तबल्याच्या थापांतून घडलेला ‘सर्जन’

    21-May-2026   
Total Views |
Dr Kedar V Muthe
 
‘ओरल सर्जरी’सारख्या अत्यंत सूक्ष्म कौशल्याच्या क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय कार्य करणारे आणि त्याच वेळी तबल्याच्या थापांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे डॉ. केदार व्ही. मुठे यांच्याविषयी...
 
डॉ. केदार व्ही. मुठे मूळचे अमळनेरचे. लहानपणापासूनच घरात संगीताचे वातावरण. त्यांचे वडील वसंतराव मुठे हे स्वतः तबलावादक होते. त्यांनी श्री. बर्‍हाणपूरकर यांच्याकडे तबल्याचे शिक्षण घेतले. परंतु, केदार लहानपणापासूनच तबल्याकडे आकर्षित झाले आणि त्यांच्या हातातल्या लयीची जादू वडिलांनी ओळखली. त्यानंतर स्वतःचे वादन कमी करून त्यांनी मुलाच्या जडणघडणीकडे पूर्ण लक्ष दिले. केदार यांच्या आईलाही संगीताची आवड होती, तर धाकटे बंधू रवींद्र मुठे सतारवादनात प्रवीण झाले. अशा संगीतप्रधान वातावरणात डॉ. मुठे यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. त्यांनी १९७१ मध्ये मुंबई विद्यापीठातून ‘मास्टर ऑफ डेंटल सर्जरी’ ही पदवी प्राप्त केली. पुढे ‘ओरल सर्जन’ म्हणून त्यांनी मोठे नाव कमावले. महाराष्ट्रातील विविध दंत महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक, प्राचार्य आणि सांस्कृतिक विभागप्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले. शासकीय दंत महाविद्यालय, मुंबई येथे तब्बल १४ वर्षे सांस्कृतिक विभागप्रमुख आणि वसतिगृहप्रमुख म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर संस्कारही दिले.
 
लहानपणी अमळनेरला शाळेत असताना शाळेतील शिक्षकांनी केवळ पारंपरिक औपचारिक पुस्तकी शिक्षणाचा आग्रह धरीत, अभ्यासकेंद्री दृष्टी ठेवीत, "तू हा तबला वाजवण्याचा रिकामटेकडा उद्योग सोडून अभ्यासाकडे लक्ष दे. उगाच ढोल वाजवीत फिरू नकोस,” असा आगंतुक सल्ला केदार यांना दिला होता. पण, वडिलांची शिक्षण संस्कारांकडे पाहण्याची दृष्टी अधिक निकोप असल्याने त्याचा त्यांना फायदा झाला. अशातच वडिलांचाही खंबीर पाठिंबा असल्याने बालपणीच तबलावादनाच्या साधनेला खीळ बसण्याचा संघर्षपूर्ण प्रसंग टळला आणि आंतरशालेय संगीत स्पर्धेत अव्वल स्थान मिळवता आले. त्यानंतर त्यांच्या प्रगतीचा उंचावलेला आलेख पाहून, ज्या शिक्षकांनी संगीतसाधनेची उपेक्षा केली होती, त्यांच्याच मुलांना तबलावादन शिकवण्याची संधी डॉटरांना द्यावी लागल्याने; हा बालवयात केदार यांना मिळालेला मोठा सन्मानच म्हणावा लागेल. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळाच रुबाब दिसतो; गौरवर्ण, उत्साही चेहरा, नेटया पोशाखाची आवड, डोळ्यांवर शोभणारा चष्मा आणि अत्यंत मृदू भाषण. समोरच्याला सहज जिंकून घेणारी त्यांची संवादशैली अनेकांना आपलेसे करते. लौकिक, मान-सन्मान किंवा प्रसिद्धीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःच्या आनंदी आणि समाधानी जीवनमार्गात ते रमले. त्यांच्या स्वभावातील आणखी एक मोठा गुण म्हणजे मनात आकस न ठेवणे. ही सकारात्मक वृत्तीच त्यांना एक उत्तम ‘सर्जन’ आणि तितकाच ‘विनम्र कलाकार’ बनवते.
 
आज वयाच्या ८७व्या वर्षीही डॉ. केदार मुठे यांची ओळख ‘एक कुशल ओरल सर्जन आणि सिद्धहस्त तबलावादक’ अशीच आहे. तबल्याचे प्राथमिक शिक्षण वडिलांकडून घेतल्यानंतर त्यांनी पुढील तालीम पंडित तारानाथजी यांच्याकडे घेतली. अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी तबल्याची साथ करण्यास सुरुवात केली. त्यांच्या आयुष्यातील एक संस्मरणीय प्रसंग म्हणजे बालगंधर्वांना साथ करण्याची संधी. त्या मैफिलीपूर्वी स्वतः बालगंधर्वांनी त्यांना ‘बालगंधर्व ठेका’ शिकवला आणि केदार यांनी तो इतया सहजतेने आत्मसात केला की, मैफील रंगून गेली. संगीतविश्वातील आणखी एक थरारक प्रसंग म्हणजे संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्यासोबतची साथ. एका कार्यक्रमात तबलजी गैरहजर राहिल्यामुळे नय्यरसाहेब अस्वस्थ झाले होते. तेव्हा धीर करून डॉ. मुठे यांनी "मी तबलासाथ करू का,” असे विचारले. "आप तबला बजाना जानते हैं?” असे विचारत नय्यरसाहेबांनी त्यांना संधी दिली. डॉ. मुठे यांनी अत्यंत समर्थ साथ करून सर्वांना प्रभावित केले. आनंदित झालेल्या नय्यरसाहेबांनी स्वतः सही केलेली १०० रुपयांची नोट त्यांना भेट म्हणून दिली; त्या काळात ती मोठी गौरवाची गोष्ट होती. त्यांनी हरिभाऊ घांग्रेकर, ए. कानन, मालविका कानन, बालगंधर्व, पं. जितेंद्र अभिषेकी, फिरोज दस्तूर, माणिक वर्मा, प्रभा अत्रे, पं. राम मराठे, सुरेश हळदणकर यांसारख्या दिग्गज कलाकारांना तबलासाथ केली. मुंबई, पुणे, नाशिक, गोवा, कोलकाता, जळगाव, धुळे, अमळनेर अशा अनेक ठिकाणी त्यांनी ‘सोलो’ तबलावादन केले. वैद्यकीय क्षेत्रातही त्यांचे योगदान तेवढेच महत्त्वाचे आहे. भारतातील विविध विद्यापीठांत परीक्षक, ‘डीएनबी बोर्डा’चे को-ऑर्डिनेटर, पेपर सेटर आणि परीक्षक म्हणून त्यांनी काम केले. लिबियातील ‘बेंगाझी डेंटल इन्स्टिट्यूट’मध्ये प्राध्यापक म्हणूनही त्यांनी सेवा दिली. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये ‘डेंटल कॅम्प’चे आयोजन करून ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. त्यांच्या या बहुआयामी कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. डॉ. केदार मुठे हे केवळ डॉटर नाहीत, केवळ तबलावादकही नाहीत; ते दोन वेगवेगळ्या क्षेत्रांना एकत्र आणणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. शस्त्रक्रियेतील स्थिर हात आणि तबल्यावर थिरकणारी बोटे या दोन्हींच्या संगमातून त्यांनी आयुष्याची एक सुंदर लय निर्माण केली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने अनेक शुभेच्छा!
 
(अधिक माहितीसाठी संपर्क - ९९२०५४७८४६)




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक