पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध,भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी – मंत्री छगन भुजबळ; मे महिन्यात नेहमीपेक्षा २० टक्के अधिक पेट्रोल-डिझेल विक्री झाल्याची माहिती

    22-May-2026
Total Views |
Chhagan Bhujbal statement
 
मुंबई : (Chhagan Bhujbal statement) "गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे." अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
 
माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की, "राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल-डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे २० टक्के अधिक पेट्रोल-डिझेलची विक्री झाली आहे."
 
हेही वाचा :  महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा धोका; अशा परिस्थितीत स्वतःची काळजी कशी घ्यावी?
 
"केंद्र व राज्य शासन प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध करून देण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अफवा किंवा भीतीच्या वातावरणामुळे अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नाही,” असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
 
यावेळी त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील गेल्या काही दिवसांतील इंधन विक्रीची आकडेवारीही माध्यमांसमोर मांडली. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.(Chhagan Bhujbal statement)