
कुटुंबामध्ये सर्वजण भाषा अभ्यासक असल्याने, अंजली यांचा ओढाही साहजिकच भाषांकडे होता. त्याकाळी सांगलीतील शाळांत पूर्ण संस्कृत शिकण्याची सोय नसल्याने, त्या मराठी, हिंदी आणि संस्कृत संयुक्त आणि इंग्रजी अशा चार भाषा शिकल्या. अंजली यांना सर्व भाषांची उत्तम जाण होती. तसेच, वाचनाची आवड असल्याने त्यांचा विषयांचा आवाका वाढत गेला. शालेय अभ्यासाबरोबरच दूरस्थ पद्धतीने ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’च्या संस्कृत आणि इंग्रजीच्या परीक्षाही अंजली उत्तीर्ण झाल्या. पाठशाळेत जाऊन संस्कृत व्याकरणाचे धडेही अंजली यांनी गिरवले.
चार भाषांवर प्रभुत्व असणे कितीही श्रेयस्कर असले, तरी महाविद्यालयीन शिक्षणासाठी एकाच भाषेची निवड करावी लागणार, याची अंजली यांना जाण होती. संस्कृत आणि इंग्रजीपैकी कोणती भाषा निवडावी, या संभ्रमात असतानाच त्यांचा बारावीचा निकाल जाहीर झाला. संस्कृतमध्ये बोर्डात पहिला क्रमांक आणि इंग्रजीत मिळालेले ६० गुण पाहून त्यांनी, संस्कृतवरच लक्ष केंद्रित करण्याचे पक्के केले.
सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात संस्कृत विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी संपादित करून, पुढे २८ वर्षे सांगली आणि वाईमध्ये त्यांनी अध्यापन केले.
विलिंग्डन महाविद्यालयात प्रवेश करताच, वाचनप्रेमी अंजली तेथील समृद्ध ग्रंथालयात रमल्या. सोबत के. वा. आपटे यांचे मार्गदर्शनही त्यांना लाभले. के. वा. आपटे यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी ‘अध्यात्म रामायण एक चिकित्सक अभ्यास’ या विषयात ‘पीएचडी’ पूर्ण केली. त्यावेळी ‘वाल्मीकि रामायण’, ‘आनंद रामायण’, ‘अद्भुत रामायण’, ‘योगवासिष्ठ रामायण’ यांसह, बऱ्याच प्रादेशिक रामायणांचाही त्यांनी अभ्यास केला. डॉ. अंजली यांनी रामाची सेवा तर केलीच, सोबत त्याचे शासनमान्य प्रमाणपत्रदेखील मिळवले.
विविध रामायणांचा अभ्यास करताना वाचनात आलेला ‘वेदान्तसार रामायण’ हा जनतेला अपरिचित ग्रंथ, व्याख्यानरूपातून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला. पदव्युत्तर पदवीवेळी अभ्यासलेल्या ‘सांख्ययोग’, ‘वेदान्त’ विषयाशी मिळताजुळता असलेला हा ग्रंथ डॉ. अंजली यांना अधिक भावला. त्यामुळेच त्या अधिक प्रभावीपणे श्रोत्यांपर्यंतही पोहोचवू शकल्या.
‘रामायणा’च्या अभ्यासाबरोबरच समर्थांचा ‘दासबोध’, शंकराचार्यांचे साहित्य, सावरकरांचे साहित्य, महादेवींविषयीची पुस्तके यांचाही डॉ. अंजली यांचा मोठा अभ्यास होता. या सर्वांमध्ये संस्कृत हा समान धागा होता. त्यातील संस्कृतप्रचुर भाषेची डॉ. अंजली यांना विशेष भुरळ पडली आणि ‘आदानं हि विसर्गाय|’ हे तत्त्व अंगीकारणाऱ्या डॉ. अंजली यांनी, आपल्या ओघवत्या वाणीद्वारे ते ज्ञान श्रोत्यांना दान केले. तरीही, नवखी असताना ज्येष्ठांचे मिळालेले प्रोत्साहन आणि मार्गदर्शनच आत्मविश्वास देत गेले, असे त्या नम्रपणे सांगतात.
ऑनलाईन काळापूव व्याख्यान हे माध्यम तसे मर्यादितच. त्यामुळे मुद्रित माध्यमात काम करण्याची संधी मिळताच, डॉ. अंजली यांनी ती त्वरित स्वीकारली. ‘परामर्श’ त्रैमासिकात त्यांनी ‘सांख्यदर्शना’विषयी खंडनात्मक लेख लिहिला होता. ‘मुद्राराक्षस’ नाटकाविषयीचे लिखाण, हे त्यांचे पहिले ललितलेखन. पण, प्रकाशकांची अट होती की, केवळ संवादात्मक भाषांतर न लिहिता, निवेदनात्मक स्वरूपात हवे! ते आव्हान स्वीकारत आणि पूव वाचलेले ‘मृत्युंजय’, ‘ययाति’ स्मरून त्यांनी, त्याच धाटणीवर एकेका पात्राच्या दृष्टिकोनातून एकेक प्रकरण लिहिले. ‘मुद्राराक्षस’ नाटकात स्वगते खूप असल्यामुळे ते उत्तम जुळून आले. त्यानंतर ‘किरातार्जुनीयम्’ महाकाव्य आणि ‘प्रतिमा’, ‘वेणीसंहार’ इत्यादी नाटकांच्या सार्थ विवेचनातील रचनावैशिष्ट्यामुळे, ते महाविद्यालयांतील अभ्यासकांनाही समजायला अधिक सोपे गेले.
डॉ. अंजली यांनी ‘देवभाषेचे देणे, मराठीचे लेणे’ या योजनेअंतर्गत, विविध नाटकांचे भाषांतर केले आहे. आपल्या ‘वेदान्ता’च्या अभ्यासाच्या आधारे त्यांनी ‘प्रसाद’ प्रकाशनासाठी, ‘विवेकचूडामणि’ हा ग्रंथही लिहिला. केवळ आचार्यांच्या आशीर्वादामुळेच हे आव्हानात्मक कार्य यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे त्या सांगतात. त्यांची आतापर्यंत २० पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून, इतिहास आणि संस्कृत यांची उत्कृष्ट सांगड घालत चंद्रशेखर आझाद यांच्यावर संस्कृतमध्येही त्यांनी पटकथादेखील लिहिली. मासिक, त्रैमासिकांतील नियमित लेखनासोबतच, त्या ‘गीर्वाणभारती’ इत्यादी आकाशवाणीवरील कार्यक्रमांतही संस्कृत काव्यसादरीकरण आणि ललितबंधदेखील करतात. याशिवाय, त्या आपल्या ‘शारदांजली’ नामक ब्लॉगवर विविध विषयांवर मुक्त लिखाण करतात.