इंधन बचत आजच्या परिस्थितीत महत्वाचे नागरी कर्तव्य

    22-May-2026
Total Views |
 
Fuel Saving Civic Duty
 
आखाती युद्धाच्या गंभीर परिणामांचा विचार करता, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले आणि त्यांच्या आवाहनाला आज सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाददेखील मिळताना दिसतो. तेव्हा, भारताचे एक जबाबदार, कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपणही पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा. त्याचबरोबर या आवाहनामागची पार्श्वभूमी आणि त्याचे गांभीर्यही लक्षात घेण्यासाठीचा हा लेखप्रपंच...
 
आजच्या आधुनिक जगात वाहतूक व्यवस्था ही अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानली जाते. वस्तूंचे उत्पादन ज्या ठिकाणी होते, तेथून त्या वस्तू बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची आवश्यकता असते. ही वाहतूक व्यवस्था मुख्यतः पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनांवर अवलंबून आहे. त्यामुळे इंधनाचा पुरवठा कमी झाला किंवा त्यात अडचणी निर्माण झाल्या, तर त्याचा थेट परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो. वाहतूक कमी झाली, तर वस्तूंचा पुरवठा बाजारात कमी होतो. त्यामुळे प्रामुख्याने या व्यवस्थांना इंधनाचा पुरवठा करण्याची गरज आहे. विशेषतः फळे, भाजीपाला, दूध यांसारख्या नाशवंत वस्तू वेळेवर बाजारात पोहोचल्या नाहीत, तर त्या खराब होण्याची शयता वाढते.
 
भारतासारख्या मोठ्या देशाला दररोज सुमारे साडेचार ते पाच दशलक्ष बॅरल इतया मोठ्या प्रमाणात इंधनाची गरज भासते. मात्र, भारताकडे स्वतःचे इंधनसाठे मर्यादित असल्यामुळे देशाला सुमारे ८० ते ८५ टक्के इंधन परदेशातून आयात करावे लागते. इंधन ही अशी गोष्ट आहे की, जी कारखान्यात तयार करता येत नाही. ती पृथ्वीच्या पोटात नैसर्गिकरित्या तयार झालेली संपत्ती आहे आणि तिचे साठे जगातील काही मोजया देशांमध्येच आढळतात. त्यामुळे या देशांतून जगातील इतर देशांना इंधन पुरवठा केला जातो.
 
जगातील अनेक राजकीय आणि आर्थिक संघर्षांमागे इंधनसाठे हेही एक महत्त्वाचे कारण. ज्या देशांकडे मोठ्या प्रमाणावर तेलसाठे आहेत, ते देश इंधनाची निर्यात करून जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थांवर अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकतात. तेलाचा पुरवठा प्रामुख्याने समुद्री मार्गाने मोठ्या जहाजांद्वारे केला जातो. मध्य-पूर्वेतील होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वांत महत्त्वाचा तेलवाहतूक मार्ग मानला जातो. या मार्गातून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल जगभरातील देशांकडे व प्रामुख्याने भारताकडे पाठवले जाते. सध्या आखाती प्रदेशात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे होर्मुझ प्रदेशातून होणार्‍या तेलवाहतुकीवर परिणाम होऊ लागला आहे. जागतिक अर्थव्यवस्था आज परस्परांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्यामुळे जगाच्या कोणत्याही भागात संघर्ष किंवा युद्ध सुरू झाले, तर त्याचे परिणाम इतर देशांवरही दिसून येतात. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम होताना दिसतो. भारतातही या परिस्थितीचे काही परिणाम जाणवू लागले आहेत. काही ठिकाणी ‘एलपीजी’ गॅसच्या पुरवठ्यावर मर्यादा आली आहे.
 
भारतीय शासन या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांवर कोणताही गंभीर परिणाम होऊ नये, यासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजनादेखील केल्या जात आहेत. परंतु, युद्ध हे इतर देशांमधील असल्यामुळे ते थांबविणे भारताच्या हातात नाही. जेव्हा देशांमधील संवाद आणि सामंजस्य संपते, तेव्हा युद्धाची परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी कोणताही देश सहजपणे माघार घेत नाही आणि संघर्ष वाढत जातो.
 
अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागायला हवे व त्यासाठी पंतप्रधानांनी केलेले आवाहन अगदी योग्य असेच आहे. प्रत्यक्षात इंधनटंचाईची स्थिती अनेक देशांमध्ये या आधीच निर्माण झाली आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या काळात अनेक देशांचे दौरे करून भारताचे मित्रराष्ट्र वाढविले आहेत. भारतात इंधनटंचाई जाणवू नये, यासाठी शासनाने विविध योजना आखल्या व जगातील विविध मित्रराष्ट्रांची मदत घेऊन अद्यापपर्यंत भारतातील नागरिकांना या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा प्रतिकूल परिणाम जाणवू दिला नाही.
 
परंतु, आंतरराष्ट्रीय परिस्थिती अडचणीची झालेली असताना त्यासंदर्भात निर्माण झालेल्या अडचणीची जबाबदारी केवळ शासनावर टाकणे योग्य ठरणार नाही. देशाच्या अडचणीच्या काळात नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून वागणे आवश्यक आहे. देशाच्या व्यवस्थेवर ताण येऊ नये, यासाठी नागरिकांनीही शासनाच्या प्रयत्नांना साथ देणे गरजेचे आहे.
 
भारतासारख्या विशाल देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर इंधनावर अवलंबून आहे. जर आंतरराष्ट्रीय संघर्ष यापुढेही दीर्घ काळ चालू राहिला आणि तणाव कायम राहिला, तर इंधनाचा पुरवठा कमी होण्याची किंवा त्याची टंचाई निर्माण होण्याची शयता नाकारता येत नाही. त्यामुळे संकट निर्माण झाल्यानंतर उपाय शोधण्यापेक्षा आधीपासूनच इंधन बचतीची सवय लावणे अधिक योग्य ठरेल. आणि त्यामुळेच देशाच्या पंतप्रधानांनी योग्य असे आवाहन भारतीय नागरिकांना केले आहे.
 
आज रस्त्यावर आपण पाहतो की, अनेकजण आपल्या वैयक्तिक कारचा वापर करत असतात. परंतु, त्या कारमध्ये बहुतेक वेळा फक्त एकच व्यक्ती प्रवास करत असते. एका व्यक्तीसाठी संपूर्ण कार वापरणे म्हणजे इंधनाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होय. कारचे क्षेत्रफळ आणि त्यामध्ये बसणारी एक व्यक्ती याची तुलना बसच्या क्षेत्रफळाशी आणि बसमध्ये बसणार्‍या अनेक प्रवाशांशी केली, तर वाहतुककोंडी आणि इंधनाचा अपव्यय का होतो, याचे उत्तर सहज मिळते.
 
इंधन बचतीसाठी सर्वांत प्रभावी उपाय म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करणे. बस, रेल्वे, मेट्रो यांसारख्या साधनांचा वापर केल्यास एकाचवेळी अनेक लोक प्रवास करू शकतात. त्यामुळे तुलनेने कमी इंधन वापरून अधिक लोकांची वाहतूक करता येते आणि परिणामी इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होते.
 
जर वैयक्तिक वाहन वापरणे अत्यावश्यक असेल, तर ‘कारपूल’ पद्धतीचा अवलंब करता येतो. म्हणजेच एकाच दिशेने जाणार्‍या सहकार्‍यांना किंवा शेजार्‍यांना सोबत घेऊन प्रवास करणे. यामुळे इंधनाची बचत होतेच; शिवाय रस्त्यांवरील वाहनांची गर्दीही कमी होते.
 
सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे आरोग्यदायी फायदेही आहेत. घरापासून बसस्टॉप किंवा रेल्वे स्टेशनपर्यंत चालत जावे लागल्यामुळे थोडासा व्यायाम होतो. तसेच प्रवासादरम्यान स्वतः वाहन चालवण्याचा ताण नसल्यामुळे वाचन, विश्रांती किंवा इतर उपयुक्त कामे करता येतात. प्रशिक्षित चालकांमुळे प्रवास अधिक सुरक्षितही ठरतो.
 
इंधनाचा प्रश्न केवळ आर्थिक नाही, तर तो पर्यावरणाशीही संबंधित आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या वापरामुळे वायुप्रदूषण वाढते आणि त्याचा मानवी आरोग्यावर, तसेच पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढविल्यास प्रदूषण कमी होण्यासही मदत होते.
 
सध्याच्या तणावपूर्ण आंतरराष्ट्रीय परिस्थितीत केवळ शासनावर अवलंबून राहणे योग्य नाही. प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागून इंधनाचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच भीतीपोटी इंधन किंवा गॅसची साठेबाजी करणे किंवा काळाबाजाराला प्रोत्साहन देणे टाळले पाहिजे. अशा कृतींमुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
 
देशप्रेम म्हणजे नेहमीच युद्धभूमीवर जाऊन लढणे नव्हे. देश अडचणीत असताना आपल्या वागणुकीत आवश्यक बदल करणे आणि देशाच्या हितासाठी छोटे-छोटे प्रयत्न करणे, हेही देशसेवेचेच एक रूप आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीत इंधन, गॅस आणि विजेचा वापर जपून करणे आणि काटकसरीने वापरणे, हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे महत्त्वाचे नागरी कर्तव्य आहे.
 
महेश नाईक
(लेखक सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ व ‘सुरक्षित रस्ते वाहतूक-चालक प्रशिक्षण व नागरी कर्तव्ये’ या ‘विवेक प्रकाशन’ यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत.)