मुंबई (विशेष प्रतिनिधी) - फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी संवर्धित केलेल्या नवी मुंबईतील डीपीएस तलाव संवर्धन राखीव क्षेत्राकडेच फ्लेमिंगो पक्ष्यांनी पाठ फिरवली आहे (dps lake flamingo conservation reserve). पाण्याची खालावलेली गुणवत्ता आणि खाडीतून पाणी वाहून आणणाऱ्या नाल्याचा कामावर लावण्यात आलेल्या स्थिगितीमुळे यंदा तलावात फ्लेमिंगो उतरलेले नाहीत (dps lake flamingo conservation reserve). अशातच ठाणे जिल्ह्यास्तरीय पाणथळ समितीने फ्लेमिंगोचा अधिवास असणाऱ्या नव्या मुंबईतील पाणथळी या पाणथळ जागा नसल्याचे म्हटले आहे (dps lake flamingo conservation reserve). त्यामुळे एकंदरित नव्या मुंबईतील पाणथळींचे आणि फ्लेमिंगो पक्ष्यांचे भवितव्य अंधारात दिसत आहे. (dps lake flamingo conservation reserve)
ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या दृष्टीने नवी मुंबईतील पाणथळ जागा या महत्त्वाच्या आहेत. कारण, ठाणे खाडीत भरतीचे पाणी चढायला सुरुवात झाले की, खाडीत विहार करणारे हे फ्लेमिंगो पक्षी हे नवी मुंबईच्या टी.एस.चाणक्य तलाव, एनआरआय तलाव आणि डी.पी.एस तलाव याठिकाणी विसाव्याकरिता येतात. वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रयत्नामुळे डीपीएस तलावाला फ्लेमिंगो संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य वन्यजीव मंडळाने याला मान्यता देखील दिली आहे. मात्र, या तलावाचे मालकी असणारे सिडको प्रशासन या तलावाला संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा देण्यास तयार नाही. नवी मुंबई महानगर पालिकेने डीएपीएस तलावामध्ये खाडीचे पाणी वाहून आणणाऱ्या नाल्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. जेणेकरून तलावात खाडीतून येणारे भरतीचे पाणी सुरळीत सुरू राहिल. मात्र, सिडकोने हे काम थांबवले.
डीपीएस तलावामध्ये खाडीतून तीन नाल्यांद्वारे भरतीचे पाणी आत येते. यापैकी सध्या एकच नाला सुरू असून दोन नाले बंद आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे काम थांबवल्यामुळे हे नाले बंद आहेत. त्याद्वारे भरतीचे पाणी आत येत असले तरी आहोटीवेळी पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे आता तलावात पाणी साचून राहिल्याने त्याची गुणवत्ता देखील खालावली आहे. तसेच दुर्गंधी देखील वाढली आहे. परिणामी फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी संरक्षित केलेल्या या तलावात फ्लेमिंगो उतरताना दिसत नाहीत. याउलट केवळ एनआरआय तलावात मोठ्या संख्येने फ्लेमिंगो विहार करत आहेत.
पाणथळ समितीलाच पाणथळ नको
ठाणे जिल्ह्यास्तरीय पाणथळ समितीने नवी मुंबईतील फ्लेमिंगोचा अधिवास पाणथळी या पाणथळ जागा नसल्याचे आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यासाठी समितीने पाणथळ कायदा, २०१७ चा आधार घेऊन निष्कर्ष मांडले असून मानवनिर्मित किंवा कालांतराने जागेचे स्वरुप बदल्याने त्यांना नैसर्गिक पाणथळ म्हणता येणार नाही, असे अहवालात नमूद केले आहे. यामध्ये नेरुळमधील लोटस तलाव, एनआरआय तलाव, टी.एस.चाणक्य तलाव, ज्वेल आॅफ नवी मुंबई तलाव, करावेमधील गणेश तलाव, घणसोली येथील गोठीवली तलाव, जिजामाता बोट खाडी आणि कल्याणमधील निळजे तलावाचा समावेश आहे. यामधील एनआरआय तलाव आणि टी.एस.चाणक्य तलाव हे फ्लेमिंगोचे अधिवास आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्याधिकारी यांच्या अध्यक्षेतेखालील पाणथळ समितीलाच पाणथळ जागांचे संवर्धन नको हवे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ठाणे जिल्ह्यास्तरीय पाणथळ समितीने नवी मुंबई पाणथळींबाबत दिलेल्या या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आवाहन देणार आहोत. कारण, सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल वेटलॅण्ड अॅटलासमधील २.२५ हेक्टर आणि त्यावरील क्षेत्र असणाऱ्या पाणथळ जागांना संरक्षण देण्याचे आदेश २०१७ सालीच दिला आहे. पाणथळ कायदा, २०१७ च्या नंतर हा निर्णय आल्याने त्यानुसार नवी मुंबई पाणथळींचे संवर्धन होणे आणि त्यांना पाणथळींचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. - सुनिल अग्रवाल, पाणथळ संरक्षण कार्यकर्ते