गेल्या चार दशकांपासून ‘सेवा परमो धर्मः’ हे ब्रीदवाक्य केवळ शब्दांत न ठेवता, प्रत्यक्ष कृतीत उतरवणारी डोंबिवलीतील एक अग्रगण्य संस्था म्हणजे ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट.’ ‘रोटरी क्लब’ने कार्याचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. हा क्लब न थांबता, न थकता आपले कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. संस्थेच्या या प्रवासावर टाकलेला प्रकाश...
डोंबिवली शहरात गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ सातत्याने समाजसेवा करणारा ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट’ हा रोटरी जिल्हा ३ हजार, १४२ मधील एक मान्यताप्राप्त आणि सक्रिय क्लब आहे. दि. २५ जून १९८५ रोजी स्थापन झालेल्या या क्लबने स्वतःपेक्षा ‘सेवा’ या तत्त्वावर काम करत डोंबिवली आणि परिसरात अनेक उपक्रम राबवले आहेत. ३०० पेक्षा अधिक सदस्य असलेला हा क्लब आपल्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कार्यामुळे विशेष ओळख निर्माण करून आहे.
डोंबिवली पूर्व येथील रोटरी भवनातून हा क्लब कार्यरत आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, युवक विकास, महिला सक्षमीकरण आणि समाजकल्याण या विविध क्षेत्रांत क्लब सातत्याने काम करतो. सध्या अध्यक्ष रो. डॉ. संदीप घरत आणि मानद सचिव रो. विनायक आगटे यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत. माजी प्रांतपाल डॉ. उल्हास कोल्हटकर यांचे मार्गदर्शन क्लबला सतत मिळत असून त्यामुळे कामाला योग्य दिशा मिळते. डोंबिवली शहरात असलेल्या १८ रोटरी क्लब्स आणि संपूर्ण जिल्ह्यातील सुमारे ११० क्लब्समध्ये ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट’ वेगळा ठरतो, तो त्याच्या मोठ्या सदस्यसंख्येमुळे आणि प्रभावी, व्यापक प्रकल्पांमुळे.
आरोग्य क्षेत्रात क्लबने महत्त्वपूर्ण काम केले आहे. नियमित रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, थॅलेसेमिया जनजागृती आणि कर्करोग रुग्णांसाठी साहाय्य अशा उपक्रमांद्वारे समाजाला मदत केली जाते. तसेच क्षयरोग रुग्णांसाठी ‘निःक्षय मित्र’ योजनेअंतर्गत पोषण साहाय्य देण्यात येते. आश्रय चॅरिटेबल रुग्णालयात दहा खाटांचा अतिदक्षता विभाग उभारण्यासाठी ‘डॉक्टर आचार्य लॅबोरेटरी’कडून ‘सीएसआर’अंतर्गत आर्थिक मदत मिळाली असून त्यामुळे गरजू रुग्णांना कमी खर्चात दर्जेदार उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे. याशिवाय डायलिसिस केंद्र आणि थॅलेसेमिया रक्त संक्रमण केंद्रामुळे अनेक रुग्णांना नियमित उपचाराची सोय झाली आहे. यावर्षी ग्लोबल ग्रँटच्या माध्यमातून ६४ हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या असून, आतापर्यंत २३७ बालकांच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत करून अनेक कुटुंबांना दिलासा देण्याचे महत्त्वपूर्ण काम क्लबकडून करण्यात आले आहे.
शिक्षण क्षेत्रातही क्लब सक्रिय आहे. विद्यार्थ्यांना शालेय पिशव्या, अभ्यासासाठी साहित्य, ई-लर्निंग संच आणि क्रीडा साहित्य देण्यात येते. शाळांमध्ये आवश्यक सुविधा उभारण्यासाठी मदत केली जाते. शालेय क्रीडा स्पर्धा आणि बालमेळा यांसारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. गेल्या पाच वर्षांत क्लबने मुरबाड परिसरातील सुमारे दहा झेडपी शाळांमध्ये वॉश ( Water, Sanitation and Hygiene) प्रकल्प पूर्ण केले आहेत, ज्यासाठी प्रत्येकी सुमारे १४-१५ लाख रुपये खर्च झाले. या प्रकल्पांमुळे विशेषतः मुलींच्या शाळेतील उपस्थितीत मोठी सुधारणा झाली आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी सायकल वितरण प्रकल्प राबवण्यात येतो. यामुळे लांबच्या शाळेत जाणार्या मुलींना मोठा आधार मिळतो आणि त्यांचा शिक्षणातील सहभाग वाढतो.
पर्यावरण संवर्धनासाठी क्लबचे काम विशेष उल्लेखनीय आहे. रोटरी चिल्ड्रन्स पार्क (रोटरी गार्डन) हे उद्यान शहरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. येथे वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम आणि पर्यावरण जपण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. यावर्षी दोन हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून तुळशी बाग, फुलपाखरू उद्यान, औषधी वनस्पती यांचा समावेश करण्यात आला आहे. आज या उद्यानात सुमारे २५० प्रौढ झाडे असून हे उद्यान शहराच्या फुप्फुसाप्रमाणे काम करते. येथे सकाळी पक्षी आणि फुलपाखरे दिसणे ही एक आनंददायी गोष्ट आहे. अनेक प्रकारचे पक्षी व फुलपाखरे येथे सदैव विहार करीत असतात. विशेष म्हणजे, डोंबिवलीत इतक्या उत्तम प्रकारे राखलेले सार्वजनिक उद्यान दुसरे नाही.
प्लास्टिकचा वापर कमी करणे, एकदाच वापरल्या जाणार्या वस्तू टाळणे आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे यावर क्लब भर देतो. शाळांमध्येही याबाबत जनजागृती केली जात आहे. ‘इंटरॅक्ट क्लब’च्या माध्यमातून २३ शाळांमध्ये हरित धोरण राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे.
समाजातील दुर्बल घटकांसाठीही क्लबने अनेक उपक्रम राबवले आहेत. दिव्यांग व्यक्तींना त्रिचक्र वाहन देणे, विशेष मुलांसाठी कार्यक्रम आयोजित करणे आणि थॅलेसेमिया रुग्णांना मदत करणे यामुळे अनेक कुटुंबांना आधार मिळत आहे. या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
युवकांच्या विकासासाठी क्लब विविध कार्यक्रम आयोजित करतो. व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व विकास आणि सामाजिक जाणीव वाढवण्यासाठी उपक्रम घेतले जातात. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित केले जातात. या माध्यमातून अनेक युवकांना नोकरीच्या संधी मिळतात. तसेच करिअर मार्गदर्शन शिबिरांमधून विद्यार्थ्यांना योग्य दिशा दिली जाते. कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही क्लब सक्रिय आहे. विविध स्पर्धा आणि उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना आणि युवकांना आपले गुण दाखवण्याची संधी मिळते. साप्ताहिक सभांमध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना बोलावून मार्गदर्शन दिले जाते, ज्यामुळे सदस्यांचे ज्ञान वाढते. समाजात चांगले कार्य करणार्या व्यक्तींचा सन्मान करून इतरांना प्रेरणा दिली जाते.
गेल्या काही वर्षांत क्लबने ग्रामीण भागातही काम वाढवले आहे. शाळांमध्ये स्वच्छता सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावर्षी मुरबाडजवळील असोसे येथे उभारण्यात आलेल्या लघु बंधार्यासाठी ‘अभीटेक एनर्जीकॉन लिमिटेड’ या कंपनीकडून ‘सीएसआर’अंतर्गत सहकार्य मिळाले असून हा बंधारा ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पाणीसाठा वाढून परिसरातील शेतकर्यांना मोठा लाभ होणार आहे.
क्लबच्या साप्ताहिक सभांमध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना आमंत्रित करून व्याख्याने आयोजित केली जातात. उद्योग, आरोग्य, शिक्षण, व्यवस्थापन, पर्यावरण यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन मिळते. यामुळे सदस्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक ज्ञान सतत वृद्धिंगत होते. समाजातील आणि विविध व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी क्लब दरवर्षी ‘की व्होकेशनल एक्सलन्स अॅवॉर्ड’ प्रदान केला जातो. या पुरस्कारांद्वारे समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा गौरव केला जातो आणि इतरांना प्रेरणा दिली जाते. एकूणच, ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट’ हा समाजासाठी सातत्याने काम करणारा आणि प्रेरणा देणारा क्लब आहे. सदस्यांची मेहनत, नेतृत्वाची दूरदृष्टी आणि समाजासाठीची बांधिलकी यांमुळे हा क्लब दिवसेंदिवस प्रगती करत आहे. डोंबिवलीकरांच्या सहकार्यामुळे हे सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवले जात असून भविष्यातही अशाच प्रकारे समाजसेवेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा क्लबचा प्रयत्न राहणार आहे. रोटरी वर्ष दि. १ जुलै ते दि. ३० जून असे असते आणि दरवर्षी दि. १ जुलैपासून नवीन संचालक मंडळ कार्यभार स्वीकारते.
(अधिक माहितीसाठी संपर्क : ९३२१६५८५७१)