राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने सध्या वस्तीपातळीवर सुरु असलेली हिंदू संमेलने ही केवळ सांस्कृतिक-वैचारिक कार्यक्रम नाही, तर देशाची एकात्मता, संस्कृती आणि राष्ट्रनिर्मितीचा सामाजिक जागर ठरला आहे. त्यानिमित्ताने या हिंदू संमेलनांच्या फलश्रुतीचा आढावा घेणारा हा लेख...
साडेपाच वर्षांच्या आद्याच्या बोबड्या बोलांतून उमटणारे ‘रामरक्षे’चे श्लोक, सात वर्षांच्या अहानकडून आत्मविश्वासाने सादर होणारा ‘भगवद्गीते’चा १५वा अध्याय, बालकांचे सामूहिक ‘अथर्वशीर्ष’ पठण आणि छत्रपती शिवरायांवर लहानग्यांनी सादर केलेली नाटिका, हे पाहताना अभिमानाने छाती फुलून आली. लहानपणापासूनच संस्कृती आणि परंपरेचे संस्कार झाले, तर सुसंस्कृत पिढी घडते आणि सज्जनशक्तीचा उदय निश्चित होतो. हा कोण्या एका शाळेचा वार्षिक कार्यक्रम नव्हता, तर सकल हिंदू संमेलनातील काही मोजया कार्यक्रमांची ही उदाहरणे आहेत.
‘करिअर, नोकरी करणार्या आई-बाबांना संस्कृतीचा विसर पडलाय’ ही ओरड, हे चित्र पाहिल्यानंतर फोल ठरते. आजकाल आई-बाबा वेळात वेळ काढून आपल्या मुलांवर उत्तम संस्कार घडवण्याचा प्रयत्न करतात, हे चित्र नक्कीच आशादायी. हे चित्र सकल हिंदू समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘हिंदू संमेलने’ ही उत्तम व्यासपीठ ठरत आहेत. शेकडोंच्या संख्येने जमणारा सकल हिंदू समाज आणि त्याच्या समोर भारतीय संस्कृती, मूल्ये, कला, परंपरांचे संवर्धन करणार्या विविध कार्यक्रमांची आखणी आणि त्यातून निर्माण होणारी एकतेची भावना हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त देशभर ठिकठिकाणच्या वस्त्यांमध्ये आयोजित होणार्या हिंदू संमेलनांचे वैशिष्ट्य.
आजच्या वेगवान, तांत्रिक आणि सतत बदलणार्या जीवनशैलीत भारतीय संस्कृती, परंपरा जपणारा सकल हिंदू समाज अधिकाधिक विखुरला जात असल्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे. स्पर्धा, जबाबदार्या आणि आर्थिक ताणतणाव यांमुळे सामाजिक बंध दुर्बळ होताना दिसतात. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात इतका गुंतलेला आहे की, ‘आपण भले, आपले काम भले’ ही वृत्ती वाढीस लागली आहे. अशा परिस्थितीत ‘मी केवळ स्वतःसाठी नाही, तर समाजासाठीही आहे’ ही भावना जागृत होणे अत्यावश्यक आहे. हीच गरज हिंदू संमेलने पूर्ण करताना दिसतात. मात्र, आजूबाजूला बदललेली परिस्थिती, आव्हाने, संकटे, त्यांचा होऊ घातलेला परिणाम याबाबत गंभीरपणे विचार व्हायला हवा. समाजात एकजूट असणे गरजेचे आहे. भारतीय परंपरेतील चारही स्तर म्हणजे व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांचा बंध अधिक दृढ करून त्यांच्यात एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न हिंदू संमेलनांमधून होत असल्याचे स्पष्टपणे दिसते.
जाती, पंथ, भाषा किंवा प्रांतिक भेदांच्या पलीकडे जाऊन ‘सकल हिंदू समाज’ या व्यापक ओळखीला अधोरेखित करण्याचा प्रयत्न संमेलनांतून दिसतो. येथे ‘हिंदू’ हा शब्द केवळ ‘उपासना’, ‘पंथ’ किंवा ‘रिलिजन’ हा होत नाही; तर एक जीवनदृष्टी, जीवन पद्धती याअर्थी ‘हिंदू’ शब्दाचा अर्थ अभिप्रेत आहे. त्यामुळे विविधतेत एकता मानणारा, भारतीय संस्कृती आणि इतिहासाशी नाते जोडणारा आणि राष्ट्रहितासाठी कार्य करणारा प्रत्येक व्यक्ती या संकल्पनेत सामावतो. संमेलनांमुळे सकल हिंदू समाजात संवाद वाढतो, नवीन ओळखी निर्माण होतात आणि परस्पर सहकार्याची भावना दृढ होते. अर्थातच, त्यांच्या आखणीमुळे ही संमेलने केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांपुरती मर्यादित राहत नाहीत, तर वैचारिक जागृती घडवणारी व्यापक चळवळ उभारतात. इथे एक ‘ऋग्वेदा’तील मंत्र आठवतो, ‘संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम्’ म्हणजे, ‘एकत्र चला, एकत्र बोला, त्यातून मने एकरूप होवोत.’ हे असे झाले, तर समाजाच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल. आज नेमके हेच कार्य हिंदू संमेलनांच्या माध्यमातून होत आहे. थोडयात, ‘वेद’, ‘उपनिषदे’ आणि संतपरंपरेत मांडलेल्या एकात्मतेच्या विचारांना आधुनिक समाजजीवनात प्रत्यक्ष रूप देण्याचे कार्य या माध्यमातून घडत आहे.
भारतीय परंपरेत व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्र हे चारही स्तर परस्परांशी घट्ट गुंफलेले आहेत. व्यक्तीचा सर्वांगीण विकास कुटुंबाच्या स्थैर्यातून घडतो, कुटुंबाचे कल्याण समाजाच्या सुदृढतेतून आणि समाजाची प्रगती राष्ट्राच्या ऐय व सामर्थ्यावर अवलंबून असते. त्यामुळे कोणतीही वैयक्तिक प्रगती ही अंतिमतः राष्ट्रहिताशी सुसंगत असेल, तरच ती शाश्वत ठरते. आज बहुतांश वेळा व्यक्ती आपापल्या समस्यांमध्ये इतकी गुंतलेली असते की, व्यापक सामाजिक प्रश्नांकडे तिचे दुर्लक्ष होते. मात्र, जेव्हा समाजातील मोठा वर्ग राष्ट्रहिताशी जोडला जातो, तेव्हा विकासाचा प्रवाह सर्वसमावेशक बनतो. याची जाणीव हिंदू संमेलनांद्वारे करून दिली जात आहे.
या संमेलनांचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे, ही व्यासपीठे कोणत्याही राजकीय हेतूपासून दूर राहून समाजातील सकारात्मक, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्राभिमानी सज्जनशक्तीला एकत्र आणताना दिसतात. यातून समाजात परस्पर विश्वास, सहकार्य आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण होते आहे. वस्तीपातळीवर आयोजित होणार्या या संमेलनांमुळे समाजातील विविध घटकांमध्ये निर्माण झालेली हीच एकात्मता पुढे जाऊन संघटित सामाजिक शक्तीत रूपांतरित होण्याची क्षमता बाळगते. म्हणूनच, या संमेलनांचा परिणाम केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहत नाही. उलट, तो दीर्घकाळ समाजमनावर प्रभाव टाकत, सामाजिक परिवर्तनाचा भक्कम पाया रचतो.
भविष्यातील समाजरचना ही युवा पिढी आणि बालकांवर अवलंबून आहे. या नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी साधन म्हणजे ही हिंदू संमेलने आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक कलांचे सादरीकरण, देशभक्तीपर गीत, नाट्यप्रयोग आणि वैचारिक व्याख्याने यांच्या माध्यमातून त्यांच्यात भारतीय परंपरा, संस्कारांची रुजवात केली जात आहे. सोशल मीडिया आणि पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आपल्या इतिहासाची जाणीव अधिक ठळकपणे समोर येत असून, त्यातून सांस्कृतिक अस्मिता पुन्हा जागृत होताना दिसत आहे.
एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या अधिकारांसोबतच त्याची कर्तव्येही महत्त्वाची असतात. जात, धर्म किंवा पंथ यांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रहिताला प्राधान्य देणे, सामाजिक सलोखा आणि समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि हाच खरा धर्म आहे, हे संमेलनांमधून अधोरेखित करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत’- ‘उठा, जागे व्हा आणि श्रेष्ठ (ज्ञानी/गुरू) लोकांना भेटून ज्ञान प्राप्त करा’ हा ‘उपनिषदा’तील संदेश या हिंदू संमेलनांचा आत्मा आहे. या प्रेरणेतून प्रत्येकाने राष्ट्रनिर्माणाच्या प्रवाहात सक्रिय सहभाग घेतला; तर समाज अधिक संघटित, सजग आणि सक्षम बनेल. हा समाजच भविष्यातील बलशाली राष्ट्राची खरी पायाभरणी करेल, यात शंकाच नाही.
मनाली दीक्षित
(लेखक विश्व संवाद केंद्र (कोकण प्रांत) संपादिका आहेत.)