सिनेसृष्टीचा सफरनामा

    02-May-2026   
Total Views |
Bollywood Photo Exhibition Mumbai
 
‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट‌’ अर्थात ‌’एनजीएमए‌’, मुंबई आणि भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने, ‌‘लेंस एंड लिगेसी - बॉलीवुड इन फोकस‌’ या भावस्पश छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० एप्रिल रोजी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त, या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. दि. ३० जूनपर्यंत हे प्रदर्शन ‌‘एनजीएमए‌’च्या सर कावसजी जहांगीर सभागृहात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ७ या कालावधीमध्ये हे प्रदर्शन निःशुल्क सगळ्यांसाठी खुले असून, दर सोमवारी आणि राष्ट्रीय सुट्यांच्या दिवशी प्रदर्शन बंद राहणार आहे. या प्रदर्शनात भारतीय चित्रपटसृष्टीची स्थित्यंतरे अत्यंत खुबीने टिपली आहेत. या प्रदर्शनात चित्रपटसृष्टीतील विविध प्रकारच्या दुमळ संग्रहित सामग्रीचा समावेश आहे. या प्रदर्शनातील भावविश्वाचा घेतलेला हा मागोवा...
 
आपल्या कॅमेऱ्यातून भारताचं दर्शन घडवणारे प्रख्यात छायाचित्रकार रघू राय यांचे, काही दिवसांपूवच निधन झाले. पाच दशकांहून अधिक काळ छायाचित्रांच्या क्षेत्रात मातब्बरी असलेल्या या माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे, आपलं सभोवताल टिपण्याचं त्यांचं कौशल्य. इंदिरा गांधींपासून ते बाळासाहेब ठाकरेपर्यंत, त्यांच्या कॅमेऱ्यातून एक वेगळाच विलक्षण भारत सगळ्यांनीच अनुभवला. कॅमेरा हे एक साधन आहे आणि छायाचित्रकार या वस्तूला वापरून, जग दाखवणारा एक कलाकार. फोटो जर्नलिझम ही स्वतंत्र शाखा, याच साधनेचे सामर्थ्य दाखवणारी ज्ञानशाखा आहे. १०० वर्षांपूर्वी भारतीय जनमानसावर सिनेमा नावाच्या एका गोष्टीची मोहिनी पडली आणि या मुलखाचा इतिहासच बदलला. बोलपटांच्या माध्यमातून नवीन सृष्टी जन्माला घालणाऱ्या या तंत्राने, इथल्या लोकांच्या मनाचा ताबा घेतला.
 
सिनेमाने लोकांना रडवलं, हसवलं, रिझवलं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जगवलही. लोकप्रियतेचा नवा उच्चांक गाठणाऱ्या ‌‘शोले‌’पासूनचा प्रवास, आज भारत देशाच्या ‌‘धुरंधर‌’ असण्याची गोष्ट ताकदीने पडद्यावर मांडतो आहे.
 
एका बाजूला सिनेमा जसा लोकांच्या मनाचा ठाव घेत होता, त्याच पद्धतीने दुसरीकडे सिनेमा या गोष्टीला आपल्या कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये कैद करणारी माणसंसुद्धा होती. या माणसांनी केवळ चित्रपटांमधल्या अभिनेते- अभिनेत्रींना आपल्या फ्रेममध्ये टिपलं नाही; तर लोकप्रिय निर्मितीमागची गोष्टही छायाचित्रांच्या माध्यमातून लोकांना सांगितली. हीच गोष्ट सांगण्याचं काम ‌‘लेंस एंड लिगेसी - बॉलीवुड इन फोकस‌’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून सध्या सुरू आहे.
 
जेठालाल एच. ठाकर, दामोदर कामत आदी मंडळींनी, चित्रपटाचं एक वेगळच विश्व लोकांसमोर उलगडून सांगितलं. या प्रदर्शनाच्या माध्यमातूनही हाच प्रवास आपल्याला बघायला मिळतो. १९३० च्या दशक ते आधुनिक काळातील छायाचित्रांपर्यंत, सिनेमाच्या सेटवरील सिनेतारकांचे फोटो, पडद्यामागच्या दृश्यांचे फोटो इथे प्रदर्शनात उपलब्ध आहेत. या चित्रांच्या माध्यमातूनच सिनेमा या तंत्राचं सातत्याने घडून आलेलं स्थित्यंतर, आपल्यास अनुभवायला मिळतं.
 
उदाहरणार्थ, ‌‘आयोध्याचा राजा‌’, ‌‘अलम आरा‌’ या चित्रपटांच्या पोस्टर्सपासून ते ‌‘शोले‌’सारख्या चित्रपटांपर्यंत, कलासृष्टीचा एक गुणात्मक उत्कर्ष, एक भावविभोर आणि रसाळ स्पर्श आपल्याला अनुभवण्यास मिळतो. हा समग्रतेचा अवकाश एका ठिकाणी आणणं हीच रसिकांसाठी, चित्रपटांचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल.
 
‌‘एनजीएमए‌’ मुंबईच्या संचालक निधी चौधरी या प्रदर्शनामागील दृष्टिकोन स्पष्ट करताना सांगतात की, २०१९ मध्ये मुंबईला ‌‘युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ फिल्म‌’ हा मानाचा दर्जा मिळाला. यंदा भारतीय चित्रपटसृष्टी आणि मुंबई यांचा गौरव करणारं प्रदर्शन साकारण्याची संधी मिळाल्यावर, हा टप्पा साजरा करण्याची ही उत्तम संधी वाटली. “लेंस लिगेसी‌’चा मुख्य उद्देश म्हणजे, संग्रहित आणि समकालीन माध्यमांतून भारतीय चित्रपटसृष्टीचे समृद्ध दृश्य आणि सांस्कृतिक प्रवास मांडत मुंबईची ओळख साजरी करणं. पाच दशकांहून अधिक कारकीर्द असलेले ज्येष्ठ छायाचित्रकार प्रदीप चंद्रा म्हणतात, “आम्ही वर्षांपूव काढलेली साधी छायाचित्रं, कालांतराने महत्त्वाची दस्तऐवज झाली आहेत. ‌‘आरके‌’ स्टुडिओमध्ये अमिताभ बच्चन किंवा बॉम्बे सेंट्रल स्थानकावरील देव आनंद यांची छायाचित्रं, आज इतिहास सांगतात. त्यावेळी आम्हाला ‌‘स्टिल फोटोग्राफर्स‌’ म्हणून मानधन मिळत नव्हतं; आम्ही केवळ अंतर्ज्ञान, रचना आणि उपलब्ध प्रकाश यांवरच काम करत होतो. आज त्या प्रतिमांना स्वतःचं स्वतंत्र आयुष्य लाभलं आहे.” छायाचित्रकार शांतनू दास यांनी तर त्यांच्या दोन दशकांहून अधिक काळातील कामातून, चित्रपटसृष्टीतील ग्लॅमर आणि वास्तव दोन्ही दाखवलं आहे. ते म्हणतात, “मी केवळ मनोरंजन क्षेत्रापुरता मर्यादित नाही; मी सामान्य लोकांचं दैनंदिन जीवनही टिपतो. माझ्या कामात चित्रपटसृष्टीचा ग्लॅमर आणि वास्तव जीवनातील कठोर सत्य दोन्हीच यथार्थ दर्शन घडतं.” प्रदर्शनात धर्मेंद्र आणि आशा भोसले यांना समर्पित दोन विशेष श्रद्धांजली भिंती आहेत. गेल्या वष धर्मेंद्र यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला, तर अलीकडेच आशा भोसले यांच्या निधनाने या प्रदर्शनाला अधिक भावनिक स्पर्श लाभला.
 
काळाच्या ओघात कृत्रिम बुद्धिमत्ता आपला सबंध अवकाश व्यापून टाकणार आहे, यात काही शंकाच नाही. याच एका कारणासाठी अशा पद्धतीचं प्रदर्शन घडवणं गरजेचं आहे. मनोरंजन करणाऱ्या, समाजाला दिशा देणाऱ्या, युवकांसाठी ‌‘अँग्री यंग मॅन‌’ तयार करणाऱ्या चित्रपटांचे प्रभाव क्षेत्र आता केवळ तेवढ्यापुरतेच मर्यादित राहिलेले नसून, याचा व्यावसायिक, सामाजिक, सांस्कृतिक विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. भविष्याची स्वप्नं बघत आपण कुठवर येऊन पोहोचलो, याचं सम्यक आकलनदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. मोठ्या पडद्यावरचा सिनेमा, आपल्या हाताएवढ्या मोबाईलवरसुद्धा आला. येणाऱ्या काळात तंत्र, आशय, निर्मितीच्या पातळीवर सिनेमा म्हणून आणखी काही बदल घडतीलही मात्र, वयाच्या एका टप्प्यावर जसं आपण मागे वळून बघतो, तशाच पद्धतीने हा प्रवाससुद्धा आपल्याला ‌‘बघता‌’ आला पाहिजे. आपलं संचित आपल्याला वेळोवेळी उमगलं पाहिजे.
 
- मुकुल आव्हाड
9967826983
छाया : जयेश पाटील

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.