कलिंगडाचे काय?

    02-May-2026   
Total Views |

 
Watermelon Sales Drop India

 

साधारण मार्च ते मे महिन्यामध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात कलिंगड विकायला येतात. याच ऋतूमध्ये कलिंगडाच्या शेतकऱ्यांना नफा मिळतो. पण, आता बाजारामध्ये ना कलिंगड विक्रीला ठेवले जात, ना कुणी ते विकत घेत. का? तर पायधुनी येथे अब्दुला डोकाडिया, त्यांची पत्नी आणि दोन मुली यांचा मृत्यू झाला. बिर्याणी खाऊन झाला की, कलिंगड खाऊन झाला, याबद्दल शंका आहेच. या एकाच घटनेने घाबरून, लोक कलिंगड खाणे टाळत आहेत. त्यामुळे कलिंगडाची खरेदी-विक्रीच ठप्प आहे. शेती, पीक, आवक आणि जावक याबद्दल मला ज्ञान नाही. पण, या घटनेतून एक जाणवते की, विषारी असू शकते या भीतीने लोकांनी कलिंगड खायचे सोडले. पण, बिर्याणी? बिर्याणीचे काय? ती कुणी खायची सोडली का? नसेलच. कारण, लोकांमध्ये पसरलेली आणखी एक भीती अशी आहे की, सगळीच कलिंगड लाल दिसण्यासाठी त्याला इंजेक्शन दिले जाते. या अफवा आहेत की, आणखी काही? पण, याचे स्पष्टीकरण लोकांना कसे मिळेल?
 
अर्थात, कलिंगड न खाण्याने आकाश कोसळेल का? असाही प्रश्न काही लोक करतीलच. तर, मुद्दा असा आहे की, कलिंगडाचे शेतकरी याच आशेवर असतील की, उन्हाळ्यात लाल तजेलदार कलिंगडांची विक्री करून, चार पैसे गाठीशी येतील. त्यातून मग पुढच्या खर्चाचे नियोजन करता येईल. पण, नैसर्गिक आपत्ती न कोसळता, यावेळी मानवनिर्मित आपत्तीची संक्रात कलिंगडावर आली. या सगळ्यात कलिंगड पिकवणाऱ्या त्या सर्वसामान्य शेतकऱ्याचेच अतोनात नुकसान झाले. नैसर्गिक आपत्ती आली, तर शेतकऱ्यांना सरकार मदत तरी देते पण, आता या मानवनिर्मित आपत्तीचे काय करायचे? दुसरीकडे आता अब्दुला डोकाडिया यांच्या मृत्यूबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका माहितीनुसार, २०२६ मध्ये एका प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू होणार होती. त्या प्रकरणामध्ये डोकाडिया हे साक्षीदार होते. मात्र, साक्ष देण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर, या प्रकरणाबद्दल ही सगळी वावटळ उठत आहे. पुन्हा मूळ मुद्द्याकडे येऊ की, कलिंगड विषारी होते की बिर्याणी, यावरचा पडदा उठायलाच हवा. कारण, कलिंगड कृत्रिमरीत्या पिकवणारे काही लोक असतीलही. पण, गरीब आणि सच्चा शेतकऱ्यांचे काय? कलिंगडावरची संक्रांत कशी जाईल?

तरणोपाय नाही

रांचीमध्ये एका महिलेची हत्या झाली. असे तर जगभरात विविध कारणांसाठी हत्या होतातच. पण, तिची हत्या कोणी केली? अर्थात, थ्रिलर किंवा सनसनाटीच्या दृष्टीने या बातमीकडे लोक पाहतीलही. पण, या बातमीचे सर्वात विदारक सत्य असे आहे की, तिच्या अल्पवयीन लेकीनेच तिची हत्या केली. कारण काय, तर अरबाज खानसोबत तिला आताच्या आता ‌‘निकाह‌’ करायचा होता. त्यासाठी तिला अरबाजने सांगितले होते की, खूप पैसे लागणार असून, ते आईकडून माग. पण, मुलीच्या आईने पैसे तर दिले नाहीतच; वर तिला ‌‘निकाह‌’ होऊ देणार नाही, असेही निक्षून सांगितले.

रागाच्याभरात मग त्या मुलीने आणि अरबाजने, त्या महिलेची थंडपणे हत्या केली. ही कसली नशा? जन्मदात्या आईबद्दलचेही प्रेम आटले? पैसे दिले नाहीत म्हणून हत्या? अशा अनेक घटना आज समाजात घडत आहेत. कुठे आईने दारूला पैसे दिले नाहीत, म्हणून अल्पवयीन मुलाने आईला मारले, तर कुठे बापाने अपमान केला म्हणून बापाची हत्या केली. कुठे तर आई किंवा बापाने क्षुल्लक कारणावरून, पोटच्या मुला/मुलींचा खून केल्याच्याही घटना घडत आहेत. समाजात हे असे का व्हावे? नात्याची वीण अशी का विषारी व्हावी? मुलांना व्यसनाच्या आणि मुलींना प्रेमाच्या आड इतकी कशी भूल पडते? काहीच दिवसांपूर्वी आयुष्यात आलेला मुलगा, हा आईबाबांपेक्षाही जवळचा कसा होतो? यात जादूटोणा-करणी केल्याचेही म्हटले जाते. पण, अशी खूप प्रकरणे हाताळल्याने खात्री पटली की, असे काही नसते. तर, मुलींच्या मनाचा अभ्यास करून, त्या-त्या पॅटर्ननुसार खेळले जाते. अवास्तव काल्पनिक, फिल्मी पद्धतीच्या प्रेमाची हमी मुलींना दिली जाते. इतरांना तिच्यात काहीच गुण दिसत नसतील आणि भले ती मुलगी अवगुणी असली, तरीसुद्धा त्या मुलीला हे फसवे लोक सांगतात की, जगात तिच्यासारखी रूपवती-गुणवती कुणीच नाही. सगळे खोटे असते आणि त्या खोट्याच्या जाळ्यात मुलींना फसवले जाते. तर मुलांना नशेच्या बाजारात गुंतवले जाते. भारतीय समाजातील युवा पिढीला बरबाद करण्याचे, हे समाजविघातक शक्तींचे कारस्थान असू शकेल. त्यामुळेच संस्कारित पिढी घडवण्याचे शिवधनुष्य प्रत्येक आईबाबांना, कुटुंबाला उचलावेच लागणार आहे. त्याशिवाय, तरणोपाय नाही!

9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.