गंगा दशहरा : एक आध्यात्मिक शोध!

    21-May-2026
Total Views |
 
Ganga Dussehra Spiritual Significance
  
भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना मातृत्वाचा दर्जा दिला गेला आहे. यामध्ये ‘गंगा’ हे नाव अग्रक्रमाने येते. गंगा ही भारताची आध्यात्मिक ओळख, सांस्कृतिक संचित आणि कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान. गंगेचा उगम स्वर्गातून झाला आणि ती पृथ्वीवर अवतरली, तो पावन दिवस म्हणजे ‘गंगा दशहरा.’ या दिवसाच्या पावन स्मृती आणि गंगेच्या स्तुतीसाठी रचलेले ‘गंगा लहरी’ हे महाकाव्य, जणू भक्ती आणि साहित्याचा अप्रतिम संगम आहे. गंगा दशहरा पर्वाची सुरुवात ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा अर्थात दि. १७ मे पासून सुरुवात झाली. त्यानिमित्ताने गंगेच्या त्या दिव्य अवतरणाची कथा आणि तिच्या महिमेचा पंडितराज जगन्नाथांच्या काव्यरूपी हृद्य अर्घ्याद्वारे घेतलेला मागोवा...
 
हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ शुल दशमी हा दिवस ‘गंगा दशहरा’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी आपल्याला पौराणिक काळात जावे लागते. इक्ष्वाकु वंशाचा राजा सगर याने, अश्वमेध यज्ञ केला. या यज्ञाचा अश्व इंद्राने चोरून कपिल मुनींच्या आश्रमात लपवला. अश्व शोधात गेलेल्या सगरच्या ६० हजार पुत्रांनी कपिल मुनींचा अपमान केल्याने, मुनींच्या क्रोधाग्नीत ते भस्म झाले. या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी, गंगेचे पावन जल पृथ्वीवर आणणे आवश्यक होते.
 
राजा सगराचे वंशज दिलीप आणि अंशुमन यांनी तपस्या केली, पण त्यांना यश आले नाही. अखेर राजा भगीरथाने आपले सर्व राज्य सोडून, हिमालयात कठोर तपश्चर्या केली. त्याच्या निष्ठेवर प्रसन्न होऊन, ब्रह्मदेवाने गंगेला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा दिली. मात्र, गंगेचा वेग इतका प्रचंड होता की, ती पृथ्वीचाही नाश करू शकली असती. त्यामुळे भगीरथाने पुन्हा भगवान शिवाची आराधना केली. शिवाने गंगेचा वेग आवरण्यासाठी तिला आपल्या जटांमध्ये स्थान दिले. त्यानंतर शांत झालेली गंगा, हिमालयाच्या दर्‍याखोर्‍यातून भगीरथाच्या रथामागे वाहात आली आणि तिने सगर पुत्रांचा उद्धार केला. ज्या दिवशी गंगा पृथ्वीवर अवतरली, तो दिवस म्हणजेच ‘गंगा दशहरा.’
 
‘दशहरा’ या शब्दाचा अर्थ आहे, दहा पापांचे हरण करणारा. ‘गंगा दशहरा’च्या दिवशी गंगेत स्नान केल्याने, मनुष्याचे दहा प्रकारचे दोष नष्ट होतात अशी श्रद्धा आहे. यामध्ये तीन शारीरिक पापे (हिंसा, चोरी, परस्त्रीगमन), चार वाचिक पापे (कठोर बोलणे, खोटे बोलणे, चहाडी आणि विसंगत बडबड) आणि तीन मानसिक पापे (परयाच्या धनाचा लोभ, दुसर्‍याचे वाईट चिंतणे आणि नास्तिय) यांचा समावेश होतो. या दिवशी गंगेचा प्रवाह जणू मानवाच्या केवळ शरीरालाच नाही, तर त्याच्या अंतरात्म्यालाही स्वच्छ करतो. हा निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक संस्कार आहे.
 
गंगेच्या याच पापमोचनी रूपाचे सर्वांत सुंदर आणि साहित्यिक वर्णन म्हणजे ‘गंगा लहरी.’ या काव्याची निर्मिती १७व्या शतकात झाली. याचे निर्माते होते, पंडितराज जगन्नाथ. पंडितराज हे मुघल सम्राट शहाजहानच्या दरबारातील कविराज होते. ते जितके महान कवी होते, तितकेच मोठे व्याकरणकार ही होते. त्यांच्या गंगा लहरी काव्याविषयी अनेक अख्यायिका प्रसिद्ध असून, त्यापैकी एक पुढीलप्रमाणे.
 
पंडितराज एका मुस्लीम राजकन्येच्या प्रेमात पडले आणि त्यांनी तिच्याशी विवाह केला. या कृतीमुळे त्यांच्यावर टीका झाली. तत्कालीन समाजाने त्यांना ‘अपवित्र’ ठरवून, गंगेच्या घाटावर येण्यास बंदी घातली. आपला सन्मान धुळीला मिळालेला पाहून आणि समाजाचा तिरस्कार सहन न झाल्यामुळे, पंडितराज आपल्या पत्नीसह गंगेच्या काठावर बसले. त्यांनी मनाशी निश्चय केला की, जर मी खरोखरच गंगेचा भक्त असेन, तर गंगामाताच माझा उद्धार करेल. तिथे बसून त्यांनी गंगेची स्तुती करणारे श्लोक रचण्यास सुरुवात केली. हेच ते प्रसिद्ध ‘गंगा लहरी’ काव्य.
 
‘गंगा लहरी’ हे ५२ श्लोकांचे एक रत्न आहे. संस्कृत साहित्यात ‘लहरी’ काव्यांची एक परंपरा असून, ज्यात भक्ती आणि शृंगाराचा सुरेख संगम असतो. पंडितराजांनी हे काव्य ‘शिखरिणी’ वृत्तात रचले आहे. ‘शिखरिणी’ हे असे वृत्त आहे, ज्याचा नाद गंगेच्या प्रवाहाप्रमाणे लहरी निर्माण करतो. या काव्यातील शब्दरचना इतकी प्रभावी आहे की, वाचक जेव्हा हे श्लोक वाचतो, तेव्हा त्याला आपल्या समोर गंगेच्या लाटा उसळताना भासतात.
 
काव्याचा प्रारंभ अत्यंत विनम्रतेने होतो. पंडितराज म्हणतात की, "हे गंगे, तू ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून निघाली आहेस, शंकराच्या जटांत विसावली आहेस, तू देवांची तहान भागवणारी आहेस.” पण जसजसे काव्य पुढे जाते, तशी कवीची आर्तता वाढते. ते गंगेला विचारतात, "जर तू केवळ सज्जनांचा आणि ऋषीमुनींचा उद्धार करत असशील, तर त्यात तुझे मोठेपण काय? तुझे खरे मातृत्व तर माझ्यासारख्या पतित आणि तिरस्कृत पुत्राचा उद्धार करण्यातच आहे.” हा अधिकारवाणीने केलेला संवाद, साहित्याच्या दृष्टीने अत्यंत उच्च दर्जाचा ठरतो. पंडितराज गंगा घाटाच्या ५२व्या पायरीवर बसले होते. जसा त्यांनी पहिला श्लोक म्हटला, तशी गंगा एका पायरीने वर चढली. ५२ श्लोक पूर्ण होता होता, गंगामाता ५२ पायर्‍या वर आली आणि तिने पंडितराज व त्यांच्या पत्नीला आपल्या कुशीत सामावून घेतले.
 
‘गंगा दशहरा’ आणि ‘गंगा लहरी’ यांची सांगड घातली, तर एक सुंदर चित्र उभे राहते. ‘गंगा दशहरा’ हा सामूहिक श्रद्धेचा सण आहे, जिथे हजारो लोक एकत्रितपणे गंगेची पूजा करतात. तर, ‘गंगा लहरी’ हे एका व्यक्तीच्या आंतरिक संघर्षातून आणि शुद्धीकरणातून जन्मलेले काव्य आहे.
 
गंगेला आपण ‘त्रिपथगा’ म्हणतो; कारण ती स्वर्ग, पृथ्वी आणि पाताल अशा तिन्ही लोकांत वाहते. त्याचप्रमाणे ‘गंगा लहरी’ हे काव्यही भक्ताला या तिन्ही स्तरांवर शांती प्रदान करते. या काव्यातील उपमा आणि रूपके, संस्कृत साहित्यातील अलंकारांचे लेणे आहेत. त्यातील उत्कृष्ट वर्णनांमुळेच हे काव्य वाचक आणि भक्त दोघांच्याही हृदयाला भिडते. आजच्या युगात जेव्हा आपण गंगेच्या प्रदूषणाबद्दल चर्चा करतो, तेव्हा ‘गंगा दशहरा’ आणि ‘गंगा लहरी’ यांसारखे विषय आपल्याला गंगेच्या आध्यात्मिक मूल्याची जाणीव करून देतात. आपण ज्या नदीला ‘माता’ म्हणतो, जिच्या सौंदर्यावर महाकाव्ये रचतो, तिला स्वच्छ राखणे हे आपले परम कर्तव्य आहे.
 
‘गंगा दशहरा’ आणि ‘गंगा लहरी’ ही भारतीय मनाची दोन अविभाज्य अंगे आहेत. एक कथेच्या रूपात आपल्याला पूर्वजांचा इतिहास सांगते, तर दुसरे काव्याच्या रूपात आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवते. गंगेचा हा प्रवाह अनादि काळापासून प्रवाही असून, अनंत काळापर्यंत प्रवाहीच राहील. पंडितराज जगन्नाथांच्या शब्दांत सांगायचे तर, गंगा ही केवळ पाणी नसून ती एक ’अमृताची धार’ आहे, जी तहानलेल्या आत्म्यांना तृप्त करते.
 
जेव्हा एखादा भक्त ‘गंगा दशहरा’च्या पहाटे गंगेच्या पात्रात उभा राहून ‘गंगा लहरी’चे पठण करतो, तेव्हा त्याला भगीरथाची तपश्चर्या आणि पंडितराजांची आर्तता एकाचवेळी जाणवते. गंगेचे ते शीतल जल जीवनातील सर्व लेश, पापे आणि दुःखे दूर करण्याची शक्ती त्यामध्ये असते. म्हणूनच, गंगेचा हा महिमा भारतीय वाङ्मयातील एक सुवर्णपान आहे, जे पिढ्यान्पिढ्या आपल्याला पवित्रतेचा आणि निष्ठेचा संदेश देत राहील.
 
आसावरी पाटणकर