मुंबई अगेंस्ट ड्रग्ज : कारवाईपलीकडचं आंदोलन

    20-May-2026
Total Views |
Mumbai Against Drugs Movement
 
जगभरात ड्रग्जच्या नशेचे सावट आहे. युवा पिढीच्या बरबादीला ही नशा कारणीभूत आहे. युवाच नव्हे, तर त्यांचे कुटुंब, त्यांचा समाज आणि पर्यायाने देशाची यातून हानी होत आहे. नशेच्या बाजारावर कायदेशीर कारवाई होतच असते. पण, हा नशेविरुद्धचा लढा केवळ कायदेशीर कारवाईने जिंकता येणार नाही, तर त्यासाठी लोकसहभाग, परिणामकारक लोकनियोजन आवश्यक आहे. त्यासंदर्भात मागोवा घेणारा हा लेख...
 
मुंबई... स्वप्नांचं शहर! अरबी समुद्राच्या किनार्‍यावर वसलेली ही मायानगरी देशभरातून येणार्‍या लाखो तरुणांच्या आशा-आकांक्षांना रोज आकार देते. लोकलच्या गर्दीतून वाट काढणारी, खुराड्याएवढ्या खोल्यांत मोठी होणारी आणि गगनचुंबी इमारतींच्या सावलीत घडणारी ही स्वप्ने. पण, आज याच मुंबईभोवती एक अदृश्य संकट गडद होतंय, ड्रग्जचं विषारी सावट. गोरेगावच्या ‘नेस्को सेंटर’मधील म्युझिकल इव्हेंटमध्ये दोन विद्यार्थ्यांचा ओव्हरडोसने झालेला मृत्यू ही केवळ अपघाती घटना नाही, ते आपल्या सामूहिक बेफिकिरीवर उमटलेला रक्तरंजित प्रश्नचिन्ह आहे. समुपदेशक म्हणून ठामपणे सांगावंसं वाटतं, हा प्रश्न केवळ पोलिसी कारवाईने सुटणारा नाही, तो कायद्याच्या चौकटीपेक्षा मनाच्या, नात्यांच्या आणि सामाजिक संरचनेच्या चौकटीत अधिक गुंतलेला आहे. म्हणूनच ही मोहीम फक्त ‘अ‍ॅण्टी-ड्रग्ज ड्राईव्ह’ नसून ‘अ‍ॅण्टी-डिस्पेअर ड्राईव्ह’ व्हायला हवी. निराशेविरुद्धची लढाई.
 
पंजाबचं उदाहरण डोळ्यांसमोर आहे. ‘उडता पंजाब’ ही सिनेमॅटिक कल्पना नव्हती, ती एका पिढीची शोकांतिका होती. शेतीचं संकट, बेरोजगारी, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि सामाजिक पोकळीने निर्माण केलेल्या नैराश्याने ड्रग्जला वाट मोकळी केली. मुंबईवर ती वेळ येऊ नये, म्हणून वेळीच सावध व्हायला हवं. कारण मुंबई व्यसनाच्या विळख्यात अडकली, तर देशाची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानीच आजारी पडेल.
 
दुहेरी लढाई : पुरवठा तोडा, मागणी संपवा
 
‘मुंबई अगेंस्ट ड्रग्ज’ला दोन पातळ्यांवर लढावं लागेल. पहिली पातळी पुरवठा साखळी तोडण्याची. पोलीस आणि सायबर सेलने डार्क वेब, टेलिग्राम चॅनेल्स आणि गल्लीबोळातल्या पेडलर्सच्या मुसक्या आवळणं अत्यावश्यक आहे. शाळा-महाविद्यालयांचा १०० मीटरचा परिसर ‘झिरो टॉलरन्स झोन’ करणं, ही काळाची गरज आहे. मृत्यू विकणार्‍यांविरुद्ध कायद्याचा दंड कठोरतेने उगारलाच पाहिजे. यात तडजोड नाही.
 
पण खरी आणि निर्णायक लढाई दुसर्‍या पातळीवर आहे, मागणी संपवण्याची. जोवर मागणी आहे, तोवर पुरवठा कोणत्या ना कोणत्या मार्गाने होतच राहील. तरुणाला ताणावर मात करण्यासाठी पुडीची नव्हे, तर संवादाची, खेळाची, कलेची, मैत्रीची गरज वाटली पाहिजे. ही लढाई पोलीस स्टेशनमध्ये नाही, तर घराघरांत, वर्गावर्गांत आणि मनामनांत लढावी लागेल.
 
नुसती माहिती नाही, कौशल्य हवं
 
महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा, आसाम, गुजरात, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशात व्यसनमुक्तीवर काम करताना एक सत्य वारंवार समोर आले, माहितीचा अभाव आणि संवादाचा तुटलेला पूल हेच व्यसनाचं खतपाणी आहे. मुलांना ड्रग्जचे दुष्परिणाम माहीत नसतात, असं नाही. त्यांना ‘ते वाईट आहे’ हे कळतं. पण ‘ते का नको’ आणि ‘त्याला पर्याय काय’ हे कळत नाही. ताण आला की काय करायचं, भावना दाटून आल्या की व्यक्त कशा करायच्या, मित्राने आग्रह केला की ठाम ‘नाही’ कसं म्हणायचं, हे कोणी शिकवलेलंच नसतं. आपली शिक्षणपद्धती गुण देते, पण जगण्याचं कौशल्य देत नाही.
 
म्हणूनच या अभियानात ‘लाईफ स्किल एज्युकेशन’ हा गाभा हवा. ताण व्यवस्थापन, भावनिक बुद्धिमत्ता, संघर्ष निराकरण ही कौशल्ये अभ्यासक्रमाचा भाग बनली पाहिजेत. व्याख्यानांपेक्षा अनुभव बोलतो. व्यसनाच्या खाईतून बाहेर आलेल्या ‘रिअल हिरों’चे अनुभवकथन शाळा-महाविद्यालयांमध्ये व्हायला हवे. "मी अडकलो होतो, पण आज मुक्त आहे; यातून बाहेर निघालो आहे,” हे एक वाक्य हजारो उपदेशांवर भारी पडतं. त्यातून ‘रिकव्हरी शक्य आहे,’ हा विश्वास निर्माण होतो.
 
मुंबईने प्लेग पाहिला, १९९३चे बॉम्बस्फोट पाहिले, २६/११च्या जखमा सोसल्या. मुंबई प्रत्येक संकटातून जिद्दीने बाहेर पडते. आज पुन्हा त्या जिद्दीची कसोटी आहे. ‘मुंबई अगेंस्ट ड्रग्ज’ हे केवळ परिपत्रक नाही. ती आपल्या सामूहिक विवेकाला, पालकत्वाला आणि नागरिकत्वाला घातलेली साद आहे. कायदा आणि करुणा, शासन आणि समाज, पोलीस आणि पालक, सर्वांनी एकत्रित होऊन समूळ उच्चाटनासाठी झटायचे आहे. जिंकलो, तर केवळ मुंबईच नाही, तर देश जिंकेल. कारण मुंबई व्यसनमुक्त झाली, तर तिच्यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र पोहोचेल. मुंबई सशक्त भारताची संप्रेरक शक्ती आहे. म्हणूनच आज एकच निर्धार करूया. तो कागदावरचा नको, कृतीतला हवा. तो फक्त सरकारचा नको, प्रत्येक मुंबईकराच्या मनातला हवा. निर्धार एकच, आमची मुंबई, ड्रग्जविरहित मुंबई. ही लढाई केवळ मुंबईसाठी नाही. ही लढाई उद्याच्या व्यसनमुक्त, सक्षम आणि सशक्त भारतासाठी आहे.
 
व्यसन : गुन्हा नाही, वेदनेची हाक
 
समाजाचा व्यसनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळात सदोष आहे. आपण त्याला वाईट सवय किंवा चारित्र्याचा दोष मानतो आणि सगळी जबाबदारी त्या व्यक्तीवर ढकलतो. पण, मानसशास्त्र सांगतं की, व्यसन ही निवड नसून ‘कोपिंग मेकॅनिझम’ असते. मनातल्या खोल जखमांवरची तात्पुरती मलमपट्टी.
 
आजचा तरुण कशाशी झुंजतोय? करिअरची अनिश्चितता, गुण, प्लेसमेंट आणि पॅकेजचं असह्य दडपण. घरात संवादाचे पूल तुटलेले. पालकांचं प्रेम आहे, पण वेळ नाही. अपेक्षांचं ओझं आहे, पण ऐकणारे कान नाहीत. सोशल मीडियाच्या फिल्टर लाईफमुळे ‘मी पुरेसा नाही’ ही बोचरी भावना. ‘कूल’ दिसण्याचा दबाव आणि पीअर प्रेशरपुढे ‘नाही’ म्हणता न येण्याची हतबलता. पहिला घोट ‘थ्रिल’ म्हणून येतो, पण शेवटचा घोट आयुष्यच संपवतो.
 
कुटुंब : पहिलं व्यसनमुक्ती केंद्र
 
या लढाईत पालक आणि शिक्षकांची भूमिका सर्वांत महत्त्वाची. माझं मूल असं कधीच करणार नाही, हा भ्रम सर्वांत घातक. व्यसन श्रीमंत-गरीब, हुशार-कमी हुशार भेदभाव करत नाही. ते एकटेपणाचा, संवादाच्या अभावाचा फायदा घेतं. झोपेच्या वेळा बदलणं, अचानक चिडचिड, अभ्यासातून लक्ष उडणं, पैशांची मागणी वाढणं, जुन्या मित्रांपासून दूर जाणं ही लक्षणं ओळखता आली पाहिजेत. कुटुंब हेच पहिलं व्यसनमुक्ती केंद्र आहे. समुपदेशन म्हणजे केवळ क्लिनिकमधली भेट नव्हे. तो जेवणाच्या टेबलावरचा बिनशर्त संवाद आहे. "आज दिवस कसा गेला,” ही आपुलकीची चौकशी आहे. मुलाला नुसते विचारायचे नाही, समजून घ्यायचं आहे.
 
तरुणांच्या भाषेत बोला....
 
ही लढाई तरुणांच्या भाषेत लढावी लागेल. उपदेशाचे दिवस संपले. रॅप बॅटल, रील्स, शॉर्टफिल्म्स, स्टॅण्डअप, पथनाट्य. त्यांच्या माध्यमातून बोला. ‘से नो टू ड्रग्ज’ हा संदेश नकारात्मकतेने नको, तर सकारात्मक पर्याय देऊया. खेळाची नशा, संगीताची नशा, ट्रेकिंगची नशा, स्टार्टअपची नशा, समाजासाठी काही करण्याची नशा. ही ड्रग्जच्या नशेपेक्षा कितीतरी पटीने मोठी आणि कायम टिकणारी असते, हे दाखवून द्या. समुपदेशनासाठी भेटणारी प्रत्येक व्यक्ती गुन्हेगार नसते. ती मदतीसाठी धडपडणारी, परिस्थितीने हरलेली हतबल व्यक्ती असते. तिला काठीची भीती दाखवणं जितकं गरजेचं, तितकीच मायेच्या थापेची उभारीही गरजेची. जोवर आपण व्यसनी व्यक्तीकडे तिरस्काराने न पाहता, सहानुभूतीने पाहात नाही, तोवर साखळी तुटणार नाही. व्यसन हा नैतिक अधःपतनाचा विषय नसून वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय उपचारांची गरज असलेला आजार आहे. तिहार तुरुंगामधील जुव्हेनाईल केसेस हाताळतानाचा अनुभव अतिशय हृदयद्रावक आहे.
 
(टीप : तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीत कोणाला व्यसनाचा त्रास होत असेल, तर जवळच्या सरकारी रुग्णालयातील मानसोपचार विभागाशी किंवा राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईन १४४१६ वर संपर्क साधा. व्यसन हा आजार आहे आणि त्यावर निश्चित उपचार शक्य आहेत.)
 
प्रिया सावंत
(लेखिका विहिंप कोकणप्रांत उपाध्यक्ष आहेत)
९००४०६०३५३