तनुच्छायाभिस्ते तरुण-तरणि-श्रीसरणिभि-
र्दिवं सर्वा-मुर्वी-मरुणिमनि मग्नां स्मरति यः
भवन्त्यस्य त्रस्य-द्वनहरिण-शालीन-नयनाः
सहोर्वश्या वश्याः कति कति न गीर्वाण-गणिका ॥१८॥
आदि शंकराचार्य विरचित ‘सौंदर्यलहरी‘मधील हा एक अत्यंत अनुपम श्लोक आहे. या श्लोकात ‘अरुणा ध्यान विधी’ हा विधी करण्यासाठी, आवश्यक असणारी वैचारिक बैठक आणि हे ध्यान केल्याचे फळ यावर भाष्य केले आहे.
शब्दार्थ रूपाने या श्लोकाचा विचार केला, तर आचार्य या श्लोकात देवीच्या ‘अरुण रूपा’चे ध्यान करण्याचे फळ सांगत आहेत. आचार्य म्हणतात, "हे जगदंबे, तुझ्या अरुण रूपाचे जो साधक ध्यान करतो, त्याला जगातील सर्वच सुखे प्राप्त होतात. ज्यांचे नेत्र अत्यंत चंचल आहेत, ज्या अत्यंत सुंदर आहेत, अशा उर्वशीसमान दैवी अप्सरासुद्धा त्याला वश होतात.”
अरुण रूपाच्या ध्यानाचे असे अनुपम फळ का प्राप्त होते, याचे रहस्य देवीच्याच अरुण रूपात आहे. देवीचे अरुण रूप हे तिच्या प्रकटीकरणाचे आणि विश्वाच्या सृजनाच्या आरंभाचे स्वरूप आहे.
काश्मीरच्या शैव परंपरेत, विशेषतः अभिनव गुप्तांच्या प्रत्यभिज्ञा दर्शनात, शिव हे एकमेव परम सत्य आहे हा सिद्धान्त प्रमाण आहे. शिवाने आपल्या स्वातंत्र्यशक्तीने, हे संपूर्ण विश्वच स्वतःमधूनच प्रकट केले आहे. जसे आरशात प्रतिबिंब दिसते, तसेच विश्व शिवाच्या चैतन्यातही प्रकट होते. परंतु, आरशाचे प्रतिबिंब खरे नसते. तर, येथे विश्व खरेच आहे, फक्त ते शिवापासून वेगळे नाही. अद्वैत वेदांतात जग हे मायेमुळे भासते, म्हणजे ते मिथ्या आहे, असत् आहे. परंतु काश्मीर शैव मत वेगळे आहे. येथे जग नाकारले जात नाही. जग मिथ्या नसून, ते शिवाचाच विलास आहे. शिव स्वतःच विश्वरूपाने नृत्य करतो, म्हणूनच येथे जगाला ‘विश्वाभास चैतन्याचा प्रकाशमय अविष्कार’ म्हणतात. हे दर्शन अधिक समावेशक आहे.
’विश्वाभास’ ही काश्मीर शैव तत्त्वज्ञानातील एक अत्यंत गहन आणि जीवनस्वीकारक संकल्पना आहे. विश्व आणि आभास या दोन शब्दांच्या संयोगातून निर्माण झालेला हा शब्द सांगतो की, संपूर्ण सृष्टी ही परम चैतन्याची, शिवशक्तीची एक दिव्य प्रकाशमय अभिव्यक्ती आहे. जसा सूर्य स्वतःच्याच प्रकाशात जग उजळवतो, तसेच परम शिव आपल्याच चैतन्यशक्तीने हे विश्व प्रकट करतात. हे विश्व बाहेरून निर्माण केलेले नाही, तर शिवाने स्वतःमधूनच, स्वतःच्या स्वातंत्र्यशक्तीने, स्वतःच्या आनंदासाठी हे सारे विश्वनाट्य रचले आहे.
अद्वैत वेदांत जगाला मायामय आणि मिथ्या मानतो. परंतु, काश्मीर शैव परंपरा त्यापुढे जाऊन सांगते की, हे जग मिथ्या नाही, ते शिवाचाच विलास आहे, त्याचाच स्पंद आहे. अभिनव गुप्तांच्या प्रत्यभिज्ञा दर्शनात सांगितले जाते की प्रत्येक अणु-परमाणुमध्ये, प्रत्येक भावात, प्रत्येक अनुभवात शिवच प्रकट होतो. म्हणून येथे जगाचा त्याग नाही, तर जगातच परमाचे दर्शन हीच खरी साधना आहे. जो साधक हे जाणतो, त्याच्यासाठी प्रत्येक क्षण एक दिव्यच प्रकटीकरण होतो.
विश्वाभासाची अनुभूती साधकाची दृष्टी आमूलाग्र बदलून टाकते. त्याच्यासाठी पवित्र-अपवित्र, सुंदर-कुरूप, जड-चेतन हे भेद विरघळतात. वार्याची झुळूक, नदीचा प्रवाह किंवा माणसाचे हास्य असो, प्रत्येकात त्याला शिवशक्तीचाच स्पर्श जाणवतो. त्याच्या अंतरात एक शांत, स्थिर आनंद वास करू लागतो; कारण तो सर्वत्र आपल्या मूळ चैतन्याला ओळखतो. ही ओळखच ‘प्रत्यभिज्ञा’, म्हणजे पुन्हा स्वतःला जाणण्याचा क्षण. जगाकडे पाठ फिरवण्यात नव्हे, तर जगात परमेश्वराचा साक्षात्कार घेण्यातच विश्वाभासाचे खरे फळ आहे. सारे विश्व एक चैतन्याचा महोत्सव आहे, हेच विश्वाभास सिद्धांताचे रहस्य आहे!
या विश्वाभासात विश्वाचा ‘प्रकटीकरण बिंदू’ म्हणजे, सूर्योदयाच्या वेळी सर्वत्र पसरणारा अरुणवर्ण. या अरुणवर्ण रूपाने श्री ललिता देवी अर्थात शक्ती प्रकट होते. मग तिच्या या स्वरूपाचे ध्यान करणे, ही क्रिया तुम्हाला विश्वोत्पत्तीच्या बिंदूशी संलग्न करते, जिथून या संपूर्ण सृष्टीचा उद्भव झाला आहे. या बिंदूवर शिवशक्तीच्या ऐय स्वरूपाचे ध्यान, चिंतन हे परम फलदायी आणि सिद्धिप्रदायक आहे. या ध्यानाच्या माध्यमातूनच, साधक आत्मस्वरूपाला प्राप्त होतो आणि तो या सृजन बिंदूवर स्वतःच्या चेतनेला स्थिर करतो. याने त्याची प्रज्ञा जागृत होऊन, तो वास्तवात ‘विश्वाभास’ ही संकल्पना वास्तवात अनुभवतो.
हा ‘अरुण ध्यान विधी’ आणि त्याचे फळ खाली दिली आहेत. ही एक उच्चकोटीची ‘अमृत साधना’ आहे. यात प्रकृतीच्या सर्वांत अनुपम स्वरूपाशी तादात्म्य पावण्याचा प्रयास साधक करतो. ‘अरुण ध्यान’ ही श्रीविद्या उपासनेतील सर्वांत दिव्य साधना असून, तिचे फळसुद्धा तसेच दिव्य आहे.
‘अरुण ध्यान’ म्हणजे काय?
‘अरुण ध्यान’ ही श्रीविद्या उपासना परंपरेतील, एक अत्यंत प्राचीन आणि फलदायी साधना आहे. ‘अरुण’ म्हणजे उगवत्या सूर्याचा तो दिव्य लालिम-सोनेरी प्रकाश, जो अंधार संपल्यावर आणि तीव्र उजेड येण्यापूर्वीच्या त्या पवित्र संधिक्षणी प्रकट होतो. देवी त्रिपुरसुंदरीचा वर्ण याच अरुण प्रकाशासारखाच मानला जातो. तिची कांती बालसूर्यासारखी कोमल, उष्ण, सर्वव्यापी आणि चैतन्यदायी आहे. ‘अरुण ध्यान’ म्हणजेच या दिव्य अरुण कांतीशी, अर्थात देवीच्या परम चैतन्यशक्तीशी आपले मन एकरूप करण्याची साधना होय. हे केवळ एक दृश्य ध्यान नाही, तर ती एक संपूर्ण अनुभूती आहे. यामध्ये साधकाचे संपूर्ण अस्तित्वच त्या अरुण प्रकाशात विरघळून जाते.
‘अरुण ध्यान’ कसे केले जाते?
ही साधना सूर्योदयापूर्वी-ब्राह्ममुहूर्तावर सुरू करावी. साधकाने शुद्ध आसनावर पूर्वाभिमुख बसावे. प्रथम काही वेळ दीर्घ श्वासोच्छ्वासाने मन शांत करावे. त्यानंतर डोळे हळूवारपणे मिटावेत आणि भ्रूमध्यावर - आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करावे. तेथे एक कोमल, उबदार अरुण प्रकाशबिंदू प्रकट होत असल्याची भावना करावी. हळूहळू तो प्रकाश संपूर्ण मस्तकात, छातीत आणि अंततः संपूर्ण शरीरात पसरत असल्याचे अनुभवावे. सोबत ‘ॐ ऐं ह्रीं श्रीं’ या श्रीविद्या बीजमंत्राचे मानसिक उच्चारण करावे. सूर्योदयाच्या वेळी उघड्या डोळ्यांनी क्षितिजावरील अरुण प्रकाशाकडे पाहताना, देवीच्या अरुण स्वरूपाचे स्मरण करावे. बाह्य आणि आंतरिक अरुण एकच आहे, ही भावना दृढ करावी.
किती काळ करावे?
सुरुवातीला किमान २१ दिवस सतत हे ध्यान करावे. दररोज किमान २१ ते ४८ मिनिटे ही साधना करणे आवश्यक आहे. श्रीविद्या परंपरेत या साधनेचा पूर्ण परिपाक होण्यासाठी, ४१ दिवसांचा अनुष्ठान क्रम सांगितला जातो. नियमितता हाच या साधनेचा आत्मा असल्याने, एकही दिवस खंड पडू नये.
अरुण ध्यानाचे फळ आणि सिद्धी
या साधनेचे फळ बहुआयामी आहे. साधारण स्तरावर साधकाचे मन अत्यंत शांत, एकाग्र आणि प्रसन्न होते. चिंता, भय आणि नैराश्य यांचा क्षय होतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वात एक नैसर्गिक तेज आणि आकर्षण निर्माण होते. ‘सौंदर्यलहरी’त वर्णन केल्याप्रमाणे, लोक त्याच्याकडे आपोआप आकर्षित होतात. आध्यात्मिक स्तरावर साधकाला वाक्सिद्धी प्राप्त होते. त्याचे बोलणे प्रभावी आणि सत्यवचनी होते. साधकाला ‘त्रिकालज्ञान’ म्हणजे भूत-वर्तमान-भविष्याची सूक्ष्म जाण येऊ लागते, तसेच त्याची अंतःप्रेरणाही तीव्र होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, साधकाला स्वसंवेदन म्हणजे आत्मसाक्षात्काराची प्रत्यक्ष अनुभूती होण्याची शयता अधिक प्रबळ होते. तो जाणतो की, बाहेरचा अरुण प्रकाश आणि आत जळणारी आत्मज्योती एकच असून, हीच विश्वाभासाची परमोच्च अनुभूती आहे.
अशा साधकाला या मार्गावरून संभ्रमित करण्यासाठी माया जो खेळ रचते, तो खेळ म्हणजेच अनेक सुंदर अप्सरा त्याला वश होतात. परंतु, हे वशीकरण साधकाला मार्गावरून संभ्रमित करण्यासाठी असते. परम सात्विक साधक जर या मोहात अडकला नाही, तर त्याला आत्मज्ञान प्राप्त होते, हे आचार्य इथे सूचकपणाने सांगत आहेत.
(क्रमश:)
सुजीत भोगले
९३७००४३९०१