आरोग्य सेवा नागरिकाभिमुख करण्यासाठी समन्वयाने काम करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; सामाजिक क्षेत्र वॉर रूम बैठकीत निर्देश

    18-May-2026   
Total Views |
Health Services Maharashtra
 
मुंबई : (Health Services Maharashtra) राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यातील आरोग्यसेवा परिणामकारक, दर्जेदार आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत प्रधानमंत्री आयुष्मान आरोग्य मंदिर, क्रिटिकल केअर ब्लॉक आणि प्रयोगशाळांच्या उभारणीची कामे निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
 
सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री वॉररुमची स्थापना करण्यात आली असून या वॉररुम अंतर्गत आरोग्य विभागाच्या केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
 
केंद्र व राज्य शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत पायाभूत आरोग्य सुविधा बळकटीकरण, प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन, नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी एचपीव्ही लसीकरण मोहीम आदींसह विविध प्रलंबित कामांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. (Health Services Maharashtra)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात दर्जेदार व सहज उपलब्ध आरोग्य सेवा निर्माण करण्यावर शासनाचा विशेष भर आहे. यासाठी तमिळनाडूसह विविध राज्यांच्या आरोग्य व्यवस्थेचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. केंद्र शासनाकडून मिळणारा निधी निर्धारित वेळेत खर्च होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आयुष्मान आरोग्य मंदिर उभारणे, क्रिटिकल केअर ब्लॉक व एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांची कामे वेगाने करण्यासाठी लक्ष घालावे. सुरुवातीच्या काळात कामांमध्ये विलंब होत होता. मात्र, आता जिल्ह्यांची कामगिरी समाधानकारक आहे.”
 
शासनाच्या आरोग्य सुविधांमध्ये गुणवत्ता असावी
 
ते पुढे म्हणाले की, “आरोग्य क्षेत्राला कमी प्राधान्याचे क्षेत्र समजण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. शासनाच्या आरोग्य सुविधांमध्ये गुणवत्ता, स्वच्छता आणि चांगले ब्रँडिंग असावे. शासकीय दवाखाने म्हणजे अस्वच्छ किंवा निकृष्ट ही नागरिकांची धारणा बदलण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. मॉड्युलर तंत्रज्ञानामुळे दर्जेदार आणि वेळेत काम शक्य होत असल्याने अधिकाऱ्यांनी कल्पकतेने काम करावे.” (Health Services Maharashtra)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....