रिक्षात मद्यपान करणारे ताब्यात, अमली पदार्थ विक्रीचे दुकान हटवले
18-May-2026
Total Views |
मुंबई : (Ritu Tawde Mayor) घाटकोपरमधील सुधा पार्क मार्गावरील अनधिकृत पार्किंग, रिक्षांच्या आडून सुरू असलेले गैरप्रकार आणि महिलांना होणारा त्रास याची गंभीर दखल घेत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी सोमवारी थेट परिसरात धडक देत पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. या कारवाईत रस्त्यावर आणि पदपथांवर उभी केलेली वाहने व रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर रिक्षामध्ये खुलेआम मद्यप्राशन करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अमली पदार्थ विक्री होत असल्याचे आढळलेल्या एका दुकानाचे निष्कासनही करण्यात आले.
महापौरांनी घाटकोपर येथील एन विभाग कार्यालयात विविध नागरी समस्यांबाबत बैठक घेतली. यावेळी सुधा पार्क परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी, पदपथांवरील अतिक्रमण, महिलांची छेडछाड, तसेच शाळा आणि रुग्णालयांच्या परिसरात विक्री होणारे पानमसाला व अमली पदार्थ याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी नागरिकांनी केली.
बैठकीनंतर महापौरांनी महानगरपालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांसह सुधा पार्क मार्गाची पाहणी केली. पुष्प विहार मार्गावरील एका दुकानाला एसटीडी-पीसीओ आणि दिव्यांग आरक्षणांतर्गत परवाना असतानाही तेथे अमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. नियमभंग स्पष्ट झाल्यानंतर संबंधित दुकानाचे तात्काळ निष्कासन करण्याचे आदेश महापौरांनी दिले.(Ritu Tawde Mayor)
पाहणीदरम्यान सुधा पार्क मार्गावर अनेक रिक्षा आणि वाहने पदपथ व रस्त्यावर अनधिकृतरीत्या उभी असल्याचे आढळले. एका रिक्षामध्ये चालक खुलेआम मद्यपान करत असल्याचे दिसून आल्यानंतर महापौरांनी त्याला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सर्व अनधिकृत वाहनांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, शांतिपथ परिसरात कबुतरांना दाणे-पाणी टाकल्यामुळे अस्वच्छता आणि नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रारही स्थानिकांनी केली. या पार्श्वभूमीवर संबंधित जागा कबुतरमुक्त करून स्वच्छता व सुशोभीकरण करण्याचे निर्देश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.
चार वर्षांनंतर सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवक निवडून आले असून, सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील नागरी सुविधा, वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्था याकडे विशेष लक्ष देत पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही महापौर रितू तावडे यांनी यावेळी केले.(Ritu Tawde Mayor)