नोआखाली ते संदेशखाली - भाग १ - इतिहासातील जखमा आणि हिंदूंचा प्रतिकार

    20-May-2026   
Total Views |

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पदावरून हाकलवून देत जबरदस्तीने देशाबाहेर पलायन करायला 'भाग पाडून सत्तापरिवर्तन करणाऱ्या जिहादी आंदोलनकारींचा विखारी, अत्यंत विकृत चेहरा जगाने पाहिला आणि जग काही काळ स्तब्ध झाले. याचा सर्वांत जास्त परिणाम भोगावा लागतोय, तो तेथील हिंदूंना आणि त्यातही हिंदू महिलांना. हिंदू धर्माची सर्वार्थाने विटंबना सुरू आहे आणि असह्य असलेल्या हिंदूंना कोणीच वाली उरलेला नाही. या पार्श्वभूमीवर मन अत्यंत विदीर्ण झाले.

अन्याय, अत्याचाराची आता सहनशीलता संपल्यानंतर हिंदूंनी प्रतिकार करण्यास सुरू केलेला आहे आणि इतिहास पुन्हा एकदा जागृत होत आहे. जेव्हा जेव्हा हिंदूंनी आपल्या असलेल्या शक्तीनिशी प्रतिकार केला, तेव्हा तेव्हा भेकड असलेली धर्मांध शक्ती पराभूत झाली. फाळणीची शोकांतिका समजून घेण्यासाठी १९४७ पर्यंत मागे जावे लागेल. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अंतिम टप्प्यात बॅरिस्टर जिनांच्या धडक कृती आदेशानुसार (म्हणजे हिंदूंवर प्रत्यक्षपणे सर्व प्रकारचे अत्याचार करा) उसळलेल्या जातीय दंगलीत त्यावेळेच्या पश्चिम बंगालमधील नोआखालीच्या हिंदूंवरील अमानुष अत्याचार थांबविण्यासाठी महात्मा गांधी स्वतः तेथे थांबले होते. त्यांच्याबरोबर असलेल्या सुचेता कृपलानी (ज्यांना पुढे भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला) त्यांनी त्या कालखंडातील अत्यंत विदारक अनुभव लिहलेले आहेत.

त्यात त्या म्हणतात, "प्रत्यक्ष हिंसाचार रोखण्यासाठी गांधीजी मुसलमानांना कोणतीही गोष्ट सांगत नव्हते. सांगितले, तरी मुस्लीम त्यांचे ऐकतही नव्हते. यातून निराश होऊन गांधीजी उलट हिंदूंना मुस्लीम अत्याचाराचा कोणताही विरोध अथवा सामना न करता होणारा अन्याय सहन करण्यास आणि मुस्लिमांना आपले बंधू समजून त्यांना समजून घेण्यास सांगत होते."

सर्वत्र असा प्रकार चाललेला होता आणि गुंड तर महात्माजींना न जुमानता पूर्व, पश्चिम पाकिस्तान धर्माच्या नावाने वेगळा करण्यासाठी, हिंदूंमध्ये येन-केन प्रकारेण दहशत निर्माण करत होते. बरोबरीने काँग्रेसवर आपले दडपण आणण्यासाठी आणि थकलेल्या काँग्रेस नेतृत्वाला उसंत न देण्यासाठी अधिक बर्बरतेने हिंदूंची घरे जाळत होते. बायका, मुली उचलून नेत होते. त्यांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगत होते. त्यावेळेसही गांधीजी "मी अहिंसेच्या मार्गाने त्यांच्यामध्ये मतपरिवर्तन करू शकतो," असे म्हणत नोआखालीमध्ये ठिय्या देऊन बसले होते.

दि. १४ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान वेगळा झाला, भारत खंडित झाला. ज्या महात्म्याने १९२० पासून आपल्या विविध माध्यमातून स्वातंत्र्य जवळ आणले, तो भारतीय स्वातंत्र्याचा सोहळा पाहण्यास हजर नव्हता, हे केवढे दुर्दैव. परंतु, त्याहीपेक्षा त्या त्यागाने आणि गांधीजींच्या अहिंसेचा कोणताही परिणाम मुसलमान समाजावर होत नव्हता. त्यावेळेला गांधीजींच्या बरोबर असलेल्या माझ्यासह अन्य महिलांच्या बाबतीतील सुरक्षा पाहून मी चिंतित होते.

परिस्थिती इतकी भयानक होती की, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली पण आम्ही महिला सुरक्षित नव्हतो आणि जर आपण असुरक्षित झालो, त्या लांडग्यांच्या तावडीत सापडलो, तर अब्रू वाचविण्यासाठी विष घेऊन आपण आपले आयुष्य संपवून टाकू इतका भीतीदायक संकल्प करून सोबत विषाची कुपी घेऊन, अब्बू वाचवत केवळ गांधीर्जीच्या श्रद्धेपोटी त्या नोआखालीमध्ये त्यांच्यासोबत फिरत होतो. तसेच, हजारो मृत्यू, भीषण किंकाळ्या, मदतीचा फोडलेला टाहो आमच्या डोळ्यांत, कानांत आणि अंतर्मनात साठवत अपयशाने शेवटी गांधींसह आम्ही परतलो होतो.

१९४७ मध्ये जिहादी धर्माच्या नावावर वेगळा पाकिस्तान निर्माण झाला. परंतु, धर्मअंतर्गत जेमतेम २४ वर्षे काय तो एकत्रित राहिला आणि १९७१ मध्ये बांगलादेशाच्या नावाने 'भुके कंगाल' आणखी एक जिहादी देश भारताच्या मानगुटीवर मित्र बनून स्वार झाला.

गेल्या ५० वर्षांत भारताने सर्व बाबतीत मैत्री कायम ठेवली आणि त्यांनी घुसखोरी, गैरकानूनी धंदे, अत्याचार, बजबजपुरी सर्व प्रकारचे जिहाद यामार्फत त्याचे पांग फेडले. देशात अनेक राज्यांत लोकसंख्येचे असंतुलन झालेले आहे. हिंदू आणि जिहादी यांच्यामध्ये असंतोषाचे बीज कायमचे रुजलेले आहे. यात विशेष करून पश्चिम बंगाल, केरळम्मध्ये कम्युनिस्ट पार्टी आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसने केलेले राज्य हे हिंदूंसाठी कर्दनकारी ठरले.

- शरद चव्हाण




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक