मुंबई : (Devendra Fadnavis) अर्थव्यवस्थेच्या व्याप्तीबाबत महाराष्ट्र भारतातील इतर कोणत्याही राज्याशी स्पर्धा करत नसून, जगातील ३० वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. पुढील २ ते ३ वर्षांत महाराष्ट्र सिंगापूर आणि युएईच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
जिओ वर्ल्ड सेंटर येथे इमॅजिनेक्स २०२६ या कार्यक्रमात रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवत आहे. संशोधन, नवोपक्रम, पायाभूत सुविधा, आर्थिक उत्पन्न या क्षेत्रात महाराष्ट्राच्या जवळपास देशातील कुठलेही राज्य नाही. नवीन उद्योग, तंत्रज्ञानातरीत व्यवसाय आणि डाटा सेंटर आधारित उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही मजबूत परिसंस्था बनत आहे. त्यामुळे संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत आहे."(Devendra Fadnavis)
महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप, युनिकॉर्नची राजधानी
ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप आणि युनिकॉर्नची राजधानी आहे. २०१५ मध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे १४ लाख कोटी रुपयांची होती, ती आज ५४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या १० वर्षांत आपण अर्थव्यवस्थेचा आकार तिपटीहून अधिक वाढवला आहे. देशातील इतर अनेक राज्ये १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याबाबत बोलत आहेत, परंतू, सध्या केवळ महाराष्ट्रच या उद्दिष्टाच्या सर्वात जवळ आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या ६६० बिलियन डॉलरवर आहे. महाराष्ट्राचा सामान्य वृद्धी दर १० टक्के राहिला आहे. याच गतीने प्रगती कायम राहिल्यास, २०२५-२०२६ या वर्षातील 'अल् निनो'सारख्या नैसर्गिक आव्हानांमुळे थोडा फरक पडला तरी, आपण २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करू."
राज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवीन प्रणाली
मुख्यमंत्री म्हणाले की, "जर आपल्याला आर्थिक क्षेत्रात, व्यवसायात, उद्योगात आपले स्थान टिकवून ठेवायचे असेल, तर आपल्याला ' एआय'चा अवलंब अत्यंत वेगाने करावा लागेल. यासाठी महाराष्ट्र शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवीन विभाग तयार केला असून आयुक्तालय निर्माण केले आहे. शासनाने प्रशासनात 'एआय'चा वापर आधीच सुरू केला आहे. राज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवीन प्रणाली सुरू केली असून ज्याद्वारे फौजदारी न्याय व्यवस्थेत आणि आपल्या संपूर्ण गुन्हेगारी यंत्रणेच्या हाताळणीत अचूकता आणि गतिमानता आली आहे. गुन्ह्याच्या ठिकाणापासून ते दोषारोपपत्रापर्यंत सर्व प्रक्रिया डिजिटल झाली आहे."(Devendra Fadnavis)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....