पाकिस्तानची तिहेरी कोंडी आणि अस्तित्वाचे संकट

    17-May-2026   
Total Views |

गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमधील अंतर्गत सुरक्षा परिस्थिती अत्यंत गंभीर आणि गुंतागुंतीची झालेली दिसते. एकेकाळी स्वतःला इस्लामिक जगातील बलाढ्य सैन्यशक्ती समजणार्‍या पाकिस्तानसमोर आता अंतर्गत बंडखोरी, सीमावाद, आर्थिक दिवाळखोरी, धार्मिक अतिरेकी हिंसा आणि भारताविरोधातील अपयशी धोरण यांसारखी अनेक संकटे उभी ठाकली आहेत. पाकिस्तानी सैन्य आज प्रत्यक्षात ‘थ्री फ्रंट वॉर’ म्हणजे तीन वेगवेगळ्या आघाड्यांवर संघर्ष करत आहे. पाकिस्तानवरील या तिहेरी संकटाचा आढावा घेणारा हा लेख...

पहिली आघाडी म्हणजे भारत-पाकिस्तान सीमा, दुसरी आघाडी म्हणजे अफगाणिस्तान सीमेजवळील खैबर पख्तूनख्वाचा भाग आणि तिसरी आघाडी म्हणजे बलुचिस्तानमधील स्वातंत्र्यवादी व दहशतवादी चळवळी. या तिन्ही आघाड्यांवर एकाच वेळी संघर्ष करणे हे कोणत्याही देशासाठी अत्यंत कठीण असते. त्यातच जनतेचा सैन्यावरचा विश्वाससुद्धा कमी होत चालला आहे.

सौदी अरबमध्ये पाकिस्तानी सैन्याची तैनाती

सौदी अरबच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी सैन्याची मोठ्या प्रमाणावर तैनाती करण्यात आलेली आहे. विशेषतः इराणकडून होणार्‍या संभाव्य क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने 40 ते 50 हजार पाकिस्तानी सैनिक सौदी अरबमध्ये पाठवले आहेत.

पाकिस्तानला स्वतःच्या सीमांवर आणि अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणावर सैन्याची आवश्यकता असताना त्यांचे अनुभवी सैनिक परदेशात गुंतलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेचे विभाजन झाले आहे.

बलुचिस्तानमधील वाढती बंडखोरी

आज पाकिस्तानसमोरील सर्वात मोठे अंतर्गत आव्हान म्हणजे बलुचिस्तानमधील बंडखोरी. बलुच लोकांचा आरोप आहे की, पाकिस्तान सरकार त्यांच्या नैसर्गिक संपत्तीची लूट करते. पण, विकासमात्र पंजाब प्रांतात होतो. ‘चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर’ (CPEC) प्रकल्पानंतर बलुच असंतोष आणखी तीव्र झाला आहे.

‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ (बीएलए) आणि इतर सशस्त्र संघटना आता पूर्वीपेक्षा अधिक संघटित आणि आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी पाकिस्तानी सैन्य, पोलीस, गुप्तचर यंत्रणा आणि चिनी नागरिकांवर अनेक हल्ले केले आहेत. ग्वादर बंदर, रेल्वेमार्ग, लष्करीतळ आणि सरकारी इमारती सतत लक्ष्य बनत आहेत.

विशेष म्हणजे, पाकिस्तानी सैन्याला जमिनीवर उतरून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यास अनेकदा भीती वाटते. त्यामुळे पाकिस्तान प्रामुख्याने हेलिकॉप्टर, गनशिप, ड्रोन, फायटर जेट्स आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने हवाई हल्ले करत आहे. परंतु, अशा कारवायांमध्ये अनेकदा सामान्य नागरिक मारले जातात. परिणामी, बंडखोरी संपण्याऐवजी अधिक मजबूत होत आहे.

खैबर पख्तूनख्वामध्ये ‘टीटीपी’चे पुनरुज्जीवन

पाकिस्तानसमोरील दुसरे मोठे संकट म्हणजे ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (‘टीटीपी’) या संघटनेचा वाढता प्रभाव. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यानंतर आणि अफगाण तालिबानने काबुलवर सत्ता मिळवल्यानंतर ‘टीटीपी’ अधिक आक्रमक झाली आहे. आज खैबर पख्तूनख्वा आणि आदिवासी भागांमध्ये पाकिस्तानी सैन्यावर जवळजवळ रोज हल्ले होत आहेत. लष्करीतळ, पोलीस स्टेशन, चेकपोस्ट आणि सैन्याचे ताफे सतत लक्ष्य बनत आहेत.

पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का म्हणजे अफगाण तालिबान आता पाकिस्तानच्या बाजूने पूर्णपणे उभे राहत नाहीत. उलट, ‘टीटीपी’ला अफगाण भूमीवर आश्रय मिळत असल्याचा आरोप पाकिस्तान करतो. त्यामुळे पाकिस्तान-अफगाणिस्तान संबंध गंभीर तणावात आले आहेत.

पाकिस्तानी सैन्याची समस्या अशी आहे की, त्यांनीच अनेक दशकांपूर्वी जिहादी धोरण राबवले होते. भारताविरोधात आणि अफगाणिस्तानमध्ये प्रभाव वाढवण्यासाठी ज्या अतिरेकी गटांना वाढवले, तेच आता पाकिस्तानविरोधात शस्त्रे उचलत आहेत. त्यामुळे पाकिस्तान आज स्वतःच्या निर्माण केलेल्या दहशतवादाच्या जाळ्यात अडकला आहे.

भारताविरोधातील सततची शत्रुत्वाची भूमिका

पाकिस्तानी सैन्याची पारंपरिक आणि सर्वात महत्त्वाची आघाडी म्हणजे भारत. काश्मीरमध्ये हिंसाचार वाढवण्यासाठी घुसखोरी, दहशतवादी संघटनांना मदत आणि सीमावर्ती भागात संघर्षविराम उल्लंघन ही त्यांची जुनी नीती राहिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवादाचे कंबरडे मोडले आहे. सीमावर्ती भागात अत्याधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन सर्व्हेलन्स, स्मार्ट फेन्सिंग आणि जलद प्रतिसाद प्रणालीमुळे घुसखोरीचे प्रमाण कमी झाले आहे. सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट हल्ला आणि त्यानंतरची भारतीय भूमिका पाहता, पाकिस्तानला आता भारताविरोधात मोठा लष्करी संघर्ष उभा करण्याची हिंमत होत नाही.

आर्थिक संकटामुळे वाढलेले आव्हान

कोणतेही युद्ध किंवा सुरक्षा मोहीम चालवण्यासाठी मजबूत अर्थव्यवस्था आवश्यक असते. पण, पाकिस्तानची अर्थव्यवस्था आज अत्यंत कमजोर झाली आहे. प्रचंड महागाई, परकीय कर्ज, चलनाचे अवमूल्यन आणि बेरोजगारीमुळे देश संकटात आहे.

आर्थिक संकटामुळे सैन्याच्या आधुनिकीकरणावर परिणाम झाला आहे. इंधन, दारुगोळा, सुटे भाग आणि तांत्रिक उपकरणांची कमतरता निर्माण होत आहे. चीनकडून मिळणार्‍या मदतीवर पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर अवलंबून झाला आहे.

दुसरीकडे बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा आणि भारत सीमा या तिन्ही भागांमध्ये एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात ठेवणे पाकिस्तानसाठी अत्यंत खर्चिक ठरत आहे.

पाकिस्तानी सैन्याची मानसिक आणि रणनीतिक अवस्था

आज पाकिस्तानी सैन्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे ‘ओव्हर स्ट्रेच’ म्हणजेच क्षमतेपेक्षा जास्त ताण. एकाच वेळी अनेक संघर्षांमध्ये अडकलेल्या सैन्याचे मनोबल खालावू लागते. सततचे दहशतवादी हल्ले, आत्मघाती कारवाया आणि सैनिकांचे वाढते मृत्यू यामुळे मानसिक दबाव वाढत आहे.

पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणावर सामान्य लोकांनी लष्करावर थेट टीका केली. त्यामुळे सैन्याची अस्पर्शनीय प्रतिमा हादरली आहे.

पाकिस्तानला यश कितपत मिळत आहे?

जर तिन्ही आघाड्यांचा विचार केला, तर पाकिस्तानला कुठेही निर्णायक यश मिळताना दिसत नाही. बलुचिस्तानमध्ये बंडखोरी संपलेली नाही. उलट, अधिक संघटित होत आहे. Ÿखैबर पख्तूनख्वामध्ये ‘टीटीपी’ अधिक आक्रमक झाली आहे. Ÿभारताविरोधात घुसखोरी आणि दहशतवाद वाढवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात अपयशी ठरत आहेत. Ÿअफगाणिस्तानसोबतचे संबंध तणावपूर्ण आहेत. Ÿआर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. म्हणजेच, कोणत्याही समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यात त्यांना अपयश येत आहे.

पाकिस्तानी सैन्यदलाची बदलती प्राथमिकता आणि सुरक्षा आव्हाने

देशाच्या सीमांवरील वाढते धोके आणि अंतर्गत बंडाळी मोडून काढण्याऐवजी, जनरल असीम मुनीर यांचे लक्ष सध्या मुत्सद्देगिरी आणि आर्थिक फायद्यांवर अधिक केंद्रित असल्याचे चित्र आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुखांचे मुख्य कार्य देशाचे संरक्षण करणे हे असते. मात्र, जनरल मुनीर सध्या इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावात मध्यस्थ म्हणून भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत आहेत. यामागे दोन मुख्य हेतू दिसतात : जागतिक स्तरावर एक ‘शांतिदूत’ म्हणून प्रतिमा निर्माण झाल्यास पाकिस्तानला पश्चिमी देशांकडून आणि इस्लामिक जगाकडून विशेष महत्त्व मिळेल, असे त्यांना वाटते.

त्यातच पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या ‘व्हेंटिलेटर’वर आहे. ‘आयएमएफ’कडून नवीन कर्ज मिळवण्यासाठी अमेरिकेची मर्जी राखणे मुनीर यांच्यासाठी अनिवार्य झाले आहे. मात्र, या ‘डिप्लोमसी’च्या नादात लष्कराचे मुख्य कर्तव्य असलेल्या ‘राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे.

पाकिस्तानी सैन्याची पारंपरिक ओळख ‘आक्रमकता’ ही राहिली आहे. मात्र, सध्याच्या काळात लष्करी नेतृत्वाने ‘जगा आणि जगू द्या’ (Live and Let Live) असे बचावात्मक धोरण स्वीकारल्याचे दिसते. याचे परिणाम सैनिकांच्या मानसिकतेवर होत आहेत.

जेव्हा नेतृत्व सीमेपेक्षा परकीय कर्जावर अधिक चर्चा करते, तेव्हा सामान्य सैनिकाचे लढण्याचे मनोबल खचते. लष्करी अधिकारी जेव्हा व्यावसायिक करारांमध्ये आणि राजकीय तडजोडीत गुंततात, तेव्हा प्रत्यक्ष युद्धभूमीवरील सराव आणि शिस्त यावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. दहशतवादी गटांविरुद्ध कठोर कारवाई करण्याऐवजी अनेक ठिकाणी ‘तडजोड’ करण्याची वृत्ती बळावत आहे, ज्यामुळे शत्रू गटांचे धाडस वाढत आहे.

जर पाकिस्तानने आपले धोरण बदलले नाही, तर भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. आज पाकिस्तानी सैन्य अत्यंत कठीण आणि अभूतपूर्व परिस्थितीतून जात आहे. भारत सीमा, अफगाण सीमा आणि अंतर्गत दहशतवाद या तिन्ही आघाड्यांवर ते एकाच वेळी संघर्ष करत आहे. परंतु, या संघर्षांमध्ये त्यांना निर्णायक यश मिळत नाही. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे पाकिस्तानने अनेक दशकांपासून चुकीची सुरक्षानीती स्वीकारली. दहशतवादाला परराष्ट्र धोरणाचे साधन म्हणून वापरण्याचा प्रयत्न अखेरीस पाकिस्तानलाच महागात पडला आहे. आज पाकिस्तानसमोर केवळ लष्करी नव्हे; तर राजकीय, आर्थिक आणि सामाजिक अस्तित्वाचे संकट उभे ठाकले आहे. जर पाकिस्तानने अतिरेकी धोरण सोडून आर्थिक विकास, लोकशाही स्थैर्य आणि शेजार्‍यांशी शांततापूर्ण संबंध यावर भर दिला नाही; तर भविष्यात त्यांच्यासमोरील सुरक्षा आव्हाने आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाकिस्तानातील हिंसाचाराची वाढती आकडेवारी

वर्ष एकूण मृत्यू ठार झालेले पाकिस्तानी सैनिक ठार झालेले नागरिक ठार झालेले दहशतवादी





हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.