क्युबाचे ९४ वर्षांचे नेते राऊल कास्ट्रो यांच्याविरोधात अमेरिकेच्या फ्लोरिडा (मियामी) येथील फेडरल कोर्टाने २० मे रोजी नवीन ‘चार्जशीट’ सार्वजनिक केली. त्यांच्यावर अमेरिकन नागरिकांच्या हत्येचा कट, चारजणांची हत्या आणि नागरी विमानांचा जाणीवपूर्वक विनाश करणे, असे गुन्हे आहेत. यामागची पार्श्वभूमी काय असावी? क्युबाने रशियाशी जोडलेले नाते की, अमेरिकेच्या आर्थिक महत्त्वाकांक्षेला क्युबाच्या नेत्यांनी दिलेला खो? हा रंजक इतिहास पाहणे म्हणूनच महत्त्वाचे.
१४व्या शतकात स्पेनने क्युबावर पारतंत्र्य लादले. छळ आणि संक्रमणाचे आजार, यामुळे क्युबाचे आदिवासी मृत्युमुखी पडले. लोकसंख्या कमी झाली म्हणून स्पेनने आफ्रिकेहून आदिवासींना इथे आणून वसवले. त्यांना गुलाम बनवले. त्यांचे जबरदस्तीने धर्मांतरण केले (मात्र, त्या लोकांनी ‘सानेतेरीया’ नावाचा गुप्त धर्म स्थापन केला, तो आजही ते मानतात). त्या त्रासाला, गुलामगिरीला कंटाळून क्युबातल्या लोकांनी स्पेनविरोधात हल्ला चढवला. १९०२ साली अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे क्युबा स्पेनपासून स्वतंत्र झाला. याबदल्यात क्युबाच्या अंतर्गत बाबींमध्ये कधीही हस्तक्षेप करण्याचा अधिकार अमेरिकेला मिळाला. तसेच अमेरिकेने तिथला ‘ग्वांतानामो बे’ हा नौदल तळ कायमचा ठेवून घेतला.
क्युबामध्ये त्यानंतर सातत्याने अमेरिकेच्या हातातले बाहुले असलेले सरकार स्थापन झाले. बतिस्ताच्या काळात अमेरिकन माफिया (गँगस्टर्स), उद्योगपती आणि श्रीमंतांचे क्युबावर पूर्ण नियंत्रण होते. क्युबाची राजधानी ‘हवाना’ ही अमेरिकनांसाठी जुगार आणि चैनीचे केंद्र बनली होती, तर दुसरीकडे क्युबातील सामान्य जनता प्रचंड गरिबी, बेरोजगारी आणि भूकबळीने होरपळत होती.
याला विरोध म्हणून फिडेल कास्ट्रो यांचे नेतृत्व उभे राहिले; तर त्यांचा भाऊ राऊल कास्ट्रो, तसेच चे गव्हेरा यांनीही क्युबामध्ये सत्तापालट व्हावा, म्हणून आक्रमक पद्धतीने काम केले. क्युबाचे तत्कालीन बतिस्ता सरकार कोसळले. १९५९ साली फिडेल कास्ट्रो सत्तेत आले. त्यावेळी देशात ८० टक्के कंपन्या अमेरिकन होत्या. कास्ट्रो यांनी अमेरिकन कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले. मात्र, अमेरिकेला कसलीच भरपाई दिली नाही. या सत्ताकाळात सरकारविरुद्ध बोलण्याची किंवा लिहिण्याची कोणालाही परवानगी नव्हती. सर्व खासगी वर्तमानपत्रे, रेडिओ आणि टीव्ही चॅनेल्स बंद करून सरकारच्या नियंत्रणाखाली आणले गेले. सरकारवर टीका करणार्यांना ‘अमेरिकेचे हस्तक’ मानून अटक केल. कास्ट्रो सरकारने सक्तीच्या कामगार छावण्या सुरू केल्या. जे लोक ‘कम्युनिस्ट’ विचारसरणीत बसत नव्हते, समलिंगी होते किंवा धर्म पाळायचे; त्यांना इथे ठेवले जाई (कम्युनिस्ट राजवटीत धर्म पाळायलाही बंदी होती.). क्युबामध्ये प्रत्येक गल्ली ‘सीडीआर’ नावाच्या सरकारी समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. या समित्यांचे काम सरकारविरुद्ध कोण काही बोलतोय का, यावर पाळत ठेवणे होते. विरोध करणार्यांच्या जमिनी, घरे आणि बँकांमधील पैसे सरकारने जप्त केले. अमेरिकेपासून सुरक्षा म्हणून कास्ट्रो यांनी रशियाची मदत घेतली. रशियाने क्युबाला जणू दत्तकच घेतले. तसेच क्युबाला अमेरिकेविरोधातले तळ बनवले. रशियाची आणि क्युबाची ही गळाभेट अमेरिकेच्या गळ्यात काट्यासारखी रुतत होती. त्यामुळे लाखो क्युबन नागरिकांना आपले घरदार सोडून समुद्राच्या मार्गाने जीव मुठीत धरून अमेरिकेत (फ्लोरिडा) पळून जावे लागले.
अमेरिकेची छोटी विमाने अशा लोकांना विस्थापनासाठी मदत करत. ९०च्या दशकात अशाच दोन विमानांना राऊल यांनी नष्ट केले, असा अमेरिकेचा आरोप आहे. तसेच अमेरिकेमध्ये ‘ड्रग्ज’ पाठवण्यासाठी कोलंबियाच्या ड्रग्ज-माफियांना राऊल कास्ट्रो सरकारने मदत केली, असा गुन्हाही अमेरिकेने दाखल केला. पण, प्रश्न असा आहे की, अनेक दशकांपूर्वीच्या घटना अमेरिका आता का उकरून काढत आहे? याचे उत्तर आहे, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्यावरही अमेरिकेने आरोप करत कारवाई केली. तशीच कारवाई राऊल यांच्याविरोधात झाली, तर क्युबाचे ‘कम्युनिस्ट’ सरकार कोसळेल आणि तिथे अमेरिकाधार्जिणे सरकार सत्तेत येईल, असा संकेत दिसत आहे. यासाठीच का अमेरिकेने भूतकाळ उकरला?
९५९४९६९६३८