Vasant Narhar Phene : मुंबईत रंगला वसंत नरहर फेणे यांचा स्मृतिजागर

    02-May-2026
Total Views |

fene

मुंबई : (Vasant Phene) मराठी नवकथाकारांच्या पिढीत आपल्या साहित्याचा वेगळा ठसा उमटवणारे लेखक दिवंगत वसंत नरहर फेणे यांचा साहित्यसृष्टीचा जागर दि. १मे रोजी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिर येथे संपन्न झाला. ग्रंथाली व फेणे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ' वसंत नरहर फेणे ' - व्यक्तित्व आणि साहित्य या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वसंत फेणे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमात सुरुवातीला फेणे यांचा जीवनपट उलगडणारी विशेष ध्वनिचित्रफीत प्रेक्षकांना दाखवण्यात आली, जिचे संहिता - दिग्दर्शन राजीव जोशी यांनी केले होते. तद्ननंतर ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, प्रमोद पवार, स्नेहा फेणे आणि श्वेता फेणे यांनी त्यांच्या निवडक साहित्याचे वाचन केले. डॉ. निर्मोही फडके यांनी यावेळी कार्यक्रमाची सूत्रं सांभाळली, या दरम्यान वसंत फेणे यांच्या लेखणीतून साकारलेल्या ध्वजा या निवडक कथा संग्रहाच्या सुधारीत आवृत्तीचे आणि त्यांच्या जीवन - साहित्यावर निर्मित पुस्तिकेचे प्रकाशन पार पडले. ज्येष्ठ लेखक प्र.न. परांजपे, कुमार केतकर, सुरेखा सबनीस, रविमुकुल आणि फेणे कुटुंबीय यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी आपले विचार मांडताना कुमार केतकर म्हणाले की फेणे यांचे लेखन हे मनोविश्लेषणाच्या पलिकडे गेलेले लिखाण होते. त्यांनी आपल्या कथेच्या माध्यमातून विविध लोकांच्या साहित्याचे जगणं मांडलं. त्यांचं लिखाण विचारप्रवर्तक होतं. प्रख्यात चित्रकार रविमुकुल यांनी फेणे यांच्याबरोबरचा पत्रव्यवहार आणि काही आठवणी मांडल्या. सुरेखा सबनीस यावेळी म्हणाल्या की फेणे यांच्या कथांवर चित्रपट निघू शकतात, इतक्या दर्जेदार कथा त्यांनी लिहील्या. त्यांना गांभीर्याने घेण्यात आली नाही ही समीक्षकांची आणि प्राध्यपकांची चूक आहे. त्यांच्या साहित्यावर चर्चासत्रं देखील आयोजित केली जाऊ शकतात, इतकं त्यांचं लिखाण कसदार आहे. या प्रसंगी फेणे कुटुंबियांनी वसंत फेणे यांच्या सोबतचे आपले ऋणानुबंध उलगडून सांगितले.