संयुक्त राष्ट्रसंघात भारताकडून पाकिस्तानची बोलती बंद! दहशतवादाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा जोरदार फटकारले

    21-May-2026   
Total Views |

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारताने दहशतवादाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. संयुक्त राष्ट्रसंघात भारताने पाकिस्तानची बोलतीच बंद केली. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी पाकिस्तानवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. पाकिस्तानवर प्रहार करताना त्यांनी म्हटले की, ज्या देशाचा इतिहास नरसंहार आणि हिंसाचाराने भरलेला आहे, त्या देशाला भारताच्या अंतर्गत बाबींवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. इतकेच नव्हे, तर सीमापार दहशतवादाबाबत भारताने संयुक्त राष्ट्रांत कठोर संदेश देत दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांना जबाबदार धरण्याची मागणी केली.

संयुक्त राष्ट्रांमध्ये गुरुवारी भारताने 'अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्र सहाय्य मोहीम' (यूएनएएमए) च्या अहवालाचा दाखला देत सांगितले की, २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांत पाकिस्तानच्या लष्कराच्या सीमापार कारवाया आणि एअर स्ट्राइकांमुळे अफगाणिस्तानात ७५० नागरिक ठार किंवा जखमी झाले. यूएनएएमए च्या मते ९५ पैकी ९४ घटनांसाठी पाकिस्तानी सुरक्षा दल जबाबदार होते.

भारताने पुढे सांगितले की, याच वर्षी रमजान महिन्यात मार्चमध्ये पाकिस्तानने काबूलमधील ‘ओमिद अॅडिक्शन ट्रीटमेंट हॉस्पिटल’वर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात २६९ नागरिक ठार झाले, तर १२२ जण जखमी झाले. भारताने सांगितले की, हा हल्ला तरावीह नमाजानंतर करण्यात आला, जेव्हा लोक मशिदीतून बाहेर पडत होते.

भारताने १९७१ मधील ‘ऑपरेशन सर्चलाइट’चाही उल्लेख करत पाकिस्तानवर टीका केली. भारताने म्हटले की, पाकिस्तानने स्वतःच्या नागरिकांविरोधात नरसंहार केला आणि सुमारे ४ लाख महिलांवर सामूहिक अत्याचार घडवून आणले. भारताने आरोप केला की, पाकिस्तान आपली अंतर्गत अपयशे लपवण्यासाठी हिंसा आणि प्रचाराचा आधार घेत आला आहे. यूएनएएमए नुसार, पाकिस्तानच्या सीमापार हिंसाचारामुळे ९४ हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.

दरम्यान, पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान दहशतवादाच्या मुद्द्यावर भारतावरच आरोप केले. पाकिस्तानच्या प्रतिनिधी सायमा सलीम यांनी दावा केला की, भारत दहशतवाद आणि आक्रमकतेचा आधार घेत आंतरराष्ट्रीय कायद्याची पायमल्ली करत आहे आणि त्यामुळे संपूर्ण प्रदेशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीर आणि सिंधू जल कराराचा मुद्दाही उपस्थित केला. पी. हरीश यांनी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय मानवतावादी जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप करत कडाडून टीका केली. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानने काश्मीरमधील मानवाधिकारांबाबत बोलण्यापूर्वी स्वतःकडे पाहावे.






ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक