मनोज जरांगेंच्या मागण्या सरकार दरबारी नेणार; आ. प्रसाद लाड; अंतरवालीत घेतली जरांगेंची भेट

    22-May-2026   
Total Views |
Manoj Jarange Protest
 
जालना : (Manoj Jarange Protest) येत्या ३० मे पासून मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करण्याची घोषणा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केली. या पार्श्वभूमीवर भाजप आ. प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या मागण्या सरकार दरबारी नेत त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
 
आ. प्रसाद लाड म्हणाले की, "मी आमदार किंवा नेता म्हणून नाही, तर समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून आलो आहे. मी तुमचा लहान भाऊ म्हणून आलो असून सातत्याने तुमच्या सोबत उभा राहील. मी तुमच्या मागण्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करेन आणि मागण्या पूर्ण न झाल्यास समाजासाठी आमदारकीचा राजीनामा देईल. आपण हे आंदोलन मागे घ्यावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी जे केले ते गेल्या ७० वर्षांत कोणत्याच मराठा नेत्याने केले नाही. त्यामुळे त्यांनाही समजून घेतले पाहिजे. समाज हा सर्वतोपरी असून जातीसाठी माती खायला आम्ही तयार आहोत. आमच्यात चांगली चर्चा झाली."
 
 
मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर
 
ते पुढे म्हणाले की, "२८ तारखेपर्यंत उत्तर द्या, असे जरांगे यांनी सांगितले. मी मुंबईला पोहोचल्यावर उद्या परवापर्यंत फोन करून त्यांच्याशी याबाबत बोलणार आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या वास्तविक असून त्या सरकारने मान्य केल्या आहेत. यावर मुंबईत जाऊन उपसमितीशी चर्चा करणार आहे. उपसमितीकडून समाधान न झाल्यास आवश्यकता असेल तर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशीही चर्चा करणार आहे. मनोज दादांना पुन्हा उपोषण करण्याची वेळ येईल असे वाटत नाही. कारण त्यांच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर असून त्यातील बऱ्यापैकी मागण्या मान्य केल्या आहेत. त्यात आता मनोज जरांगे यांनी मांडलेले मुद्दे मी मुंबईत मांडणार आहे."
 
जरांगे यांच्या मागण्या काय?
 
सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा १९९४ च्या धर्तीवरच जीआर काढा. सातारा संस्थांच्या गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र द्यावे. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांची व्हॅलिटी तातडीने द्यावी. महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्यावे. आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि एमआयडीसीमध्ये नोकरीचा जीआर काढावा. सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा, मराठा उपसमितीने पुढच्या काळात चांगले काम करावे, शिंदे समितीला एक वर्षांची मुदतवाढ देऊन नोंदी शोधणे, स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करावे, या मागण्या मनोज जरांगे यांनी केल्या आहेत. तसेच ३० तारखेला आंदोलन नक्की करणार आहे, त्यात बदल होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.(Manoj Jarange Protest)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....