काल मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील गरीबनगरात अतिक्रमणविरोधी धडक कारवाई करण्यात आली. रेल्वेने स्थानिक प्रशासनाच्या साहाय्याने तब्बल ७०० अनधिकृत झोपड्यांवर बुलडोझर फिरवला. या भागात यापूर्वीही अशा कारवाया झाल्या असल्या, तरी कालची कारवाई ही आतापर्यंतची सर्वांत मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई म्हटली जाते. दुमजली, तीनमजली अशा अगदी रेल्वे पुलाला खेटून असलेल्या टोलेजंग झोपड्या जमीनदोस्त केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे खरेतर आभार मानायला हवे. कारण, उशिरा का होईना, त्यांना जाग आली. अशा कारवायांसाठी जी राजकीय इच्छाशक्ती लागते, ती याच भागांतून मते घेणार्या उद्धव ठाकरेंकडे कधी नव्हतीच. कारण, शेवटी ही त्यांचीच हक्काची मतपेढी. पण, सध्याच्या सरकारने नुसत्या तोंडाच्या वाफा न दवडता, घुसखोरांच्या वस्तीवर हातोडा चालवला. पण, प्रत्यक्ष कारवाईनंतर बेघर झालेले हे हजारो अवैध घुसखोर किंवा विशिष्ट समुदायाचे लोक नेमके जातात तरी कुठे? याकडेही समाजसुरक्षेच्या दृष्टिकोनातून लक्ष हवेच.
झोपड्या उद्ध्वस्त झाल्यानंतर घुसखोर तो परिसर सोडून अख्ख्या मुंबईभर किंवा आसपासच्या शहरांमध्येही हातपाय पसरतात. रस्त्यांच्या पदपथांवर, अन्य झोपडपट्ट्या, वस्त्या, समुद्रकिनारे, रेल्वे स्थानके अशी जिथे जागा मिळेल, तिथे ते आपला नव्याने संसार थाटतात. वांद्रे पूर्वेतून हुसकवले, तर ते ‘पॉश एरिया’ असलेल्या वांद्रे पश्चिमेचा मार्ग धरतात. त्याचाही मागे व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे पुन्हा मुंबईची सुरक्षाच धोक्यात येते. पाकीटमार, महिलांची छेडछाड, घरफोडी असे गुन्हेगारीचे प्रकार या घुसखोरांना रस्त्यांवर मोकाट सोडल्यामुळे संभवतात. त्यामुळे अशा अतिक्रमणविरोधी कारवाईनंतर त्यांच्या प्रत्यार्पणापर्यंत ‘डिटेन्शन सेंटर’ किंवा ‘ट्रान्झिट कॅम्प’मध्ये ठेवणे, त्यांच्या नागरिकत्वाची पडताळणी करणे आणि नंतर त्यांचे परदेशात प्रत्यार्पण करणे, अशी ही सगळी कायदेशीर प्रक्रिया. परंतु, या संपूर्ण प्रक्रियेच्या, कारवाईच्या निश्चितच काही मर्यादा आहेत. त्यांचाही विचार प्रशासनाने करणे क्रमप्राप्त.
एकीकडे घुसखोरांवर कारवाईचा वेग देशभरात वाढला असला, तरी आपल्या प्रशासकीय व्यवस्था, पोलीस यंत्रणांना प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेलाही गतिमान करावे लागेल, हेही तितकेच खरे!
घुसखोर जाहले उदंड...
कालच्या वांद्य्राच्या कारवाईत ७०० अनधिकृत झोपड्यांवर बुलडोझर फिरवला गेला. त्यांपैकी १०० रहिवासी पुनर्वसनासाठी पात्र ठरले आहेत. म्हणजे मानून चालूया की, उर्वरित ६०० झोपड्यांमध्ये प्रत्येक कुटुंबात सरासरी चार माणसे जरी पकडली, तरी घुसखोरांची संख्या होईल अंदाजे दोन हजार, ४००! त्यामुळे साहजिकच प्रश्न उपस्थित होतो की, जर खरोखरच या एका ठिकाणी झालेल्या कारवाईनंतर घुसखोरांची संख्या काही हजारांत असेल, तर या घुसखोरांना प्रत्यार्पणापर्यंत स्थानबद्ध करण्याची आपल्याकडे पुरेशी व्यवस्था आहे का? तर, त्याचे सध्यातरी उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल. मुंबईमध्ये याच वर्षी मार्च महिन्यात भोईवाड्याला स्थानबद्धता केंद्र सुरू झाले. दुमजली आणि ४० खोल्यांच्या या केंद्रात ६० महिला आणि २० पुरुषांची अशी एकूण ८० माणसांची क्षमता. पण, अवघ्या दोन दिवसांपूर्वी आलेल्या एका वृत्तानुसार, या स्थानबद्धता केंद्राची क्षमताही संपुष्टात आली आहे. कारण, घुसखोरांच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला काही आठवडे अथवा महिनेही लागू शकतात. त्यातच अशी स्थानबद्धता केंद्रे उपलब्ध नसल्यास ताब्यात घेतलेल्या घुसखोरांना तुरुंगात, पोलीस ठाण्यातच ठेवण्याशिवाय पोलिसांसमोरही पर्याय नसतो. पण, कायद्यानुसार घुसखोर हे गुन्हेगार नसल्याने त्यांना कायमस्वरूपी तुरुंगात डांबताही येत नाही. मग काहीवेळा घुसखोरांना संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतच वास्तव्य करायला सांगून, त्यांचे नागरिकत्व सिद्ध होईलपर्यंत चौकशीसाठी त्यांना पोलीस ठाण्यात नियमित हजेरी लावावी लागते. महाराष्ट्र सरकारची नवी मुंबईतही २१३ माणसांच्या क्षमतेच्या स्थानबद्धता केंद्राची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे हे केंद्र कार्यान्वित होण्यास निश्चितच आणखीन काही कालावधी लागेल.
गेल्या वर्षी मुंबईतून एक हजार, ०६०हून अधिक बांगलादेशींना प्रत्यार्पित करण्यात आले, तर यंदा मार्चअखेरीस ४०० बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले आहे. आगामी काळात या कारवाया जसजशा वाढतील, तशी प्रत्यार्पणाच्या प्रतीक्षेतील घुसखोरांची संख्याही वाढू शकते. साहजिकच, व्यवस्थेअभावी घुसखोरांना मोकाट सोडणे परवडणारे नाहीच. त्यामुळे स्थानबद्धता केंद्रांची संख्या वाढवून प्रत्यार्पणाची प्रक्रिया गतिमान करणे, हाच आता अंतिम उपाय!