कर्मयोगी ‘जादूगार’

    22-May-2026
Total Views |
Prakash Patil Cricket Legend
 
प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर, खेळ आणि समाजकार्यासाठी आयुष्य वेचणारे वसईचे अष्टपैलू क्रीडा महर्षी प्रकाश पाटील यांच्याविषयी...
 
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन|
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥
(‘श्रीमद्भगवद्गीता’ - २.४७)
 
‘श्रीमद्भगवद्गीते’तील हा ‘कर्मयोग’ जणू वसईचे ज्येष्ठ अष्टपैलू क्रिकेटपटू प्रकाश पाटील यांच्या आयुष्याचे जीवनसूत्र! वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले आणि वैवाहिक जीवनाची सुवर्णपूर्ती साजरी करणारे प्रकाशजी आजही तितक्याच उत्साहाने मैदानावर कार्यरत आहेत. ज्या काळात क्रिकेटमध्ये पैसा आणि प्रसिद्धीचा झगमगाट नव्हता, त्या काळात त्यांनी केवळ खेळावरील निस्सीम प्रेमापोटी स्वतःचे आयुष्य क्रीडा क्षेत्राला आणि युवा पिढीला समर्पित केले. क्रिकेटजगतात आपल्या अचूक फिरकीने फलंदाजांना नाचवणारे ‘गोलंदाजीतले जादूगार’ म्हणून ते सुपरिचित. परंतु, वैयक्तिक आयुष्यात प्रकाशजी अत्यंत मितभाषी, जमिनीवर पाय रोवून असणारे एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व.
 
प्रकाश पाटील यांच्या कारकिर्दीचा पट पाहिला, तर डोळे दिपून जातात. आशिया खंडातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या मुंबईच्या ‘टाईम्स शिल्ड’ स्पर्धेत त्यांनी आपल्या बॅटने आणि बॉलने इतिहास रचला. १९७०-७१ मध्ये ‘चौगुले आणि कंपनी’कडून खेळताना त्यांनी २५० धावांची नाबाद खेळी साकारली. या ऐतिहासिक कामगिरीसाठी भारताचे महान कर्णधार विजय मर्चंट यांच्या हस्ते ताज हॉटेलमध्ये त्यांना ‘उत्कृष्ट फलंदाज’ म्हणून चांदीची बॅट देऊन गौरविण्यात आले. त्यापुढील वर्षी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या संघात सामील झाल्यावर त्यांनी गोलंदाजीत कमाल केली. एकाच सामन्यात सहा षटके, तीन निर्धाव, फक्त तीन धावा आणि हॅट्ट्रिकसह सहा बळी घेण्याचा अद्भुत विक्रम त्यांनी नोंदवला. न्यूझीलंडचे तत्कालीन राजदूत अलेझांडर यांच्या हस्ते ‘चांदीचा बॉल आणि तीन स्टम्प्स’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. पुढे १९७५ मध्ये ३५ धावांत पाच बळी घेण्याची किमया त्यांनी साधली. ‘डॉ. कांगा लीग’च्या ‘ए’ डिव्हिजनमध्ये ‘जॉली क्रिकेटर’कडून खेळताना बापूसाहेब नाडकर्णी, माधवराव आपटे, बाबा शिधये यांसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत त्यांनी मैदान गाजवले. त्यांच्याच नेतृत्वात ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चा संघ ‘एफ’ डिव्हिजनमधून थेट ‘बी’ डिव्हिजनपर्यंत पोहोचला.
 
प्रकाश पाटील हे केवळ स्वतःच्या विक्रमांपुरते मर्यादित राहिले नाहीत. वसईतील स्थानिक क्रिकेट पाहताना त्यांच्या लक्षात आले की, बहुतांश खेळाडू पस्तीशी पार केलेले आहेत आणि तरुण पिढीला वाव मिळत नाही. हा विचार मनाशी पक्का करून, त्यांनी वसईत तरुण मुलांसाठी विशाल क्रिकेट प्रशिक्षण वर्ग सुरू केला आणि विशेष म्हणजे, हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत होते. हळूहळू या मोफत प्रशिक्षणात मुलांची संख्या एवढी वाढली की, प्रकाशजींना सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही सत्रांत वेळ द्यावा लागला. कालांतराने मुंबईत बँकेची नोकरी सांभाळून वसईत तरुणांना क्रिकेटचे प्रशिक्षण देणे कठीण होऊ लागले. त्यांनी बँकेकडे वसई शाखेत बदलीचा अर्ज केला. परंतु, तो फेटाळला गेल्यावर प्रकाशजींनी एक असा निर्णय घेतला, जो केवळ एक सच्चा क्रीडाप्रेमीच घेऊ शकतो. क्रिकेटच्या आणि युवा खेळाडूंच्या प्रेमापोटी त्यांनी वयाच्या दहा वर्षे आधीच बँकेच्या नोकरीतून सेवानिवृत्ती घेतली. स्वतःच्या आर्थिक स्थैर्यापेक्षा त्यांनी देशाचे भविष्य असलेल्या युवा पिढीला घडवण्यासाठी प्राधान्य दिले.
 
पुढे ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’ने त्यांच्यातील कल्पकता ओळखून १४ वर्षांखालील उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. वसईत दहा वर्षे आणि डहाणू येथील ‘रिलायन्स’/‘अदानी’ समूहाच्या स्टेडियमवर १२ वर्षे त्यांनी अविरत सेवा दिली. वसई आणि डहाणू परिसरात आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा सुरू करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी सुरू केलेली १४ वर्षांखालील ‘वसई कोल्ट्स’ स्पर्धा, पुढे १६ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील आंतर महाविद्यालयीन स्पर्धा म्हणून विस्तारली. आज तब्बल २९ वर्षे ही स्पर्धा अविरतपणे सुरू आहे, ज्यातून शेकडो तरुण खेळाडू पुढे आले आहेत. ‘एमसीए’च्या ‘मुंबई कोचेस असोसिएशन’चे सदस्य आणि ‘उपनगरीय डेव्हलपमेंट कमिटी’चे सदस्य म्हणूनही त्यांनी मोलाचे योगदान दिले.
 
प्रकाश पाटील यांचे व्यक्तिमत्त्व केवळ क्रिकेटच्या मैदानापुरते मर्यादित नाही, तर ते एक उत्तम, हौशी रंगकर्मीदेखील आहेत. वसईतील नाट्य विभूषित कै. चिंतामण राऊत आणि कै. नीळकंठ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘मन्वंतर कला मंडळ’ या संस्थेच्या माध्यमातून अनेक नाटकांत काम केले. वसंत कानेटकर यांच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ या अजरामर नाटकात त्यांनी साकारलेली ‘आचार्य’ ही भूमिका आजही जुन्या-जाणत्यांच्या स्मरणात आहे.
 
गंगेसारखे पवित्र, शांत आणि प्रसिद्धीच्या झगमगाटापासून कोसो दूर राहून प्रकाशजींनी आपले कर्तव्य चोख बजावले. आज ते त्यांचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू स्वप्नील पाटील याच्या ‘स्वप्नील पाटील क्रिकेट अ‍ॅकेडमी’मध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत. जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत क्रिकेट प्रशिक्षक म्हणूनच कार्य करत राहणार, ही त्यांची भावना आजच्या तरुणाईला कर्तव्याचा आणि निष्ठेचा संदेश देऊन जाते. अशा या ‘क्रीडामहर्षी’ला, ‘निष्काम कर्मयोगी’ला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!
 
कमलेश संखे