Sir H. N. Reliance Foundation Hospital : सुरतच्या १७ वर्षीय मुलाला मिळाले 'नवजीवन'; रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयाची किमया

    02-May-2026
Total Views |

transplant

मुंबई : (Sir H. N. Reliance Foundation Hospital) मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयातील डॉक्टरांनी सुरत येथील १७ वर्षीय दर्शन सुराणा याचे प्राण वाचवले. अचानक झालेल्या आणि वेगाने वाढलेल्या फुफ्फुसांच्या संसर्गामुळे काही दिवसांतच त्याची अवस्था एंड-स्टेज लंग फेल्युअरपर्यंत पोहोचली होती.दर्शनला लहानपणी ASD (हृदयातील छिद्र) दुरुस्तीची शस्त्रक्रिया झाली होती. सुरुवातीला त्याला किरकोळ संसर्ग असल्याचे वाटत होते. मात्र अल्पावधीतच त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला ताप, तीव्र श्वसनाचा त्रास आणि बेशुद्ध पडण्याचा (syncope) झटका आला, ज्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. शस्त्रक्रियेनंतर त्याला क्रिटिकल इलनेस न्यूरोपॅथी (CIN) झाली होती, ज्यामुळे तो सुरुवातीला उभा राहू शकत नव्हता. अनेक उपचार पद्धती करूनही त्याची प्रकृती खालावतच गेली. तपासणीत त्याला न्यूमोथोरॅक्स (फुफ्फुसात हवा साचणे), फुफ्फुसांचे गंभीर नुकसान आणि तीव्र संसर्ग असल्याचे आढळले. ही अवस्था पुढे Acute Respiratory Distress Syndrome (ARDS) मध्ये परिवर्तित झाली. त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी अत्यंत घसरली, त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि अनेक वेळा ‘प्रोनिंग’ (पोटावर झोपवण्याची प्रक्रिया) करण्यात आली.

प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला ECMO (एक्स्ट्रा कॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनशन) या अत्यंत गंभीर अवस्थेत वापरल्या जाणाऱ्या लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले. मात्र ECMO वर असूनही त्याच्या फुफ्फुसांमध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या फुफ्फुस प्रत्यारोपण पथकाने त्याचे मूल्यांकन करून १ जानेवारी २०२६ रोजी त्याला ‘सुपर अर्जंट’ प्रत्यारोपण यादीत समाविष्ट केले. त्यानंतर १० जानेवारी २०२६ रोजी त्याच्यावर यशस्वीपणे दोन्ही फुफ्फुसांचे (बायलेट्रल सिक्वेन्शियल) प्रत्यारोपण करण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर त्याला ECMO वरून हटवता आले, जे त्याच्या प्रकृतीसाठी महत्त्वाचे टर्निंग पॉईंट ठरले.तथापि, शस्त्रक्रियेनंतरचा काळही आव्हानात्मक होता. त्याला दीर्घकाळ आयसीयूमध्ये ठेवावे लागले, व्हेंटिलेटर सपोर्ट द्यावा लागला आणि अनेक वेळा ब्रॉन्कोस्कोपी करण्यात आली. श्वसनमार्गातील अडचणींमुळे त्याच्यावर ब्रॉन्कियल स्टेंटिंगही करण्यात आले.
 
डॉक्टरांच्या बहुविद्याशाखीय उपचार, पल्मनरी रिहॅबिलिटेशन आणि आक्रमक फिजिओथेरपीमुळे दर्शनची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. पूर्णपणे लाईफ सपोर्टवर अवलंबून असलेला दर्शन आता बसू शकतो, आधाराने उभा राहू लागला आहे आणि हळूहळू त्याची ताकद वाढत आहे. सध्या त्याला अत्यल्प ऑक्सिजन सपोर्टची गरज आहे आणि त्याने तोंडावाटे आहार घेण्यासही सुरुवात केली आहे. ही घटना दर्शवते की, साधा वाटणारा संसर्गही काही वेळा अतिशय गंभीर रूप धारण करू शकतो. मात्र योग्य वेळी हस्तक्षेप, आधुनिक लाईफ सपोर्ट तंत्रज्ञान आणि फुफ्फुस प्रत्यारोपण यामुळे अशा अत्यंत गंभीर परिस्थितीतही रुग्णाला नवजीवन मिळू शकते.