मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकार्यांच्या बैठकीचे आयोजन बुधवार, दि. २० मे रोजी खासदार आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. पक्षाची इतकी महत्त्वाची बैठक असूनदेखील आणि स्वतः ‘थोरले साहेब’ उपस्थित असतानादेखील, या बैठकीस न जाण्यातच कोणते ‘हित’ आमदार रोहित पवार यांना दिसले, हे मात्र गुलदस्त्यातच!
संपूर्ण पक्ष जवळपास मुंबईत असताना रोहित पवार मात्र पुण्यात होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच "पटेल आणि तटकरे हे क्षमतावान नेते आहेत, त्यांच्या क्षमतेचा वापर करून घ्यावा,” असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते, तर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौर्याची स्तुती करताना "पंतप्रधान आपल्या देशाची प्रतिमा बाहेरील देशांत उंचावत आहेत,” असे मत व्यक्त केले होते. मुळात शरद पवार कधी कुणाची स्तुती करतील आणि कधी कुणाचे कान टोचतील, हे खुद्द ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. त्यातच तटकरे आणि पटेल यांची स्तुती खुद्द शरद पवारांनीच केल्याने रोहित पवार नाराज असणार, या शंकेस वाव मिळू शकतो.
मागील काही दिवसांपासून सातत्याने रोहित पवार हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीकांचा अक्षरश: भडिमार करीत होते. पण, शरद पवार यांच्या एका स्तुतीने रोहित पवार यांच्या भूमिकेवर पाणी फिरवले गेले. शेवटी बैठकीच्या नंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना, "रोहित पवार यांची नाराजी काही असेल तर दूर करू, तसेच पक्षाच्या शिस्तीत राहून काम करू,” असे स्पष्टीकरण द्यावे लागले, तर खुद्द रोहित पवार यांनीदेखील, "मी नाराज असल्याची बातमी निराधार आहे,” असे स्पष्ट केले.
पण, एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम लागलेला असतानाच, रोहित पवार यांचे पक्षातील अंतर्गत बैठकीनिमित्ताने ‘मनोमिलन’ की ‘मनभंग’, यातील ‘हित’ कोणते आणि ‘अहित’ कोणते, याचीच जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली दिसली.
‘नीट’मध्ये कुणाचा ‘हात’?
सध्या सर्वत्र ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीवरून राज्यभर आणि देशभर जवळपास २३ लाख मुलांचे शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले असतानाच, पेपरफुटीत कोणाचा हात आहे, यावरदेखील जोरदार चर्चा सुरू आहेत. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी, "कृपया लातूरला बदनाम करू नका,” असे सांगतानाच, "मोटेगावकर एका पक्षाचा उघडपणे प्रचार करीत होते, पक्षास रसद पुरवत होते, त्याचे सक्रिय समर्थक होते. पण, यात राजकारण आणू नये,” असे मत व्यक्त केले.
‘नीट’च्या निमित्ताने आता ‘लासेस-माफिया’ ही नवीन टोळी समोर येत आहे; ज्यात विविध खासगी लासच्या संघर्षातून किती मोठे अर्थकारण असते, हे समोर आले. फक्त याच परीक्षेचा विचार केल्यास किती लाख विद्यार्थी यासाठी कष्ट, तसेच आर्थिक गुंतवणूक करतात, हे वेगळे सांगायला नको. ‘नीट’ परीक्षेसोबतच मेडिकल आणि इंजिनिअर या दोन्ही परीक्षांची तयारी करणारेही विद्यार्थी असतात. तसेच खासगी लासेसचे भागसुद्धा वाढत आहेत; ज्यात मेस, कॅन्टीन, झेरॉस, पुस्तके, अभ्यासिका, हॉस्टेल यांत कोटींची उलाढाल होत असते. याउलट, मात्र राज्यभर ‘लातूर पॅटर्न’ याला एक प्रतिष्ठा आहे; ज्यात अनेक विद्यार्थी घडले आहेत, अनेक शिक्षकांनी गेली अनेक वर्षे कष्ट करून हा ‘पॅटर्न’ घडवला. पण, या पेपरफुटीमुळे मात्र एकूणच शिक्षण क्षेत्रास काळिमा फासणारा प्रकार पुढे आला.
‘नीट’ पेपरफुटीसंदर्भात अनेक सुरस आर्थिक कहाण्या पुढे येत आहेत. त्यामुळे याबाबत सर्वच आमदारांनी, शैक्षणिक आदर्शांनी एकत्र प्रयत्न करून असे प्रकार भविष्यात होऊ नयेत, यासाठी प्रयत्न करायला हवे, ज्यामुळे देशातील सामाजिक आणि शैक्षणिक वातावरण खराब नक्कीच होणार नाही. कारण, ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी ‘सीबीआय’ कोठडीत असलेल्या मोटेगावकर याचाच, ‘आता पेपर नीट घ्या,’ असे आवाहन करत असल्याचा जुना व्हिडिओ समोर येत आहे. ज्यात, ‘वन नेशन, वन एझाम’ चांगली घ्यावी, असे म्हणणारा मोटेगावकरचाच व्हिडिओ आहे आणि आताचे त्याचे कारनामे पाहता, ‘कुंपणानेच शेत खाल्ले आहे’ असे म्हटले, तर चुकीचे होणार नाही. यापुढे मात्र असे भोंदूतज्ज्ञ उभे राहू नयेत, याकडे ‘नीट’ पाहणे गरजेचे!
अभिनंदन परुळेकर