एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केली जाणारी ‘बोस्टन मॅरेथॉन’ ही प्रतिष्ठित धावण्याची शर्यत, गेल्या आठवड्यात म्हणजे दि. २० एप्रिल २०२६ रोजी पार पडली. जगातल्या १२० देशांमधल्या एकंदर २४ हजार, ३६२ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. ४२ किमी, १९५ मीटर्स एवढ्या अंतराची ही शर्यत, यंदा केनियाच्या जॉन कॉरीर या धावपटूने २ तास, १ मिनिट, ५२ सेकंद एवढ्या विक्रमी वेळेत पूर्ण केली. परंतु, मुळात ही शर्यत दोन ब्रिटिश हेरांची टिंगल करण्यासाठी आयोजित केली होती. कसे ते जाणून घेऊया...
हल्ली जिकडे-तिकडे मॅरेथॉन शर्यती होत असतात. आता ती आधुनिक फॅशनच झाली आहे. त्यामुळे पूव रा. स्व. संघाच्या हाफ पॅन्टची टिंगल करणारे कथित पुरोगामी लोकसुद्धा, घळघळीत अर्ध्या चड्ड्या घालून रस्त्यावरून धावत असतात.
असो. जगभरात सहा मॅरेथॉन शर्यती या फार लोकप्रिय, फार प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. त्या शर्यतींसाठी आपण पात्र ठरावे, ‘क्वालिफाय’ व्हावे म्हणून व्यावसायिक धावपटू अतिशय उत्सुक असतात. बोस्टन, न्यूयॉर्क, शिकागो, लंडन, बर्लिन आणि टोकियो या त्या सहा मॅरेथॉन शर्यती होत. शहरांच्या या नावांवरून आपल्या लक्षात येईल की, यातल्या पहिल्या तीन तर अमेरिकेतच होतात. दरवष ठरावीक महिन्यांमध्ये त्यांचे आयोजन केले जाते.
नुकतीच म्हणजे दि. 20 एप्रिल 2026 रोजी पार पडलेली ‘बोस्टन मॅरेथॉन’ ही, दरवष एप्रिलच्या तिसऱ्या सोमवारी घेण्यात येते. बोस्टन शहराचे एक उपनगर हॉपकिंटन येथून सुरू होणारी ही स्पर्धा, 26 मैल 385 यार्ड किंवा 42 किमी. 195 मीटर एवढा पल्ला मारून, बोस्टन शहरातल्या कोपली स्क्वेअर या चौकात संपते.
या शर्यतीच्या मुळाशी अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धातल्या काही घटना आहेत. मात्र, मुद्दाम फारसे कुणी त्यांचा उल्लेख करीत नाहीत. कॅप्टन जॉन ब्राऊन आणि लेफ्टनंट हेन्री डि बर्निअे या ब्रिटिश सैन्यातल्या दोघा अधिकाऱ्यांनी त्यांचा हरकाम्या नोकर जॉन याच्यासह, बोस्टन शहराच्या आसमंतात म्हणजेच तत्कालीन मेसेच्युसिटस् या वसाहतीत एक मोठा दौरा केला होता, किंवा पदभ्रमण केले होते म्हणूया. या पदभ्रमण मोहिमेत त्यांची भलतीच धावपळ झाली होती. वादळ, वारा आणि बर्फाचा मारा यांनी ते हैराण झाले होते. सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे, ते हेरगिरी करताहेत हे स्थानिक लोकांनी ओळखले होते. एखाद्या हेराला त्याचे बिंग फुटणे यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नसते. लाजिरवाणी आणि धोक्याचीही. त्यामुळेच तर कित्येक मैल धावत, चालत कसेबसे ते एकदा आपल्या बोस्टनच्या छावणीत पोहोचले होते. आणि त्यांनी जमा करून आणलेल्या माहितीच्या आधारावरच ब्रिटिश सेनाप्रमुख जनरल थॉमस गेज याने, दि. 19 एप्रिल 1775 या दिवशी अमेरिकन देशभक्त सैन्यावर लेक्झिंटन या ठिकाणी पहिला हल्ला चढवला. त्यापाठोपाठ काँकर्डची लढाई झाली. लेक्झिंटन आणि काँकर्डच्या लढाया, या अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धातल्या पहिल्यावहिल्या आणि चिरस्मरणीय लढाया.
एकप्रकारे या ब्रिटिश हेरांच्या धावपळीची टिंगल करायला किंवा टिंगलयुक्त स्मरण करायला, ‘बोस्टन ॲथलेटिक असोसिएशन’ या संस्थेने 1897 साली ‘बोस्टन मॅरेथॉन’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. आता मुळात मॅरेथॉन शर्यत ही काय भानगड आहे, हेही सांगायला हवे.
इसवी सन पूर्व चौथ्या शतकातली कथा. ग्रीक साम्राज्य आणि पर्शियन साम्राज्य यांची घमासान युद्धे सुरू होती. त्यात मॅरेथॉन या ठिकाणचे युद्ध फारच विशाल आणि भीषण झाले. ते ग्रीकांनी जिंकले. ही विजयाची वार्ताग्रीसची तत्कालीन राजधानी अथेन्स शहरात तातडीने पोहोचवण्यासाठी, ग्रीक सेनापतीने फिल्लिपिडस नावाच्या एका तरण्याबांड नौजवानाला बोलावले आणि सांगितले, “कुठंही थांबू नको. शक्य तितक्या वेगाने धावत जा आणि राजधानीत निरोप दे की, आपण जिंकलो.” तारुण्याने सळसळणारा आणि विजयानंदाने फुरफुरणारा फिल्लिपिडस तसाच निघाला, नि बेहोशपणे धावत सुटला. कित्येक राने, पठारे, डोंगर, दऱ्या, बर्फवृष्टी यांना तोंड देत तो अथेन्सला पोहोचला आणि ग्रीक सम्राटासमोर ‘नेनिक्कामेन, नेनिक्कामेन’ म्हणजे ‘आपण जिंकलो, आपण जिंकलो’ असे ओरडला. तो सुमारे 150 मैल किंवा 240 किमी जराही न थांबता धावला होता. त्या अतिश्रमाने आणि आता एकदम थांबल्यामुळे तो एकदम कोसळला आणि मरण पावला.
आता या दंतकथेतल्या तपशिलाबाबत खुुद्ध इतिहासकारांमध्ये एकमत नाही. हिरोडोटस, प्लूटार्क इत्यादी प्राचीन ग्रीक इतिहासकार हीच गोष्ट वेगवेगळ्या तपशिलाने देतात. त्या तरुणाचे नावसुद्धा वेगवेगळे सांगतात. पण, तरीही एकंदरीत युरोपच्या दंतकथा-लोककथांमध्ये, मॅरेथॉन या ठिकाणची लढाई आणि फिल्लिपिडसचा हा निरोप वगैरे गोष्टी फार लोकप्रिय आहेत.
रॉबर्ट ब्राउनिंग हा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातला, फार प्रख्यात असा ब्रिटिश कवी आणि नाटककार. त्याने 1879 साली, वरील दंतकथेवर ‘फिल्लिपिडस’ याच नावाची एक कविता रचली. ती कविता कमालीची लोकप्रिय झाली नि तेव्हापासून मूळ इतिहासातून मतमतांतरे बाजूला पडून, ब्राउनिंगने कवितेत रंगवलेली घटना हाच खरा इतिहास, असे जनतेने ठरवून टाकले.
यानंतर 17 वर्षांनी म्हणजे 1896 साली, प्राचीन ऑलिम्पिक खेळ स्पर्धांचे आधुनिक स्वरूपात पुनरुज्जीवन झाले. जगभरचे सर्व देश आपापले संघ या स्पर्धांमध्ये उतरवू लागले, ते आजतागायत; हे आपल्याला माहीतच आहे. 1896 सालच्या या पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये, मॅरेथॉन ते अथेन्स हे आधुनिक काळातले 25 मैल किंवा सुमारे 40 किमी अंतर धावण्याची एक स्पर्धा घ्यावी आणि तिला ‘मॅरेथॉन शर्यत’ असेच म्हटले जावे, ही कल्पना मायकेल ब्रेल या फ्रेंच भाषाशास्त्रज्ञाची. बॅरन पिअरे डि क्युबर्टिन हा ऑलिम्पिक स्पर्धांचा जनक. त्यालाही ती कल्पना आवडली. त्यानुसार घेण्यात आलेली पहिली मॅरेथॉन शर्यत, ग्रीक धावपटू चारिलाओस व्हासिलाकोस याने 3 तास, 18 मिनिटे एवढ्या वेळात जिंकली.
आता हे सगळे झेंगट अमेरिकेत बोस्टनला कुठे पोहोचले? असे पाहा की, साधारण 1620 ते 25 सालापासून, ब्रिटनमधले अनेकजण अनेक कारणांनी अमेरिकेत स्थलांतरित होऊ लागले. तिथल्या विशाल मोकळ्या भूमीवर त्यांनी आपल्या वसाहती उभारल्या. पुढे स्थानिक रेड इंडियन टोळ्यांशी लढून, त्यांची कत्तल करूनदेखील अशा वसाहती उभ्या राहिल्या. बोस्टन, ऱ्होड आयलंड, न्यूयॉर्क, न्यू हँपशायर, व्हर्जिनिया असा अमेरिकेचा पूर्व किनारा व्यापणारी ही गावे किंवा वसाहती, या अमेरिकेतल्या ब्रिटिशांच्या आद्य वसाहती.
100 वर्षे उलटली आणि या अशा 13 वसाहतींच्या तिथल्या मूळ ब्रिटिश वंशाच्या; पण आता पूर्ण अमेरिकन बनलेल्या नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याची अस्मिता निर्माण झाली. त्यांचा ब्रिटिशांची झगडा सुरू झाला. उत्तरोत्तर हे भांडण इतके विकोपाला गेले की, युद्ध केल्याशिवाय वसाहती आपल्या ताब्यात राहणार नाहीत, हे ब्रिटिश राजकारणी आणि सेनापती यांना समजले. तसेच युद्धाशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही, हे अमेरिकन वसाहतींना कळून चुकले.
जनरल थॉमस गेज आणि जनरल जॉर्ज वॉशिंग्टन हे खरे म्हणजे एकेकाळचे सहकारी. दोघे ब्रिटिश सेनापती म्हणूनच फ्रेंचांविरुद्ध लढले होते. पण, आता ते एकमेकांविरुद्ध उभे राहिले. जनरल गेज ब्रिटिश सेनेचे अधिपत्य करीत होता; तर जनरल वॉशिंग्टन अमेरिकन स्वातंत्र्यसेनेचा प्रमुख होता.
बोस्टन शहरात छावणी करून असलेल्या जनरल गेजला खबर लागली की, जवळच्याच लेक्झिंटन आणि काँकर्ड ठाण्यांमध्ये स्वातंत्र्यसेनेचा फार मोठा अन्नधान्य नि शस्त्रसाठा आहे. त्याचीच बित्तंबातमी काढण्यासाठी त्यांनी कॅप्टन ब्राऊन आणि लेफ्टनंट बर्निअे या आपल्या हुशार हेरांना पायीपायी बोस्टन परिसरात पाठवले. ही गोष्ट 1775 सालची आहे. मोटारचा शोध लागलेलाच नव्हता. घोडा वापरला तर संशय येईल, म्हणून हे हेर बोस्टन ते काँकर्ड या परिसरात खूप फिरले. खाणावळी, दारूचे गुत्ते, जुगारी अड्डे या बातम्या मिळण्याच्या हमखास जागा. ते पालथे घालून त्यांनी खूप माहिती जमा केली पण, एकेठिकाणी मात्र त्यांचे बिंग फुटले. तेव्हा नेमकेच बाहेर वादळ सुरू होते; पण वादळ, वारा, हिमवर्षाव कसलीही पर्वा न करता ते धावत बोस्टनला गेले.
जनरल गेजने तातडी केली आणि स्वातंत्र्यसेनेची रसद मारण्यासाठी, दि. 19 एप्रिल 1775 या दिवशी लेक्झिंटनवर हल्ला केला. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धातली ही पहिली लढाई. पण, गेजच्या तातडीचा उपयोग झाला नाही. स्वातंत्र्यसैनिकांनी त्याच्याहीपेक्षा त्वरेने रसदसाठा अन्यत्र हलवला होता. पुढे रीतसर युद्धे झाली, नि अखेर ब्रिटनचे वर्चस्व झुगारून अमेरिका हा स्वतंत्र नि सार्वभौम देश बनला.
हा सगळा घटनाप्रवाह नि 1896 सालची अथेन्स ऑलिम्पिकमधली मॅरेथॉन शर्यत यापासून प्रेरणा घेत, ‘बोस्टन ॲथलेटिक असोसिएशन’ने 1897 सालच्या दि. 19 एप्रिलला पहिली ‘बोस्टन मॅरेथॉन’ आयोजित केली. दि. 19 एप्रिल हा दिवस अमेरिकेत ‘पेट्रियटस् डे’- ‘देशभक्तांचा दिवस’ म्हणून साजरा होतो.
पुढे मात्र, दि. 19 एप्रिलऐवजी, एप्रिल महिन्याचा तिसरा सोमवार, असा दिवस नक्की करण्यात आला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1897 ते 1986 पर्यंत या शर्यतीतल्या विजेत्याला कोणतेही रोख बक्षीस मिळत नसे. ऑलिव्ह वृक्षाच्या पानांचा एक सुंदर मुकुट हेच बक्षीस. 1986 पासून मात्र दृश्य बदलले. मुकुट ऑलिव्ह पानांचाच असतो, फक्त ती पाने सोन्याची असतात.