पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा;नागरिकांनी काटकसरीने वापर करावा-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
19-May-2026
Total Views |
नागपूर : (Petrol Diesel Supply) पेट्रोल,डिझेल आणि गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत महत्त्वाची बैठक घेण्यात आली असून नागपुरात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नागपूरच्या नियोजन भवन येथे प्रसारमाध्यमांशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी इंधनाचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बावनकुळे म्हणाले की,नागपुरात पेट्रोल,डिझेल आणि गॅसचा सुरळीत पुरवठा राखण्यासाठी प्रयत्न सुरू असून कुठल्याही प्रकारची मोठी अडचण नाही.काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील वाहतूक किंवा तांत्रिक कारणांमुळे एखाद्या पेट्रोल पंपावर पुरवठा उशिरा होत असला तरी केंद्र सरकारकडून पुरवठ्यात कोणतीही समस्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.वाशिम येथील परिस्थितीचीही दखल घेतल्याचे त्यांनी सांगितले. (Petrol Diesel Supply)
🟧 19 - 05 - 2026 | 📍नागपूर | माध्यमांशी संवाद
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद सदस्याची निवड बिनविरोध व्हावी, याकरिता मी सर्वच पक्षांच्या नेत्यांना बोलणार आहे. एकूणच राज्यातील जास्तीत जास्त विधान परिषद निवडणुका या बिनविरोध व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करू.… pic.twitter.com/A7HJpQWO9h
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) May 19, 2026
विधानपरिषद निवडणुकीच्या संदर्भात बोलताना म्हणाले , नागपूरमध्ये भाजपला ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. त्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असून विविध राजकीय पक्षांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरीतील किरण सामंत तस्करी आणि अवैध उत्खनन प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की,अवैध उत्खननावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ती होणारच.संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
पाणीटंचाईच्या मुद्द्यावर त्यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे.त्यामुळे MIDC क्षेत्रातील उद्योगांना पाणी वापरावर निर्बंध घालण्याबाबत बैठक घेण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी धरणातील साठा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती काटकसर करावी लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
रेशन धान्य वितरणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, काही गावांमध्ये गरज नसलेल्या लाभार्थ्यांनाही धान्य मिळत आहे. ग्रामपंचायतींनी अशा लाभार्थ्यांची यादी तपासून संमतीने नावे कमी करावीत.पुढील ३० दिवसांत प्राधान्य गट अंतिम करून धान्य वितरणाची प्रक्रिया राबविण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील बंद पडलेल्या दगड खाणींच्या खड्ड्यांबाबतही त्यांनी महत्त्वाची घोषणा केली.OIL,WCLआणि महसूल विभागाला सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले असून आठ सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.या खड्ड्यांमध्ये विद्युत प्रकल्पातील राख व माती टाकून सामाजिक वनीकरण योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (Petrol Diesel Supply)
बी-बियाण्यांच्या काळाबाजारावर सरकारची कडक नजर असल्याचे सांगत नागपूर जिल्ह्यात कुठेही काळाबाजार होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. वीज आणि पाणी व्यवस्थापनाबाबत बोलताना त्यांनी सोलर ऊर्जेच्या वापरावर भर दिला. सोलरच्या माध्यमातून ईव्ही चार्जिंग आणि वीज वापर शक्य असल्याने वीज निर्मितीसाठी पाणी आणि कोळशाची टंचाई गंभीर विषय नसल्याचे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये डिझेलअभावी अडचणींचा उल्लेख करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या व्हिडिओबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, संबंधित व्हिडिओ खरा आहे. मात्र अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे सार्वजनिक वक्तव्य करणे योग्य नसून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Petrol Diesel Supply)