नीट पेपरफुटीचा मास्टरमाईंड शिवराज मोटेगावकर, पेपर फोडण्यासाठी पॅनेलमध्ये पेरली माणसं, स्मरणशक्तीच्या आधारे प्रश्न बाहेर

    20-May-2026
Total Views |
mumbai tarun bharast

मुंबई : (NEET Paper Leak Mastermind) नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या शिवराज मोटेगावकरला अटक केल्यानंतर, त्याच्या मालकीचे असलेले राज्यभरातील आरसीसी क्लासेस अडचणीत आलेले आहेत. पुण्यातील आरसीसी क्लासेसला महापालिकेनं सील ठोकलेले आहे. दिल्लीतील राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीएच्या मुख्य कार्यालयातूनच या पेपरफुटीचे प्रश्न बाहेर आले असण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे. नीटने पश्नपत्रिका तयार करण्यासाठी नेमलेल्या अनुभवी प्राध्यापकांनीच हे प्रश्न बाहेर पाठवले असल्याचा संशय व्यक्त होतो आहे. या सगळ्या पेपरफुटीचा सूत्रधार शिवराज मोटेगावकर असल्याचे सांगण्यात येते आहे. (NEET Paper Leak Mastermind)
शिवराज मोटेगावकर मास्टरमाईंड

आरसीसी क्लासेसचा मालक असलेला शिवराज मोटेगावकर याने हे सगळं षडयंत्र घडवून आणल्याचा प्राथमिक संशय तपास यंत्रणांना आहे. पेपरफुटी घडवून आणण्यासाठी सुनियोजित प्रयत्न मोटेगावकरनं केल्याचं तपासात समोर येते आहे. मोटेगावकरच्या क्लासमध्ये यापूर्वी शिकवणारे पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरे या दोन प्राध्यापकांना एनटीएच्या प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्या पॅनलवर बसवण्यासाठी मोटेगावकरनं प्रयत्न केले आणि ते यशस्वीही ठरले.वर्षानुवर्षे विषय शिकवणाऱ्या कुलकर्णी आणि मांढरे यांना प्रश्न तोंडपाठ होते. (NEET Paper Leak Mastermind)

प्रश्न तोंडपाठ करुन मोटेगावकरपर्यंत पोहचवले

प्रश्नपत्रिका सेट केल्यानंतर डेटा चोरीला जाण्याचे समोर येऊ नये यासाठी या दोघांनीही प्रश्न तोंडपाठ केले किंवा कागदाच्या चिठ्ठ्यांवर लिहून ते मोटेगावकरपर्यंत पोहचवले असल्याचा संशय आहे. या हस्तलिखितांची पीडीएफ मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये होती, त्यानं बाहेर ती कोट्यवधींना विकल्याची माहिती आहे. ३ मे रोजी परीक्षा संपल्य़ानंतर मोटेगावकरनं त्याच्या मोबाईलमधील डेटा डिलिट केला होता, सीबीआयनं सायबर तज्ज्ञांच्या मदतीनं हा डेटा रिकव्हर केल्यानंतर मोटेगावकरला अटक करण्यात आली आहे. (NEET Paper Leak Mastermind)

एकट्या पी व्ही कुलकर्णीने फोडले १३२ प्रश्न

नीट परीक्षेत एका विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे चार संच केले जातात. त्यानंतर इंग्रजीतून त्याचे इतर भाषांत भाषांतर करण्यात येते. याच संधीचा फायदा घेत पी व्ही कुलकर्णी याने रसायनशास्त्राच्या इंग्रजी प्रश्नांचा मराठी अनुवाद करताना तब्बल १३२ प्रश्न मोटेगावकरला दिल्याचेही समोर आले आहे. तीन संचाच्या भाषांतराची जबाबदारी कुलकर्णीकडे होती. त्यात १३५ प्रश्न होते, त्यातील १३२ प्रश्न त्याने मोटेगावकरपर्यंत पोहचवले. (NEET Paper Leak Mastermind)