देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही, पेट्रोलपंपावर गर्दी करु नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

    20-May-2026
Total Views |
mumbai tarun bharast

मुंबई : (Fuel Panic Buying Appeal) देशात पेट्रोल आणि डिझेलचा योग्य साठा असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलेले आहे, मात्र घाबरुन जाऊन नागरिक मराठवाडा, विदर्भात पेट्रोलपंपावर गर्दी करत आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या साठ्यावर आणि इंधनाच्या पुरवठा साखळीवर त्याचा परिणाम होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. घाबरुन जाऊन पेट्रोल-डिझेलचा साठा करण्याची गरज नाही, त्यासाठी पेट्रोलपंपांवर गर्दी करु नका, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केले आहे. जनतेनं अफवांवर विश्वास ठेवू नये, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. (Fuel Panic Buying Appeal)

पेट्रोल,डिझेलचा वापर काटकसरीने करावा-मुख्यमंत्री

पश्चिम आशियात सुरु असलेल्या तणावामुळे जगावर इंधन तुटवड्याचं संकट आहे. अशा स्थितीत राज्यातील नागरिकांनी पेट्रोल-डिझेलचा वापर काटकसरीनं करण्याची गरज आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत. सध्या देशात इंधनाची पुरवठा साखळी अद्यापही योग्य स्थितीत आहे, मात्र नागरिकांनी इंधनाचा साठा करण्यास सुरुवात केल्यास असलेला इंधनाचा साठा पुरेसा पडणार नाही, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. (Fuel Panic Buying Appeal)

घाबरुन जाऊन इंधनाची खरेदी करु नका- मुख्यमंत्री

देशात आणि राज्यात इंधनाचा योग्य साठा आहे. मात्र घाबरुन जाऊन नागरिकांनी इंधनाचा साठा करु नये, असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी जनतेला केले आहे. एखाद्या बँकेतून एकाच दिवशी सगळ्या खातेदारांनी पैसे काढणे सुरु केले तर ती बँक सगळ्या खातेदारांना एकाच दिवशी पैसे देवू शकणार नाही, कारण त्यांची इतर ठिकाणी गुंतवणूक असते. तीच परिस्थिती इंधनाबाबत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.राज्यातील पोलीस यंत्रणेसाठी पेट्रोल, डिझेलचा तुटवडा नाही, हेही त्यांनी सांगितलंय (Fuel Panic Buying Appeal)