मुंबई : (BDD Chawl News) वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पूर्ण झालेल्या पुनर्वसन इमारत क्र. १ मधील 'एफ', 'जी' व 'एच' विंग मध्ये एकूण ८२७ पात्र रहिवाशांना पुनर्वसन सदनिकांच्या वितरणास गुरुवार, दि. २१ मे पासून वरळीतील सुमेर केंद्र इमारतीच्या म्हाडा साईट कार्यालयात प्रारंभ करण्यात येणार आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास (BDD Chawl News) प्रकल्प राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता म्हाडा सुकाणू अभिकरण (नोडल एजन्सी) आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामधील पुनर्वसन इमारत क्र. १ मधील विंग 'एफ', 'जी' व विंग 'एच' या विंगला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले असून सदर विंगमधील एकूण ८२७ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मंडळातर्फे करण्यात येणार असून, यावेळी सर्व पात्र रहिवाशांना वितरण पत्र प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ०६ वाजता सार्वजनिक सुट्टी सोडून सदर वितरण पत्रांचे वाटप केले जाणार आहे. वितरण पत्र/ ताबा स्वीकारतेवेळी लाभार्थ्यांनी पुनर्वसन सदनिका करारनामा, आधार कार्ड व पॅन कार्डची छायांकीत प्रत, संक्रमण शिबीर सदनिकाधारकांचे हमीपत्र (रु. ५००/- च्या स्टँप पेपरवर नोंदणीकृत नोटरी केलेले), सदनिकाधारकांचे पासपोर्ट साईजचे ३ नविन रंगीत फोटो, पुनर्वसित सदनिकेमध्ये सोबत वास्तव्य करणा-या कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो (पोस्टकार्ड साईज) या आवश्यक कागदपत्रांसह रहिवाशांनी व्यक्तीशः उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.(BDD Chawl News)
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील इमारत क्रमांक ०१ मधील डी व ई विंग मधील ५५६ पुनर्वसन सदनिकांचे वितरण दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, दिवंगत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. त्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त होणार्या पुनर्वसन इमारतीतील सदनिकांचे वितरण टप्प्याटप्प्याने केले जात आहे. (BDD Chawl News)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.