण्याचे अनुमान अभ्यासकांनी काढले आहे.
 
‘एल-निनो’चा प्रभाव व परिणाम वातावरणासह उन्हाच्या तीव्रतेपासून पावसाच्या प्रमाणापर्यंत होत असतो, असे अभ्यासांती सिद्ध झाले आहे. भारताच्या संदर्भात ‘एल-निनो’चा मोठ्या प्रमाणावर होणारा परिणाम म्हणजे, अतिवृष्टी व मोठ्या प्रमाणावरील उष्णतेची लाट, अशा दोन्ही प्रकारच्या अतिरेकी स्वरूपात दिसून येतो. यावर्षी पण उर्वरित उन्हाळ्यात सूर्याच्या तापाच्या जोडीलाच उष्णतेच्या लाटांच्या प्रतापाला भारताला सामोरे जाण्याचा अभ्यासपूर्ण इशारा देण्यात आल्याने सार्‍यांच्याच काळजीत स्वाभाविकपणे भर पडली आहे.
 
यावर्षीच्या उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कंपन्यांनी पुढाकार घेतल्याचे प्रामुख्याने दिसून येते. यासाठी कंपन्यांनी चाकोरीबद्ध प्रयत्न न करता, विविध प्रकारे पुढाकार घेतल्याचे प्रामुख्याने दिसून येते. यामध्ये व्यावसायिक गरजा लक्षात घेतानाच, कामांच्या प्राथमिकतेमध्ये लवचीकपणे बदल करणे, उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन कामाची प्रक्रिया व ठिकाणांमध्ये बदल करणे, गरमीचे स्वरूप लक्षात घेऊन कामाच्या तासांची फेररचना करणे इत्यादीचा समावेश केला आहे, तर केवळ कार्यालयीन स्वरूपाचे व्यावसायिक काम करणार्‍यांसाठी व्यावसायिक आवश्यकता व कर्मचार्‍यांच्या गरजांचा समन्वय साधून यापूर्वीच विविध कारणांनी प्रस्थापित अशा घरून काम करण्याची सुलभ मुभा पुन्हा प्रदान केली आहे.
 
यासंदर्भात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, ‘मर्सिडीज बेंझ’, ‘नो ब्रोकर डॉट कॉम’, ‘सॅव्हिलिस इंडिया’ यांसारख्या कंपन्यांनी तीव्र उन्हापासून कर्मचार्‍यांना होणारा त्रास कमी व्हावा, यादृष्टीने व्यापक प्रमाणावर घरून काम करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन दिले असून, त्याला कर्मचार्‍यांकडूनसुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘ई-कॉम’ क्षेत्रातील आघाडीवरील अशा ‘इटर्नल’ ग्रुपसारख्या कंपन्या भरउन्हाळ्यात भटकंतीसह काम करणार्‍या आपल्या कर्मचार्‍यांसाठी त्यांच्या विक्री केंद्रस्थानी थंड पाण्याची मोठ्या प्रमाणात सोय करण्याशिवाय कुलर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, त्यांच्या कर्मचार्‍यांना उन्हात फिरताना सहजपणे उपयोगी पडतील अशी ग्लुकोजसह पिण्याच्या पाण्याची पाकिटे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिली आहेत. बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करणार्‍या कर्मचारी-कामगारांसाठी त्यांच्या आवश्यकतेनुसार, ताक देण्याचा उपक्रम काही बांधकाम-प्रकल्प व्यवस्थापन कंपन्यांनी सुरू केला आहे, हे विशेष!
 
कर्मचारी निवड व्यवस्थापन क्षेत्रात काम करणार्‍या ‘सीआयईएन-एचआर’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य मिश्रा यांच्यानुसार, उन्हाची वाढती तीव्रता व त्यामुळे कर्मचार्‍यांना होणारा अथवा होऊ शकणारा त्रास लक्षात घेता, काही कंपन्यांनी त्यांच्या कामाचे फेरनियोजन करून कंपनीचे काम व्हावे व कर्मचार्‍यांना उन्हाची झळ बसू नये, यासाठी कर्मचार्‍यांच्या कामाचे निश्चित-निर्धारित व प्रसंगी लवचीक अशा पद्धतीने नियोजन केले असून, हा प्रयोग उभयपक्षी परिणामकारकरीत्या फायदेशीर ठरला आहे.
 
मालाची वाहतूक, ने-आण व प्रत्यक्ष थेट विक्री करणार्‍या कर्मचार्‍यांना उन्हामुळे येणारा थकवा व त्रास आटोयात आणण्यासाठी विशेषत: ‘ई-कॉमर्स’सह ‘लॉजिस्टिक’ कंपन्यांनी आपल्या विक्री केंद्र, मालवाहतूक करणारी वाहने व भरउन्हात विशेषत: थेट विक्री करणार्‍या कामगारांच्या संख्येत वाढ केली आहे. यामुळे अशा कर्मचार्‍यांच्या प्रवासाच्या अंतरामध्ये घट होऊन त्यांचा अप्रत्यक्षपणे ऊन आणि उन्हाळ्यापासून बचाव होऊ लागला आहे.
 
उन्हाची ही काहिली जूनपर्यंत सुरू राहणार असल्याच्या भारतीय हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार, कंपन्यांनी कर्मचार्‍यांच्या संदर्भात उन्हामुळे होऊ शकणार्‍या उष्माघात वा तत्सम आजारांवर प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचार्‍यांमध्ये संवाद व प्रशिक्षणासह जागृती निर्माण करण्यावर भर दिला आहे. यामध्ये आगामी महिन्यात कर्मचार्‍यांनी घ्यावयाच्या विशेष काळजीअंतर्गत त्यांचे खानपान, उन्हात फिरताना व काम करताना घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन करण्यात येत आहे. याच्याच जोडीला कर्मचार्‍यांनी प्रदीर्घ तास काम करू नये, शक्यतो सावलीचा वापर करावा, पेयपानाच्या वेळा पाळाव्यात इ. बाबींचे कटाक्षाने पालन करण्यात येत असून, त्यातून भरउन्हाळ्यात कंपनी-व्यवस्थापनाला कर्मचार्‍यांप्रति असणारा जिव्हाळाच दिसून येतो.
 
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६