ममता सरकारचा ओबीसी फॉर्म्युला रद्द; बंगालमध्ये आता फक्त ७% आरक्षण!

    20-May-2026   
Total Views |
 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पश्चिम बंगालमधील शुभेंदू अधिकारी सरकारने ओबीसी आरक्षणाच्या यादीत आणि नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या निर्णयानुसार राज्यातील ओबीसी आरक्षण १७ टक्क्यांवरून कमी करून ७ टक्के करण्यात आले आहे. हा निर्णय २०२४ मध्ये आलेल्या कलकत्ता उच्च न्यायालय च्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले होते की, राज्यात केवळ ७ टक्के ओबीसी आरक्षण वैध राहील आणि त्याअंतर्गत फक्त ६६ प्रवर्गांनाच आरक्षणाचा लाभ मिळू शकेल.

बंगालमध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यापूर्वी राज्यात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे सरकार होते. त्या काळात ओबीसी आरक्षण दोन गटांमध्ये विभागण्यात आले होते. पहिला ‘ओबीसी-ए’ गट, ज्यामध्ये ४९ जातीय गटांचा समावेश होता आणि दुसरा ‘ओबीसी-बी’ गट, ज्यात ९१ जातीय गटांचा समावेश करण्यात आला होता. या दोन गटांना अनुक्रमे १० टक्के आणि ७ टक्के आरक्षण दिले जात होते.

ममता सरकारने आरक्षण यादीचा विस्तार करण्याच्या नावाखाली अनेक मुस्लिम समाजघटकांना ओबीसी यादीत समाविष्ट केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, आता भाजप सरकारने १० टक्के आरक्षणाची श्रेणीच रद्द केली असून राज्यात एकूण ओबीसी आरक्षण फक्त ७ टक्केच राहणार आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच शुभेंदू अधिकारी सरकारने बंगालमध्ये धर्माच्या आधारावर दिले जाणारे सर्व सरकारी भत्ते आणि अनुदानित कार्यक्रम बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. सरकारने स्पष्ट केले की, माहिती व संस्कृती विभाग तसेच अल्पसंख्याक व्यवहार आणि मदरसा शिक्षण विभागांतर्गत धर्माच्या आधारावर चालवल्या जाणाऱ्या योजना आता बंद करण्यात येतील.

२०१० पूर्वीची ओबीसी यादी पुन्हा लागू
शुभेंदू अधिकारी सरकारने नवीन अधिसूचना जारी करत २०१० पूर्वीची ओबीसी यादी पुन्हा लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार, सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील आरक्षण पुढेही त्याच यादीच्या आधारे दिले जाईल. त्या काळातही ६६ जातीय गटांनाच सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ७ टक्के आरक्षणाचा लाभ देण्याची तरतूद होती.






ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक