या भूमंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही ॥
महाराष्ट्रधर्म राहिला | काही तुम्हा कारणे ॥
‘हिंदुपद पातशाह’ पुण्यलोक छत्रपती शिवाजी राजांचे हे अत्यंतिक चपखल वर्णन. महाराष्ट्र राज्याची व्याप्ती, विचार आणि धर्मकल्पना यांचे स्वतंत्र तत्त्वज्ञान निर्माण करणारे सिंहपुरुष म्हणजे शिवछत्रपती! शिवाजीराजांची किर्ती अष्टदिशांना पसरलेली असून, केवळ मराठीच नव्हे, तर भारतीय परिप्रेक्ष्यात त्यांचे स्थान हे अत्यंत वरचे आहे. त्यामुळे अशा न्यायप्रिय, धर्मनिष्ठ नृपावर अमाप लेखन, चित्रपटनिर्मिती आणि इतर कलाविष्कारांची मांडणी होत राहणे अगदीच स्वाभाविक. रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटातून, शिवाजी महाराजांचा प्रतापगड युद्धकाळापर्यंतचा जीवनकाल मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रयत्न प्रामाणिक आणि मनस्वी असला, तरीही तो इतिहास आणि मांडणी यांच्यापासून दूर उभा असल्याचेच दिसून येते. हा चित्रपट नेमका कसा आहे, त्याचा घेतलेला आढावा...
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सुरू होतोच, तो मुसलमानी राजवटींच्या जुलमी कारभारापासून. चित्रपटाचा हा सुरुवातीचा भाग बव्हंशी प्रभावी वाटतो. हिंदवी स्वराज्याची निकड आणि निमित्त यांची चांगली सांगड, प्रेक्षकांना या भागात पाहायला मिळते. गुलामीत असणारा महाराष्ट्र, अन्यायकारक सुलतानी राजवट आणि त्यांच्या अत्याचारी राजवटीमध्ये मानवी आशांचे होत असलेले दमन यांचा मागोवा, चित्रपटात चांगल्या प्रकारे घेण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचा उदय, राजमाता जिजाऊंची शिकवण, पुण्याची झालेली मसनवाट, शहाजीराजे व थोरले संभाजीराजे यांचे आयुष्य आणि अफजलखानाची स्वारी अशा शिवचरित्रातील प्रसंगांची माळ गुंफण्याचा प्रयत्न म्हणजे, ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट! चित्रपटात काहीवेळा दोन समांतर प्रसंग घडताना दिसून येतात. ही कल्पना अतिशय प्रभावीपणे वापरण्यात आली आहे. उदा. जळून राख झालेले पुणे आणि शिवाजी महाराजांचा जन्म. शिवाजीराजे आणि सईबाईंचे प्रसंगही वेगळ्या आणि देखण्या पद्धतीने मांडले आहेत. परंतु, सईबाईंचे पात्र लक्षात राहण्याजोगे नाही.
चित्रपटाचे कथानक जसजसे पुढे सरकते, तसे एकेका टप्प्यावर या चित्रपटातील ऐतिहासिक पात्रे आपल्यासमोर येऊ लागतात. परंतु, यातील बहुतांश पात्रांची जडणघडण सशक्तपणे मनाचा ठाव घेत नाहीत. कथा-कादंबरीत जसा व्यक्तिमत्त्वाचा एकेक स्तर उलगडत जातो, तसे प्रयत्न करण्यात चित्रपट कमी पडताना दिसतो. ते साधता आले नाही, असेच म्हणणे इथे अधिक सयुक्तिक ठरेल. त्यातही हा प्रयत्न यशस्वी झाला असे म्हटले, तर शहाजीराजे आणि थोरले संभाजी महाराज यांबाबत तो खरा आहे. इतर अनेक महत्त्वाची पात्रे केवळ काळाच्या ओघात दौडत आहेत, असेच म्हणावे लागेल.
शिवाजी महाराजांना पडद्यावर साकारण्याचे स्वप्न जवळजवळ प्रत्येक नटालाच पडते. शिवाजी महाराजांचे अतुलनीय कार्य मोहून टाकणारेच आहे. त्यामुळे अशी भावना मनात निर्माण होणे अगदीच स्वाभाविक. परंतु, शिवाजी महाराजांची जी वर्णने आणि अस्सल रेखाचित्र उपलब्ध आहेत त्याचा विचार करता, चित्रपटातील निवड चुकीची वाटते. परकालदास शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत लिहितो की, शिवाजीराजे गौरवर्णीय आहेत आणि ही व्यक्ती ‘राजा’ आहे, हे सांगण्याची जरूर नाही (‘अर सुरतो बहुत अजाइब गौरो रंग अपुछो राजवी दीसो जो...’). ते तेज आणि ती करारी दृष्टी, रितेश देशमुखांच्या व्यक्तिमत्त्वात दिसत नाही, उलटपक्षी तो अभिनिवेशच अधिक वाटतो. हीच अडचण राजमाता जिजाऊंचे व्यक्तिमत्त्व साकारणाऱ्या, भाग्यश्री यांच्याबाबतही आहे. जिजाऊसाहेब या नितांत खंबीर, ध्येयवादी, करारी आणि सशक्त राणी होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अपेक्षित तेजस्वीपणा सबंध चित्रपटात कुठेही दिसून आला नाही, ही मोठीच आश्चर्याची बाब. सचिन खेडेकर, सुरेश विश्वकर्मा, जितेंद्र जोशी आणि विशेषतः अभिषेक बच्चन यांच्या भूमिका नीट वठल्या आहेत. चित्रपटाची आणखी एक सशक्त बाजू म्हणजे संगीत, पार्श्वसंगीत आणि छायाचित्रण. संगीतातून ‘मराठीपण’ जाणवते आणि छायाचित्रणातून भव्यता! पण, दुसऱ्या बाजूस आश्चर्याची बाब म्हणजे चित्रपटातील सामान्य संवाद. मध्ययुगीन इतिहासातील बोलीभाषा, अदब आणि त्याअनुषंगाने यावेत असे संवाद या चित्रपटात नाहीत. यामुळेदेखील पात्रांची बांधणी सशक्त झाली नसावी, असे म्हणायला जागा आहे. संवादाला ऐतिहासिक कोंदणाचे जे वजन असायला हवे, त्याची अपेक्षा या चित्रपटाकडून होती. त्याची पूर्तता मात्र हा चित्रपट करत नाही.
मराठी चित्रपटांचे अर्थकारण, त्याला असणाऱ्या मर्यादा आणि एकंदर चित्रपट पाहण्याबाबतची उदासीनता, यांना छेद देण्याचे काम हा सिनेमा निश्चित करू शकतो. निर्मात्यांनी चित्रपटाची भव्यता राखण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले आहेत. त्याबाबत हा चित्रपट घडवणाऱ्या सर्वांचे कौतुक केलेच पाहिजे, यात दुमत नाही. परंतु, भव्यतेसह सशक्त कथानकही उभे राहणे अपेक्षित असते. विशेष म्हणजे मराठ्यांचा इतिहास म्हटल्यानंतर ऐतिहासिक संदर्भ, घटना आणि एकूणच इतिहासाचा पट नीटपणाने मांडणे, ही पूर्वअटच. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचे उदर चिरल्यानंतर, झोकांड्या खात बाहेर येणारा अफजलखान दिसणे अपेक्षित होते. कारण, ते इतिहासाला धरून आहे. इथे मात्र वेगळेच घडते. ऐतिहासिक विषयांचे सल्लागार असणाऱ्या व्यक्तींकडून योग्य मार्गदर्शन घेणे आणि ते मानणे गरजेचे होते. शिवाजी महाराजांच्या सहकाऱ्यांची ओळखही चित्रपटात नीटशी होत नाही. पंढरपूर, तुळजापूर आणि इतर देवस्थाने भ्रष्ट केल्याचे प्रसंग अधिक तीव्रतेने मांडले न गेल्याने, अफजलखानाची अतीव क्रूर आणि कपटी बाजू काहीशी सौम्य होऊन समोर येते. इतिहासात त्याचे भयंकर वाटावेत, असे दाखले आहेत. यानंतर अफजलखानाला बुडवण्यासाठी केलेले नियोजन, सल्लामसलती आणि प्रत्यक्ष भेट हे प्रसंग अधिक वेळ देऊन उठावदार करण्याची गरज होती. तो प्रभाव अफजलखान वधाच्या वेळी जाणवत नाही. त्यावेळचे संवादही सामान्य दर्जाचे असल्याने, प्रेक्षकांच्या अनेक अपेक्षांची पूर्तता चित्रपटाकडून होत नाही.
मुळात शिवछत्रपतींचे जीवनकार्य ही करमणुकीची किंवा केवळ भावनेच्या चक्षूंतून पाहण्याची विषयवस्तू नाही. तो भारताच्या देदीप्यमान परंपरेचा महत्तम असा सारांश विचार आहे. ‘शिवछत्रपती’ म्हणजे रोजच्या आयुष्याचा स्थायीभाव असावी, अशी प्रज्ज्वल ऊर्जा आहे. त्यामुळे जेव्हा मराठी लेखक, दिग्दर्शक त्यासंबंधी काही निर्मिती करतात, तेव्हा त्यांच्यावर अधिकचे उत्तरदायित्व असते. नवी पिढी आणि समाजातील घटक हाच इतिहास आहे, असे समजून चालण्याचा संभवही अधिक असतो. त्यामुळे भावनिक इच्छांहून ऐतिहासिक सत्य आणि त्याचे यथोचित प्रदर्शन यांना झुकते माप देणे आवश्यक ठरते. प्रेक्षकांनीही ऐतिहासिक सत्ये आणि सिनेमा यांच्यात असणारे अंतर कायम जोखले पाहिजे, हे निश्चित!
सौरभ सद्योजात