दिव्यत्वाची जेथे प्रचिती...

    20-May-2026
Total Views |
Ajay Lalwani Inspiring Journey
 
शारीरिक आव्हानांकडे दुर्लक्ष करत, मैदानी खेळ ते गिरीशिखरे अशी सर्वत्र विक्रमी कामगिरी करत, स्वानंदाचा अनुभव घेणार्‍या अजय लालवानी यांच्याविषयी...
 
उद्यमेन हि सिध्यन्ति
कार्याणि न मनोरथैः|
न हि सुप्तस्य सिंहस्य
प्रविशन्ति मुखे मृगाः॥
 
अर्थात, कोणतेही कार्य केवळ इच्छा किंवा विचार करून पूर्ण होत नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. जंगलाचा राजा असणार्‍या सिंहालाही भूक भागवण्यासाठी शिकार करावीच लागते, झोपलेल्या सिंहाच्या मुखात हरीण स्वतःहून प्रवेश करत नाही, या आशयाचे आणि प्रयत्नांचे महत्त्व सांगणारे हे संस्कृतमधील सुप्रसिद्ध सुभाषित. अर्थात, प्रयत्नांच्या माध्यमातून दिव्यत्व प्राप्त करणारी असंख्य उदाहरणे आपल्याला समाजातही पाहायला मिळतात. असेच एक उदाहरण म्हणजे अजय लालवानी.
 
अजय यांचा जन्म उल्हासनगरचा. जन्मानंतर लगेचच अजय यांचे कुटुंब त्यांच्या गावी, म्हणजे बुलढाणा येथे वास्तव्यास आले. अजय यांच्या आयुष्यात एक समस्या जन्मजात होती, ती म्हणजे दृष्टिहीनता. पाच भावंडे आणि आई-वडील असे अजय यांचे कुटुंब. आई-वडिलांनी लहानपणापासूनच अजय यांना सर्वसामान्य मुलांप्रमाणेच वागवले. त्यांचे पाचवीपर्यंतचे शिक्षणही बुलढाण्यातल्या शाळेतच झाले. त्यावेळी सर्वसामान्य मुलांच्या शाळेतच अजय जात असत आणि ऐकून त्यावर मनन आणि चिंतन करत. त्यानंतर अजय यांचे कुटुंब उल्हासनगर येथे आले.
 
यावेळी अनेकांच्या मार्गदर्शनानुसार, अजय यांच्या पालकांनी दृष्टिहीन मुलांच्या शाळेमध्ये अजय यांना शिकण्यास पाठवले. या शाळेत त्यांना इयत्ता तिसरीसाठी प्रवेश घ्यावा लागला. मात्र, या शाळेतील अभ्यासक्रम आणि अजय यांची सामान्य शाळेतच झालेली प्रगती पाहता, त्यांनी दोन वर्षांतच ती शाळा सोडली. पुढे घरच्यांनीच अजय यांचे मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. यानंतर अजय यांनी बाहेरून दहावी देत, ७८ टक्के असे घवघवीत यश मिळवले.त्यानंतर अजय यांनी उल्हासनगरच्या ‘आरकेटी’ महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतला. तसेच त्यांनी दृष्टिहीन मुलांसाठीचा ‘आयटीआय’चा कोर्सही पूर्ण केला.
दरम्यानच्या काळात अजय यांनी केलेला क्रीडा क्षेत्रातील स्वत:चा विकास कौतुकास्पदच ठरावा. अजय यांना लहानपणापासूनच खेळाची आवड होती. ‘सायकलिंग’, धावणे, पोहणे हे लहानपणापासूनचे अजय यांचे छंद. भावंडांच्या मदतीने अजय आवाज ऐकून सायकल चालवण्यात तरबेज झाले होते. पुढे ‘ज्युडो’चेही त्यांनी प्रशिक्षण घेतले. खेळाचा सराव करतच त्यांनी बारावी यशस्वीपणे पूर्ण केली.
 
पुढे त्यांनी कला शाखेमध्ये प्रवेश घेत ‘एनसीसी’, ‘एनएसएस’मध्येही सक्रियपणे ते सहभागी झाले. मात्र, या काळातही ‘ज्युडो’ खेळाचा सराव सुरूच होता. अजय या खेळाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू. ताश्कंद येथे २०१८ मध्ये झालेल्या या खेळाच्या विश्वचषकामध्ये त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धांमुळेच त्यांची द्वितीय वर्षाची परीक्षाही दोनवेळा हुकली. पुढे खेळालाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेत, त्यांनी काहीकाळ शिक्षणापासून विरामही घेतला होता.
 
अजय यांची खेळातील आवड निव्वळ छंद नसून, त्यांनी आजवर त्यामध्ये देदीप्यमान यशही कमावले आहे. ‘ज्युडो’च्या चार राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी आजवर ‘रौप्य’ आणि ‘कांस्य’ पदके कमावली आहेत. तसेच जलतरणाच्याही राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ‘सुवर्ण’, ‘रौप्य’ आणि ‘कांस्य’ पदकांची कमाई केली आहे. लहानपणी जोपासलेली ‘सायकलिंग’ची आवड पूर्ण करताना, त्यांनी ‘सायकलिंग’मध्ये मुंबई-काश्मीर-कन्याकुमारी-मुंबई असा सुमारे सात हजार, ५०० किलोमीटरचा प्रवास अवघ्या ४५ दिवसांत पूर्ण केला. तसेच काश्मीर ते कन्याकुमारी हा सुमारे तीन हजार, ८०० किलोमीटरचा प्रवासही त्यांनी नऊ दिवस, १२ तास आणि चार मिनिटांत पूर्ण करून एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
 
खेळामध्येही विविधता जोपासताना अजय यांनी, शिवाजी पार्क येथील समर्थ व्यायाम मंदिरातून ‘मल्लखांब’ खेळाचेही प्रशिक्षण घेतले. ‘पॅरिस ऑलिम्पिक’मध्येही या खेळाचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी त्यांची निवड झाली होती. सध्या अजय यांना पर्वतशिखरांचेही वेड असून, ते उत्तम गिर्यारोहक आहेत. त्यांनी आजवर हिमालयातील अनेक ‘ट्रेक’ केले असून, महाराष्ट्रातील २५०पेक्षा अधिक किल्ल्यांचीदेखील दुर्गभ्रमंती केली आहे. अगदी अलीकडेच दि. १८ एप्रिल ते १ मे या दहा दिवसांत पाच हजार, ३६४ मीटर उंचीवरील ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ त्यांनी सर केला.
 
सध्या अजय मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागात कार्यरत असून, दादरच्या कीर्ती महाविद्यालयात राहिलेले शिक्षणही घेत आहेत. मात्र, अजूनही त्यांना ‘एव्हरेस्ट’ शिखर खुणावते आहे. पुढील वर्षी ‘सी टू स्काय’ अशी ‘मुंबई ते एव्हरेस्ट’ मोहीम पूर्ण करायची आहे. मात्र, अशा मोहिमा या खर्चिक असल्याने, यासाठी अर्थसाहाय्याची गरज असल्याची भावनाही ते विनम्रपणे व्यक्त करतात. आजवर जिद्दीच्या जोरावर अनेक विक्रम अजय यांनी त्यांच्या नावावर कोरले आहेत. यापुढेही स्वानंदाचा अनुभव घेत, गगनभरारी घेण्याचे त्यांचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्याचा विश्वासही अजय यांच्या गाठीशी आहे. अजय यांचा जीवनप्रवास खर्‍या अर्थाने दिव्य आहे, तो एका विजेत्याचा प्रवास आहे. आयुष्यात दृष्टिहीनतेमुळे काहीही अडत नाही, सर्वसामान्य आयुष्य जगता येते, अजय त्याचे उत्तम उदाहरण. अजय यांना त्यांच्या पुढील मोहिमांसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
 
कौस्तुभ वीरकर
(अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६६३१०५५७)