महाराष्ट्रात होत असलेला पायाभूत सुविधांचा विकास, राज्याला प्रगतिपथावर नेणारा ठरला. ‘मिसिंग लिंक’ हे त्याचेच प्रतीक ठरावे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेली राज्याची प्रगती, राज्याला देशात अग्रेसर करणारी ठरली. म्हणूनच, ‘मिसिंग लिंक’चे राष्ट्रार्पण महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील सुवर्णयुगाचा अध्याय ठरतो.
कोणत्याही राज्याच्या किंवा देशाच्या प्रगतीचे मोजमाप करायचे असेल, तर तिथल्या पायाभूत सुविधांकडे नजर टाकावी लागते. अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत, ते अमेरिका श्रीमंत असल्यामुळे नाही; तर अमेरिकेचे रस्ते चांगले असल्यामुळेच अमेरिका श्रीमंत आहे, हे जॉन एफ. केनेडी यांचे सुप्रसिद्ध वाक्य. आज महाराष्ट्राच्या भूमीवर याच तत्त्वाचा साक्षात्कार होताना दिसला. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि राज्याची सांस्कृतिक व ‘आयटी’ राजधानी असलेले पुणे, या दोन महानगरांना जोडणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे राष्ट्रार्पण झाले. हा उद्घाटन सोहळा नव्या, गतिमान आणि प्रगत महाराष्ट्राच्या प्रवासातील सुवर्णक्षण ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीच्या आणि गतिमान नेतृत्वाखाली महाराष्ट्राने पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात जी गरुडझेप घेतली आहे, त्याचे हे एक ज्वलंत उदाहरण ठरावे. मेट्रोचे जाळे, भविष्याचा वेध घेणाऱ्या ‘पॉड टॅक्सी’, कोस्टल रोड, ‘समृद्धी’सारखे महामार्ग आणि आता ‘मिसिंग लिंक’. या सर्व प्रकल्पांतून एकच गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे महाराष्ट्र आता थांबणार नाही. राज्याची ही घोडदौड जागतिक स्तरावर एक नवी ओळख निर्माण करणारी ठरत आहे.
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस-वे’ हा तसा देशातील पहिलावहिला द्रुतगती मार्ग. १९९०च्या दशकात शिवसेना-भाजप युतीच्या काळातच या मार्गाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या मार्गाने मुंबई-पुणे प्रवासाची व्याख्याच बदलली. मात्र, या मार्गावरील खंडाळा घाट हे चालकांसाठी नेहमीच एक मोठे आव्हान असे. पावसाळ्यात दरडी कोसळणे, अवजड वाहनांमुळे होणारी वाहतुककोंडी आणि अपघातांच्या मालिकेमुळे प्रवाशांना मोठाच मनस्ताप सहन करावा लागे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणूनच ‘मिसिंग लिंक’ची संकल्पना पुढे आली. या प्रकल्पातील बोगदे हे जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक ठरले असून, यात उभारण्यात आलेला ‘केबल-स्टेड’ पूल हा जमिनीपासून १३२ मीटर उंचीवर आहे. तो आशियातील सर्वांत उंच पुलांपैकी एक ठरला. त्याशिवाय, जगातील सर्वांत मोठा रुंद बोगदा, या जागतिक विक्रमालाही त्याने गवसणी घातली आहे. हा प्रकल्प भारतीय अभियंत्यांच्या कौशल्याचा, त्यांच्या कल्पकतेचा आणि महाराष्ट्राच्या जिद्दीचा एक अद्वितीय अविष्कार ठरावा. सह्याद्रीच्या कठीण कातळाला भेदून विकासाचा मार्ग कसा प्रशस्त केला जातो, याचेच हे मूर्तिमंत उदाहरण.
‘मिसिंग लिंक’ प्रकल्प राष्ट्राला अर्पण झाल्यामुळे, मुंबई आणि पुण्यातील अंतर सुमारे सहा किलोमीटरने कमी झाले आहे. तथापि, यातून वाचणारा वेळ हा अत्यंत महत्त्वपूर्ण असाच. घाटातील वाहतुककोंडी टळल्यामुळे प्रवाशांचा किमान २० ते ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. आजच्या वेगवान जगात ‘वेळ हाच पैसा आहे’. मुंबई-पुणे या पट्ट्यात दररोज लाखो नागरिक, ‘आयटी’ व्यावसायिक, उद्योजक आणि विद्याथ प्रवास करतात. त्यांच्या आयुष्यातील रोजचा अर्धा-पाऊण तास वाचणे, हे त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणारे ठरेल. याशिवाय, घाटातील वाहतुककोंडीमुळे होणारा इंधनाचा अपव्ययही आता थांबणार असल्याने, दररोज हजारो लिटर इंधनाची बचत होईल. घाटातील अपघातांचे प्रमाण या नव्या आणि सरळ मार्गामुळे शून्यावर येण्यासही मदत होईल. औद्योगिक मालवाहतूक वेगाने झाल्यामुळे उत्पादन क्षेत्रालाही याचा मोठाच फ लाभ होणार असून, राज्याच्या ‘जीडीपी’ वाढीला यातूनच गती मिळेल.
महामार्गांबरोबरच, शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावरही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने दिलेला भर कौतुकास्पद असाच. एका दशकापूर्वी मुंबईतील वाहतूक म्हणजे गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेन आणि ट्राफिकमध्ये अडकलेल्या ‘बेस्ट’ बस, असेच समीकरण होते. आज मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांचा चेहरामोहराच ‘मेट्रो’मुळे बदलला आहे. मुंबईत मेट्रोच्या विविध मार्गिकांचे जाळे वेगाने विणले जात असून, यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता वातानुकूलित, सुरक्षित आणि वेगवान झाला आहे. कागदावरच रेंगाळलेले हे प्रकल्प फडणवीस सरकारमुळे वेगाने माग लागले. पुण्यातही मेट्रो धावल्याने, सांस्कृतिक राजधानीला एक आधुनिक नागरी वाहतूक व्यवस्थाही मिळाली. नागपूर मेट्रोने तर विदर्भाच्या विकासाला एक नवे परिमाणच दिले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जितकी सक्षम, तितकाच रस्त्यांवरील वाहनांचा ताण कमी होऊन, पर्यावरणाचेही रक्षण होते. शाश्वत विकासाचे हे प्रारुप महाराष्ट्र यशस्वीपणे देशासमोर मांडत आहे. आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारण्यात, महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला आहे. ‘वांद्रे-कुर्ला संकुला’सारख्या देशातील सर्वांत मोठ्या व्यावसायिक केंद्रात, ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्प राबवण्याचा निर्णय हा याच प्रगत विचारसरणीचा भाग.
राज्याच्या कानाकोपऱ्यात महामार्गांचे चौपदरीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोणतेही शहर किंवा गाव आता विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेले नाही. मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणात अडकलेला उद्योग आता छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि सोलापूरसारख्या शहरांकडे वळत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला ‘वन ट्रिलियन डॉलर इकोनॉमी’ बनवण्याचे जे उद्दिष्ट ठेवले, ते गाठण्यासाठी हे सर्व प्रकल्प भक्कम पाया ठरणार आहेत. त्यांच्या भगीरथ प्रयत्नांमुळेच आज महाराष्ट्र विदेश गुंतवणुकीत देशात अव्वल स्थानावर आहे. पायाभूत प्रकल्पांचा एकत्रित परिणाम हा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि पर्यायाने सर्वसामान्यांच्या जीवनावर सकारात्मक होत आहे. ‘मिसिंग लिंक’चे आज झालेले राष्ट्रार्पण महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील सुवर्णयुगाचा अध्याय ठरावा. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याशी जोडणारा एक भक्कम दुवा आज पूर्ण झाला आहे.