परग्रह बुद्धिमत्तेचा शोध हा केवळ कुतूहल भागवणारा प्रयत्न नसून, तो आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला अधिक सखोल करणारा आहे. विश्वाची अफाट विशालता आणि त्यातील वैविध्य आपल्याला सतत नवे प्रश्न विचारायला भाग पाडते. आज आपण ज्या पद्धतीने संकेत शोधत आहोत, त्या अपुर्या ठरू शकतात. कारण, संकेतांची रूपे आणि त्यांचे माध्यम आपल्या कल्पनेपेक्षा वेगळे असू शकते. म्हणूनच, हा शोध अधिक व्यापक, बहुविध आणि दीर्घकालीन स्वरूपाचा होत आहे.
मानवाच्या विचारविश्वात एक प्रश्न सतत घुमत राहतो, तो म्हणजे या अथांग विश्वात ‘आपण एकटे आहोत का?’ हा प्रश्न केवळ कल्पनारंजनापुरता मर्यादित नसून, तो आधुनिक विज्ञानाच्या सर्वात गंभीर आणि मूलभूत शोधांपैकी एक आहे. परग्रहावरील बुद्धिमान जीवनाचा शोध घेण्याचे प्रयत्न गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहेत. या संशोधनात मुख्यतः अवकाशातून येणार्या विद्युतचुंबकीय संकेतांचा अभ्यास करून इतर सजीव संस्कृतींचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रयत्नांमागे एक साधा तर्क आहे की, जर विश्वात इतर बुद्धिमान सजीव असतील; तर तेही संवाद साधण्याचा प्रयत्न करतील.
आजपर्यंतच्या शोधांमध्ये प्रामुख्याने ‘रेडिओ’ तरंगांचा वापर करून संकेत शोधले गेले. यासाठी अत्याधुनिक दुर्बिणी आणि संगणकीय पद्धती वापरल्या गेल्या. या पद्धतींमध्ये अत्यंत अरुंद वारंवारतेच्या पट्ट्यातील संकेत तपासले जातात. कारण, असा समज होता की, परग्रहावरील संस्कृती ऊर्जा मर्यादित असल्यामुळे अत्यंत नेमक्या वारंवारतेवरच संकेत पाठवतील. परंतु, या पद्धतीची एक मर्यादा आहे. आपण केवळ खूपच छोट्या पट्ट्यात शोध घेतो आणि त्यामुळे अनेक संभाव्य संकेत दुर्लक्षित राहू शकतात.
अलीकडील वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार, जर एखादी प्रगत संस्कृती खरोखरच संपर्क साधू इच्छित असेल, तर ती अत्यंत शक्तिशाली आणि विशिष्ट दिशेने पाठवलेले संकेत वापरू शकते. अशा प्रकारचे संकेत अत्यंत तीव्र असू शकतात आणि योग्य दिशेत असतील, तर ते सहज ओळखता येऊ शकतात. यामुळे शोधाची दिशा बदलण्याची गरज लक्षात येते. आता केवळ ‘रेडिओ’ तरंगांपुरते मर्यादित न राहता, संपूर्ण विद्युतचुंबकीय पट्ट्यात म्हणजेच, रेडिओ, अवरक्त आणि दृश्यमान प्रकाश यांच्यातही शोध घेण्याची गरज आहे. या नव्या दृष्टिकोनामुळे एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते. आपण ज्या पद्धतीने शोध घेत आहोत, ती अपुरी ठरू शकते. विश्वातील संकेत विविध स्वरूपात येऊ शकतात आणि ते पारंपरिक पद्धतीने ओळखणे नेहमी शक्य नसते. म्हणूनच, व्यापक आकाश सर्वेक्षण, विविध वारंवारता आणि दीर्घकालीन निरीक्षणे यांचा एकत्रित वापर करणे आवश्यक ठरते.
या संशोधनातून एक विचारप्रवर्तक निष्कर्षही समोर येतो. जर आपल्या आसपासच्या सुमारे 100 प्रकाशवर्षांच्या परिसरात एखादी प्रगत संस्कृती अस्तित्वात असती आणि ती जाणीवपूर्वक संकेत पाठवत असती, तर ते संकेत आपल्या निरीक्षणात आले असते. पण, असे कोणतेही स्पष्ट संकेत आढळले नाहीत. यावरून असा निष्कर्ष काढला जातो की, आपल्या जवळच्या परिसरात अशा प्रगत संस्कृतींचे अस्तित्व सध्यातरी आढळत नाही. यामुळे एक मोठा वैज्ञानिक प्रश्न निर्माण होतो. विश्व इतके विशाल असताना आपण एकटेच का आहोत? हा प्रश्न ‘फर्मी विरोधाभास’ म्हणून ओळखला जातो. एकीकडे विश्वात अब्जावधी तारे आणि ग्रह आहेत, तर दुसरीकडे परग्रह जीवनाचे ठोस पुरावे सापडत नाहीत. याचा अर्थ असा असू शकतो की, बुद्धिमान जीवन निर्माण होणे अत्यंत दुर्मीळ आहे किंवा ते इतके दूर आहे की, त्यांचे संकेत आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत.
या शोधामध्ये तार्यांची निवडही अत्यंत महत्त्वाची ठरते. जीवन विकसित होण्यासाठी तार्याचे आयुष्य दीर्घ असणे आवश्यक आहे. सूर्याप्रमाणे स्थिर आणि दीर्घायुषी तारे जीवनासाठी अनुकूल असतात. म्हणूनच, संशोधक अशा तार्यांभोवती फिरणार्या ग्रहांवर विशेष लक्ष केंद्रित करतात. अंदाजानुसार, सुमारे 650 प्रकाशवर्षांच्या परिसरात लाखो तारे आहेत आणि त्यांपैकी अनेक तार्यांभोवती जीवनास पोषक परिस्थिती असू शकते.
तार्यांची निवड करताना केवळ त्यांचे आयुष्यच नव्हे, तर त्यांच्या भोवतालचा निवासयोग्य पट्टा, ज्याला ‘गोल्डीलोक क्षेत्र’ असे म्हणतात, हा अत्यंत निर्णायक घटक ठरतो. हा असा प्रदेश असतो, जिथे तापमान ना फार जास्त, ना फार कमी असते. म्हणजेच, ग्रहाच्या पृष्ठभागावर द्रवरूप पाणी टिकून राहू शकते. पाणी हे जीवनासाठी मूलभूत माध्यम मानले जात असल्यामुळे या क्षेत्रात असलेले ग्रह विशेष लक्ष वेधून घेतात. मात्र, हा पट्टा स्थिर नसतो; तार्याच्या आकारमान, तापमान आणि प्रकाशमानावर तो अवलंबून असतो. उदाहरणार्थ, लहान आणि थंड तार्यांभोवती हा पट्टा तार्याच्या खूप जवळ असतो, तर मोठ्या आणि उष्ण तार्यांभोवती तो अधिक दूर पसरलेला असतो. अशा परिस्थितीत ग्रह तार्याच्या अगदी जवळ असल्यास तो प्रखर विकिरणामुळे उष्ण होऊ शकतो, तर खूप दूर असल्यास तो गोठून जाऊ शकतो.
याशिवाय, केवळ योग्य अंतर पुरेसे नसते; ग्रहाचे वातावरण, त्यातील वायूंचे प्रमाण, गुरुत्वाकर्षण आणि चुंबकीय क्षेत्र यांसारखे घटकही तेथे जीवन टिकू शकेल का, हे ठरवतात. उदाहरणार्थ, योग्य क्षेत्रात असलेला ग्रह जर वातावरण गमावून बसला, तर त्यावरील पाणी टिकणार नाही. काही संशोधनांनुसार, ग्रहाचा आकारही महत्त्वाचा असतो. खूप लहान ग्रहावर वातावरण टिकत नाही, तर खूप मोठा ग्रह वायुरूप बनतो. त्यामुळे वैज्ञानिक आता केवळ योग्य अंतरावरील ग्रह शोधत नाहीत, तर त्या ग्रहांचे संपूर्ण पर्यावरण, त्यांची रचना आणि तार्याशी असलेले परस्परसंबंध यांचा एकत्रित अभ्यास करत आहेत. या व्यापक दृष्टिकोनामुळे जीवनास पोषक जग शोधण्याची प्रक्रिया अधिक नेमकी आणि वैज्ञानिकदृष्ट्या समृद्ध होत आहे.
पृथ्वीवरील जीवनाचा इतिहासही या शोधासाठी महत्त्वाचा आहे. सुमारे दोन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजन वाढू लागला आणि त्यानंतर जटिल जीवन विकसित झाले. यावरून असे सूचित होते की, जीवनाला विकसित होण्यासाठी दीर्घकाळ आणि स्थिर परिस्थिती आवश्यक असते. त्यामुळे इतर ग्रहांवरही अशाच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता तपासली जाते. आधुनिक विज्ञानात आता केवळ संकेत शोधण्यावर भर न देता, ग्रहांच्या वातावरणातील रासायनिक घटकांचा अभ्यासही केला जातो. काही वायू जसे की- ऑक्सिजन, मिथेन किंवा ओझोन हे जीवनाच्या उपस्थितीचे सूचक ठरू शकतात. त्यामुळे अशा वायूंचा शोध घेणे, हे परग्रह जीवनाच्या शोधात महत्त्वाचे ठरते.
याशिवाय, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मोठ्या प्रमाणातील आकडेवारीचे विश्लेषण केले जात आहे. लाखो तार्यांच्या निरीक्षणातून मिळालेली माहिती तपासून, त्यामध्ये असामान्य नमुने शोधण्याचा प्रयत्न केला जातो. कदाचित, अशाच एखाद्या नमुन्यातून परग्रह बुद्धिमत्तेचा पहिला ठोस पुरावा मिळू शकतो. या सर्व प्रयत्नांमधून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे परग्रह बुद्धिमत्तेचा शोध हा केवळ एक वैज्ञानिक प्रयोग नाही, तर तो मानवाच्या अस्तित्वाशी संबंधित एक मोठा प्रश्न आहे. आपण या विश्वात एकटे आहोत का? की कुठेतरी दुसर्या ठिकाणीही बुद्धिमान जीवन अस्तित्वात आहे? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी विज्ञान सतत प्रयत्न करत आहे.
शेवटी, परग्रह बुद्धिमत्तेचा शोध हा केवळ कुतूहल भागवणारा प्रयत्न नसून, तो आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला अधिक सखोल करणारा आहे. विश्वाची अफाट विशालता आणि त्यातील वैविध्य आपल्याला सतत नवे प्रश्न विचारायला भाग पाडते. आज आपण ज्या पद्धतीने संकेत शोधत आहोत, त्या अपुर्या ठरू शकतात. कारण, संकेतांची रूपे आणि त्यांचे माध्यम आपल्या कल्पनेपेक्षा वेगळे असू शकते. म्हणूनच, हा शोध अधिक व्यापक, बहुविध आणि दीर्घकालीन स्वरूपाचा होत आहे. जर भविष्यात एखादा जीवनास पोषक ग्रह किंवा बुद्धिमान संस्कृतीचे ठोस संकेत सापडले, तर त्याचा परिणाम केवळ खगोलशास्त्रापुरता मर्यादित राहणार नाही. अशा शोधामुळे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांमध्ये मूलभूत बदल घडू शकतात. उदाहरणार्थ, परग्रहावरील जीवनाची रचना पृथ्वीवरील जीवनापेक्षा वेगळी असल्यास जीवनाच्या उत्पत्तीविषयीचे आपले सिद्धांत बदलावे लागतील. तसेच अशा ग्रहांच्या अभ्यासातून ऊर्जानिर्मिती, संसाधनांचा वापर आणि पर्यावरणीय संतुलन याबाबत नवे मार्ग सापडू शकतात.
जर एखादा ग्रह मानवासाठी अनुकूल परिस्थिती असलेला आढळला, तर भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी तो संभाव्य वसाहतीचा पर्याय ठरू शकतो. पृथ्वीवरील वाढती लोकसंख्या, संसाधनांची कमतरता आणि हवामानबदल यांसारख्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर अशा ग्रहांचा शोध मानवजातीच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. अशा ग्रहांपर्यंत पोहोचणे, ही सध्या तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कठीण बाब आहे. पण, संशोधनाच्या प्रगतीमुळे भविष्यात हे अशक्य राहीलच असे नाही. या सर्व शक्यतांमुळे परग्रह बुद्धिमत्तेचा शोध हा केवळ आपण एकटे आहोत का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापुरता मर्यादित राहत नाही, तर तो मानवजातीच्या भविष्याशी निगडित एक व्यापक वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञानात्मक प्रवास बनतो. म्हणूनच, हा शोध कधीच थांबणार नाही. कारण, त्यामागे विज्ञानाची जिज्ञासा आणि मानवाच्या ज्ञानलालसेची अखंड प्रेरणा कार्यरत आहे.
- सुजाता बाबर
[email protected]