भोपाळच्या ट्विशा शर्माचा १२ मे रोजी मृत्यू झाला. ती ‘मिस पुणे’ होती. ‘मॉडेलिंग’ करायची. काही तुरळक चित्रपटांत तिने कामही केले होते. थोडक्यात, ती घराच्या चार भिंतींबाहेर पडून स्वतःची आवड जपणारी आणि त्यासाठी काम करणारी मुलगी होती. तिचे राहणीमान आधुनिक होते. ट्विशाची ओळख समर्थ सिंहशी सोशल मीडियावरून झाली. तो वकील, तर त्याची आई निवृत्त न्यायाधीश. त्या दोघांनी विवाह केला. मात्र, सहा महिन्यांतच ट्विशाचा मृत्यू झाला. सासरचे म्हणतात, "ट्विशाला अमली पदार्थाचे व्यसन होते आणि ती नैराश्यात होती. तिने स्वतःच आत्महत्या केली.” तर, ट्विशाच्या माहेरच्यांचे म्हणणे, "ट्विशाला सासरचे उपाशी ठेवायचे. तिचा मानसिक, शारीरिक छळ करायचे. सासरच्यांनीं तिचा खून केला.” ट्विशाने हे माहेरच्यांना मेसेजद्वारे सांगितले, हे सिद्ध झाले. यावर वाटते की, माहेरच्यांना तिची परिस्थिती कळलेली होती, तरी त्यांनी तिची सुटका का केली नाही? लग्न झालेली लेक सासर सोडून माहेरी आली, तर लोक काय म्हणतील म्हणून?
‘ज्या घरात जाशील, तिथून तुझी तिरडी बाहेर येऊ दे,’ असा सल्ला आजही मुलींना दिला जातो. लग्न झाल्यावर मुलीची सासरी पाठवणी करताना पालक म्हणतात, ‘जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा’. मुलगी सासरी नांदते. पण, काहीवेळा सासरी मुलीचा अनन्वित छळ होतो. अशा वेळी माहेरच्यांनी, ‘मुलगी दिली तिथे मेली’ हा विचार सोडून, त्याचक्षणी मुलीला मदत करायला हवी. ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ या काव्यपंक्तीच्या आधी ‘गंगा-जमुना डोळ्यांत उभ्या का?’ ही काव्यपंक्ती आहे. मुलगी सुखी राहावी वाटत असेल, तर मुलीच्या डोळ्यांत आलेल्या (खर्या, खोट्या नाही) अश्रूंची कहाणी विचारायलाच हवी! आजकाल अशाही घटना आहेत, ज्यामध्ये सासरच्यांवर खोट्या घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आजही घरगुती हिंसेच्या बळी जाणार्या मुलींची संख्या जास्त आहे. याबाबत माहेरच्यांनी विचार करायला हवा. लग्न झाले म्हणजे मुलीचा माहेरशी संबंध तुटला आणि त्या परक्या ग्रहावर गेल्या, असे तर होत नाही ना! मुलीच्या सासरी ढवळाढवळ नको. पण, सासरी त्यांना त्रास असेल; तर किमान माणूस म्हणून तिला सर्वतोपरी सहकार्य करायलाच हवे. ट्विशा किंवा पुण्याच्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातून हे शिकायलाच हवे.
‘हू केअर्स’ ते ‘ऑल लॉस्ट’
स्री-पुरुष आणि किन्नर ही सगळी माणसे असून, ती सामाजिक न्यायाच्या कक्षेत समान आहेत, हे निर्विवाद सत्य. आज स्त्री कोणत्याही क्षेत्रात पुरुषापेक्षा कमी नाही. पण, पुरुषांसारखे व्हावे या अट्टाहासापोटी अनेक मुली, महिला या भलत्याच वाटेवर जाताना दिसतात. दारू पिणे, सिगारेट ओढणे, हुक्का मारणे, अमली पदार्थांचे व्यसन करणे, हे काय फक्त पुरुषच करू शकतात का? आम्ही का नाही? असे म्हणत, रस्त्याच्या कडेला भकाभका सिगारेटी फुंकत, एका हातात बियरचा कॅन सांभाळणार्या युवती सर्रास दिसून येतात. व्यक्तिस्वातंत्र्य आहे, हे मान्य आहे. पण, स्त्रीच नव्हे; तर पुरुषांनीही अशा व्यसनांना बळी पडू नये, असे वाटते.
कालपरवाच मुंबईच्या सायन बस थांब्यावर २१-२२ वर्षांच्या दोन युवती आणि एक युवक दिसला. हाफ पॅन्ट, लो टी-शर्ट, हाडाची काडे आणि डोळ्याभोवती काळी वर्तुळे, सिगारेटीवर सिगारेटी फुंकत होते. फुंकलेल्या सिगारेटचे आदान-प्रदान होत होते. त्यांच्या बोलण्यातून कळले होते की, ते उच्चशिक्षण घेत होते. परीक्षा संपल्यावर त्यातल्या एका युवतीला गावी जायचे नव्हते. कारण, गावी तिला मुक्तपणे व्यसन करता येणार नव्हते. ती म्हणत होती, आई-बाबांना सोडून कायमच शहरात येणार आहे, तर, दुसर्या युवतीचे म्हणणे, ‘मम्मी-पप्पा अडवतात. पण, हू केअर्स?’ युवक म्हणत होता, ‘लक्ष द्यायचे नाही. काय करणार ते? ऐश करो यार!’ त्यांना पाहून वाटले, हा युवक कुणाचा तरी मुलगा आहे, पुढे कुणाचा तरी पती असेल; तसेच या मुली कुणाच्या तरी मुली आहेत, कुणाच्या तरी सुना होतील, पत्नी होतील. यांचे भविष्यातील वैवाहिक जीवन कसे असेल? सगळ्या जबाबदार्या झटकून, ‘हू केअर्स? काय वाट्टेल ते होवो, ऐश करो’ ही मनोवृत्ती यांचात कशी आली? त्यांची मानसिकता कशी बदलेल? माणूस सुधारू शकतो, या आशेवर विश्वास ठेवून अशा लोकांमध्ये सकारात्मक समाजशील भावना कशी निर्माण करायची? ‘हू केअर्स’ची मानसिकता येऊच नये, यासाठी प्रयत्नपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे. कारण, ‘हू केअर्स’वाले भविष्यात ज्यांच्या आयुष्यात जाणार, त्यांच्या आयुष्याचे तर मातेरेच होणार. त्यामुळेच ‘हू केअर्स’चे पर्यवसान ‘एव्हरीथिंग लॉस्ट’मध्येच होत असते.
९५९४९६९६३८