मुंबई : (Artificial Intelligence Maharashtra) कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात एआय स्वीकारण्याची आवश्यकता आहे. मुंबई टेक वीकसारख्या उपक्रमांमुळे एआयमधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील एआय नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सह्याद्री अतिथिगृह येथे मुंबई टेक वीक २०२६ ची घोषणा केली. यावेळी ते बोलत होते. टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबईतर्फे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने, आयडीएफसी बँक आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित हा कार्यक्रम दि. २९ आणि ३० मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे.
'इंडिया : एआय इन एक्शन' या थीमअंतर्गत आयोजित मुंबई टेक वीक २०२६ मध्ये विविध क्षेत्रांतील एआयच्या प्रत्यक्ष वापराचे सादरीकरण होणार असून मेटा, एंथ्रॉपिक, ओपेनाई, गूगल क्लाउड आणि नेसा यांसारख्या कंपन्यांचा सहभाग असेल. यावेळी मुंबई टेक वीक लोगोचे अनावरणही करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "शासन विविध विभागांमध्ये एआयचा वापर करत असून एआयच्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम आणि परिणामकारक होत आहे. शासन या परिवर्तनात सर्वात मोठा भागधारक म्हणून सक्रिय भूमिका बजावत आहे. मुंबई टेक वीकसारख्या व्यासपीठांमुळे एआय संदर्भातील अनुभव लोकांपर्यंत अधिक व्यापक पातळीवर पोहोचतील. अधिकाधिक तरुण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक या उपक्रमाशी जोडले जात आहेत, ही सकारात्मक बाब आहे.
महाराष्ट्र शासन एआय क्षेत्रातील नवोन्मेष आणि उद्योगवृद्धीसाठी सदैव तुमच्या पाठीशी उभे आहे. गेल्या वर्षापेक्षा अधिक भव्य आणि प्रभावी मुंबई टेक वीक आयोजित करू आणि महाराष्ट्रातील युवकांना एआय क्षेत्रातील नव्या संधींशी जोडून त्यांना जागतिक पातळीवरील संधी उपलब्ध असेल."(Artificial Intelligence Maharashtra)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....