अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणाली;‘भारत फोरकास्ट सिस्टम’चा वापर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य-मंत्री गिरीश महाजन
22-May-2026
Total Views |
मुंबई : (Disaster Management Maharashtra) "अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणाली ‘भारत फोरकास्ट सिस्टम’चा वापर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असून हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यामध्ये मोठी सुधारणा होईल. यासाठी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था समवेत करार महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन क्षमतेला अधिक बळकट करणारा महत्त्वाचा टप्पा आहे." अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था , पुणे यांच्यासोबत सामंजस्य करार केला असून, यामुळे राज्याच्या आपत्तीपूर्व तयारी आणि अतिवृष्टीसारख्या हवामानाशी संबंधित संकटांना प्रतिसाद देण्याच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.
या करारामुळे भारत सरकारच्या भारतीय हवामान विभागाच्या ‘मिशन मौसम’ अंतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी ‘भारत फोरकास्ट सिस्टम’ आता राज्याच्या निर्णयप्रक्रियेत थेट वापरली जाणार आहे. राज्य आपत्कालीन कार्य संचालन केंद्र आणि भू-स्थानिक निर्णय सहाय्य प्रणाली यांच्या माध्यमातून ही प्रणाली कार्यान्वित केली जाईल.
या उपक्रमामुळे महाराष्ट्र देशातील असे पहिले राज्य ठरले आहे, ज्याने डेटा आणि कार्यप्रवाहांचा वापर करून आपत्ती व्यवस्थापन व पूर्वसूचना प्रणाली अधिक सक्षम केली आहे. भारत एफ एस प्रणाली ६ किमी × ६ किमी क्षेत्रासाठी अत्यंत सूक्ष्म आणि उच्च दर्जाचे हवामान अंदाज तयार करू शकते. त्यामुळे ग्रामपंचायत व उपतालुका स्तरापर्यंत अचूक हवामान माहिती उपलब्ध होणार आहे. याआधी उपलब्ध असलेल्या १२ किमी × १२ किमी अंदाजांच्या तुलनेत ही मोठी प्रगती मानली जात आहे.(Disaster Management Maharashtra)