मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट येथे एका 13 वर्षांच्या गतिमंद बालिकेवर 35 वर्षांच्या नफीस ऊर्फ सलमानने अत्याचार केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. पीडित बालिकेला सरकारी अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे सांगण्यासाठी पीडितेच्या आईला भेट दिली. त्यानिमित्ताने पीडितेच्या कुटुंबीयांशी संवाद साधल्यानंतर समोर आलेले वास्तव मांडणारा हा लेख...
पार्कसाईट विभागातील हिंदुत्ववादी कार्यकर्ता संदीप त्रिपाठी, नीरज उपाध्याय, शिवगोविंद यादव, जयेंद्र जाधव यांच्यासोबत मी आणि सामाजिक कार्यकर्त्या ज्योती साठे त्या पीडित मुलीच्या घरी गेलो. सेवावस्तीतले डोंगराच्या चढावर असलेले ते छोटेसे घर. घरात तथागत गौतम बुद्धांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लावले होते. पीडितेच्या आईला ‘जय भीम’ करत तिला येण्याचे प्रयोजन सांगितले. ती म्हणाली, “आधी माझी मुलगी ठीक होऊ दे. मी त्यात बिझी आहे. घरात धावपळ करणारं कुणी नाही. मुलीसोबत असं झालं, आता कसं होणार? आम्ही गरीब आहोत; पण इज्जतदार आहोत. आता कसं होणार, इज्जत गेली.” मी आणि ज्योती म्हणालो, “तुमची मुलगी पवित्र आहे, इज्जत अशा गोष्टीमध्ये संपून जाते आणि मग आयुष्यात काहीच राहत नाही, हा विचार मनातून काढून टाका. इज्जत आपली नाही, तर त्या राक्षसाची गेली.” ती आमच्याकडे पाहू लागली; म्हणाली, “ताई, तुम्ही बोललात, बरं वाटलं. तुम्हाला जी कागदपत्रं पाहिजेत, ती माझ्या भावाकडं हाईत. त्याच्याकडून घेऊन देते.”
ती महिला आता आमच्याशी संवाद साधू लागली. त्यातून गुन्ह्याबद्दल माहिती मिळाली ती अशी- महिलेला तीन मुली. घरात गरिबीचा सुकाळ. मुलींच्या शिक्षणासाठी ही महिला सकाळी घरकाम करण्यासाठी बाहेर जायची, ते रात्री घरी यायची. तिची दुसरी मुलगी थोडी गतिमंद. महिलेला मुलीचे मतिमंद दर्शवणारे प्रमाणपत्र काढायचे होते. पण, त्यासाठी काय करावे लागते, हे तिला माहिती नव्हते. तसेच तिच्याकडे धावपळीसाठी वेळ नव्हता आणि रजा काढून धावपळ करावे, तर पैसे कापले जाणार. पुन्हा घरी सगळीच आबाळ होणार. त्यामुळे तिला प्रमाणपत्र काढायचे जमत नव्हते. ही मुलगी आठवीपर्यंत शाळा शिकली. पण, नववी इयत्तेत तिला शिकणे अवघड झाले, म्हणून ती घरी राहू लागली. कुणीही काही काम सांगितले की, ते ती करत असे. मात्र, तिची तब्येत अचानक खालावली. तिला उलट्या-जुलाब व्हायला लागले, म्हणून त्या महिलेने त्या रात्री दवाखान्यात नेले. तेव्हा तिला कळले की, मुलीसोबत अघटित घडले आहे. पुढील कारवाईसाठी तिला सरकारी दवाखान्यात नेण्यात आले, पोलीस चौकशी झाली. त्यातून कळले की, जवळच बेकरी होती. अनेकदा ती पाव आणण्यासाठी बेकरीत जात असे. बेकरीत काम करणार्या नफीज ऊर्फ सलमान या नराधमाची नजर तिच्यावर पडली. एकेदिवशी त्याने तिला जबरदस्तीने ओढत नेले. तिने आरडाओरडा केला. पण, तेव्हा तिथे मदतीसाठी कुणीच नव्हते. ‘कुणाला सांगितलेस तर नाल्यात फेकेन,’ अशी भीती त्याने दाखवली. त्यामुळे तिने कुणालाही सांगितले नाही.
असो. पीडितेच्या आईशी बोलत असतानाच, तीन वर्षांपूर्वी घडलेली घटना आठवली. बौद्ध समाजाचे ते कुटुंब अत्यंत कष्टाळू होते. ते रस्त्यावर प्लास्टिकच्या वस्तूंची विक्री करायचे. त्यांच्यासोबत त्यांची मतिमंद असलेली अल्पवयीन भाचीही राहायची. तिचे आई-बाबा वारले होते, म्हणून मामाने तिला त्याच्याकडे आणले होते. ती मुलगी गरोदर राहिली. सरकारी डॉक्टरांनी तिची तपासणी केली. तिच्यासोबत अनेकांनी, अनेकवेळा अत्याचार केला, असे डॉक्टरांचे म्हणणे. स्थानिक हिंदुत्ववादी महिला कार्यकर्त्या नीलम पांडे आणि संदीप त्रिपाठी यांनी मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नातून पोलीस तपासाला वेग मिळाला आणि निष्पन्न झाले की, परिसरातील दोन रिक्षावाले, एक वृद्ध भाजीविक्रेता आणि टेलर मामू हे चौघे तिचे शोषण करत होते. चौघांना सजा झाली. त्या घटनेत पुढे काय झाले? हे विचारल्यावर मागे एका कार्यकर्त्याने सांगितले की, “काही महिन्यांपूर्वी चौघेही बेलवर सुटले. रिक्षावाले रिक्षा चालवत आहेत. वृद्ध भाजीविक्रेता गावी निघून गेला आणि टेलर मामूच्या दुकानात परिसरातल्या हिंदू आयाबाया अजूनही ब्लाऊज शिवायला जातात!” तर नातीसोबत घडलेल्या घटनेच्या धक्क्याने तिची आजी वारली. त्या अल्पवयीन मुलीला समुपदेशन आणि इतर कार्यवाहीसाठी दीड वर्षे बालगृहात राहावे लागले. ती आता घरी आली आहे. आपल्यासोबत काय घडले, याचे तिला भानही नाही! त्या मुलीचे पुढे काय?
मनात हे विचार येत असतानाच, आम्ही जिथे बसलो होतो, तेथे 10-15 जणांचा घोळका आला. त्यातली एक धम्मभगिनी म्हणाली, “ही घटना घडली, तर आम्हाला सांगायचं ना? बाहेरून कळलं की, आपल्या पोरीबरोबर असं घडलं. त्याच वेळी सांगितलं असतं तर अख्खा पार्कसाईटला कळलं असतं की, आमच्या लेकीबरोबर असं करणार्याची काय गत होते ते!” तिचे म्हणणे तोडत एकजण म्हणाला, “आपल्या लेकीसाठी दुसरं कोण पुढं येणार? मोठ्या घरची पोर असती, तर एव्हाना आंदोलन-मोर्चे काढले असते. मीडियामध्ये हंगामा झाला असता.” समाजाच्या बालिकेवर नफीज ऊर्फ सलमानने अत्याचार केला होता. मात्र, इथे ‘मागासवर्गीय’ आणि ‘उच्चवर्णीय’ अशी भाषा सुरू होणार होती. त्यामुळे मी म्हणाले, “लेक कुणाचीही असो, तिच्यावर अत्याचार झाला, तर सगळा समाज एकवटतो. मुलीला न्याय मिळावा म्हणून माझ्यासोबत त्रिपाठी, पांडे आणि यादव आणि जाधव असे स्थानिक चौघे कार्यकर्ते आले. ते जातीचे आहेत का? प्रश्न जातीचा नाही, प्रश्न बालिकेवर झालेल्या अत्याचाराचा आहे. ज्यांचे मन या अत्याचाराविरोधात पेटले आहे, त्या सर्वांनी मुलीला न्याय मिळवण्यासाठी एकत्र यायला हवे.” यावर, त्या समुदायाचे नेतृत्व करणारी व्यक्ती म्हणाली, “बरोबर, अशा वेळी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन घटनेचा पाठपुरावा करू. काय मदत लागेल ती करू. ‘एफआयआर’मध्ये कोणती कलमे आहेत, दवाखान्याचा अहवाल काय आहे हे बघू. मग पुढचे नियोजन करू. प्रश्न आपल्या पोरीचा आहे. समजुतीने आणि एकजुटीने अत्याचाराविरोधात उभे राहायला हवे.” ते सगळेजण तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे होते. त्यांची एकजूट खरेच आश्वासक वाटली. समाजातल्या मुलीसोबत जे घडले, त्याविरोधात त्यांचे दु:ख आणि संताप खरा होता. त्यात कोणतेही राजकारण किंवा चमकोगिरी नव्हती. त्यावेळी वाटले की, खरेच बाबासाहेबांनी समाजाला काय दिले; तर ही दु:खात एकत्र आणणारी एकी दिली आणि अत्याचाराविरोधात पेटून उठण्याची धमक दिली. त्या सगळ्यांशी चर्चा करून बाहेर पडले, तर काही लोकांनी भीती व्यक्त केली की, “समाज न्यायासाठी पुढे येईल. हिंदुत्ववादी विचाराचे लोक साथ देतील. पण, त्या नफीजला वाचवण्यासाठी काही लोक पडद्यामागून हालचाली करतील. दबाव आणतील.” कसे काय? असा प्रश्न विचारल्यावर कुणी उत्तर दिले नाही. मात्र, त्या गजबजलेल्या परिसराचा नगरसेवक कोण आहे, हे विचारल्यावर ते म्हणाले, “उबाठा पक्षाच्या सकिना शेख!”
अर्थात, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सज्जनशक्ती एकवटली, तर गुन्हेगार कधीच सुटू शकत नाही. यावरून एक मात्र वाटते की, आता तरी समाजाने डोळे उघडायलाच हवेत! जसे इथे बेकरी होती, त्या बेकरीत काम करणारे कोण आहेत? याचा मागमूस त्या बेकरीतून पाव विकत घेणार्या लोकांना होता. बेकरी/बिर्याणी, आपण कुणाकडून खाद्यपदार्थ/वस्तू खरेदी करतो? अल्पवयीन बालक-बालकांना एकट्यांना वस्तू खरेदी करण्यासाठी पाठवायचे का? आपल्या आजूबाजूला भाडेकरू किंवा कंत्राटी कामगार किंवा फेरीवाले असतील, तर त्यांचे पोलीस ‘व्हेरीफिकेशन’ झालेले असते का? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, पाल्य गतिमंद असेल, तर त्याची काळजी जास्त घ्यावी लागते. दुर्दैवाने समाजात असे नराधम पैदा झालेत की, त्यांना दयामाया, माणुसकी उरली नाही. त्यामुळे काळजी घेण्यासारख्या छोट्याछोट्या गोष्टी आहेत. त्या केल्याच पाहिजेत. यामुळे अनेक अघटित घटना थांबू शकतात. आधी नसरापूर आणि आता पार्कसाईट प्रकरण. त्यामुळे आता तरी डोळे उघडायला हवेत!
9594969638