स्मार्टफोनचं ‘डिजिटल युग’ कोसळण्यापूर्वी संवाद साधण्यासाठी माणसं एकमेकांना पत्र लिहायची. या पत्रांचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे टपाल तिकिटं. पत्रांप्रमाणेच काळाच्या ओघात या टपाल तिकिटांनी स्वतंत्र प्रवास केला, स्थित्यंतरं अनुभवली. मात्र, याच टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय इतिहासाचं एक आगळंवेगळं दर्शनसुद्धा आपल्याला घडतं. याच भारतीय इतिहासाचं दर्शन आपल्या लेखणीतून साकारणारे इतिहास अभ्यासक कौस्तुभ मुद्गल यांच्या 'indoloy through philately' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नुकताच पुणे येथे संपन्न झाला. त्यानिमित्ताने पुस्तकाचे लेखक कौस्तुभ मुद्गल यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...
‘Indology through philately’ या पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास कसा होता? आपल्याला हे पुस्तक का लिहावसं वाटलं?
मी 2015 साली ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’त ‘इंडोलॉजी’ म्हणजे ‘भारतविद्या’ या विषयावरील ‘एमए’साठी प्रवेश घेतला. याचदरम्यान, आमचे मित्र डॉ. अजित वर्तक यांनी मला ‘फिलॅटली’ या विषयाची ओळख करून दिली. याचदरम्यान, ‘Phila India’ हे पुस्तक माझ्या हातात पडलं. या पुस्तकात ब्रिटिश कालखंड, तसेच स्वातंत्र्यानंतर भारतीय टपाल खात्याने वितरित केलेल्या सर्व तिकिटांची माहिती दिलेली आहे. दरवर्षी हे पुस्तक प्रकाशित होतं व त्यात नवीन तिकिटांची भर पडते. आतापर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर टपाल खात्याने काढलेली तिकिटं बघताना मला या तिकिटांवरून ‘इंडोलॉजी’ याविषयी लिहिता येईल, हे जाणवले. मग 2016 साली ऑगस्टमध्ये मी माझा 'Indology through Philately' हा मराठी ब्लॉग चालू केला. त्या ब्लॉगवर आतापर्यंत 200हून अधिक लेख लिहिले आहेत. एकदा वर्तक सरांशी बोलताना याचं पुस्तक करण्याविषयी आमची चर्चा झाली. हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून आम्ही ते इंग्रजीत करण्याचा निर्णय घेतला. माझ्या ब्लॉगवरील मराठीतील लेख इंग्रजीत भाषांतरित केले. आता प्रकाशित होणारं पुस्तक हा पहिला खंड आहे. दुसर्या खंडाचं निम्मं काम झालं आहे. लवकरच तो खंडही प्रकाशित केला जाईल.
भारतामध्ये ‘पोस्टल स्टॅम्प’ तिकिटं कधीपासून सुरू झाली, त्याचा इतिहास काय?
भारतामध्ये ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने 1837 साली टपालसेवा चालू केली. त्याआधी जगात पहिल्यांदा टपालसेवेचा प्रारंभ आणि टपाल तिकिटाचा उगम याचा इतिहास अतिशय रंजक आहे. जगात पहिल्यांदा टपालसेवा 1635 साली ब्रिटनमध्ये सर्वसामान्य लोकांसाठी चालू करण्यात आली. त्याआधी ती राजे-रजवाडे व श्रीमंत व्यक्तींसाठी मर्यादित होती. ही सर्वसामान्यांसाठी सेवा जेव्हा चालू झाली, तेव्हा टपाल पाठवणार्याने ते टपाल ‘पोस्टा’त नेऊन द्यायचे व ते टपाल ज्याला पाठविलं असेल, त्याला वितरित झालं की, त्याने त्या टपालाचे पैसे द्यायचे, अशी ही सेवा होती. अगदी आजच्या भाषेत सांगायचं तर ही सेवा पोस्ट-पेड होती. पण, यामुळे अनेक समस्या येऊ लागल्या. ज्याच्या नावाने टपाल पाठवलं जाई, तो ते टपाल उघडून वाचायचा व ते ताब्यात घेण्यास आणि त्या टपालाचा खर्च देण्यास नकार द्यायचा. यामुळे टपाल खात्याला नाहक भुर्दंड सोसावा लागे. मग यावर उपाय म्हणून सर रोलँड हिल यांनी टपाल तिकिटाची संकल्पना मांडली. टपालावर पोस्टातून विकत घेतलेली तिकिटं लावायची आणि अशा तिकिटं लावलेल्या टपालाचं वितरण करायचं. म्हणजे ही सेवा आता प्रीपेड झाली. जगातील पहिले टपाल तिकीट हे ‘ब्लॅक पेनी’ या नावाने ओळखलं जातं. त्याकाळी कागदाच्या मोठ्या तावावर ही तिकिटं छापली जात. आजच्या तिकिटांना फाडण्यासाठी जसं ‘परफोरेशन’ असतं, तसं या तिकिटांना नसे. मग ही तिकिटं कात्रीने कापून ग्राहकांना दिली जात. भारतातील पहिलं टपाल तिकीट हे ‘सिंध डाक’ या नावाने ओळखलं जातं.
‘फिलॅटली’ या विद्या शाखेचे महत्त्व काय?
‘फिलॅटली’ याविषयी लोकांना फारशी माहिती नाही. ‘फिलॅटली’ म्हणजे टपाल खात्यातर्फे वितरित केली जाणारी टपाल तिकिटं, स्पेशल कव्हर्स आणि वेगवेगळी माहितीपत्रकं यांचा संग्रह करणं, असा आपला समज असतो. परंतु, हे एवढ्यापुरतं मर्यादित नाही. संग्रह करण्याबरोबरच या टपाल तिकिटांचा व या तिकिटांवरून अभ्यास करणं अपेक्षित असतं. आज अनेक पाश्चात्त्य देशांमध्ये ‘फिलॅटली’चा उपयोग अनेक शिक्षण शाखांमध्ये केला जातो. इतिहास आणि देशाची संस्कृती, भूगोल, नकाशाशास्त्र, कला, साहित्य, विज्ञान व तंत्रज्ञान असे अनेक विषय टपाल तिकिटांवरून शिकवता येतात. टपाल तिकिटं जमविण्याच्या छंदाबरोबरच शिक्षण हा यामागे विचार आहे. आपल्या देशाच्या टपाल खात्याने विविध विषयांवरची टपाल तिकिटं काढली आहेत. मात्र, आपल्या देशात संग्रह करणं, याव्यतिरिक्त ‘फिलॅटली’विषयी वेगळा विचार केला जात नाही. टपाल तिकिटं ही आपल्या देशाचे खरंतर राजदूतच आहेत. आपली संस्कृती, वारसा, महान व्यक्ती अशा अनेक विषयांची माहिती इतर देशांमध्ये पोहोचविण्याचं कामही टपाल तिकिटं करतात. आपल्या देशाच्या टपाल खात्यातर्फे ‘फिलॅटली’चा प्रचार व प्रसार करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘दीनदयाळ स्पर्श योजना’सारख्या योजना राबविल्या जातात. या योजनेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना ‘फिलॅटली’साठी शिष्यवृत्ती दिली जाते.
आपल्या पुस्तकनिर्मितीच्या प्रवासामध्ये आपल्याला ‘पोस्टल स्टॅम्प’विषयी कुठल्या नवीन गोष्टींचा शोध लागला?
आम्ही आमच्या ‘इंडोलॉजी’च्या कोर्समध्ये जो इतिहास शिकलो, त्यातील मोठा भाग हा उत्तर भारतातील इतिहासावरचा होता. याच कालखंडात दक्षिण भारतातील संगम कालखंड, तेथील कवी व त्यांनी रचलेली काव्य याबद्दल फारशी माहिती नव्हती. आमच्या कोर्सच्या कालावधीमध्ये इतका विस्तृत इतिहासाचा अंतर्भाव करणेही अशक्य आहे. टपाल तिकिटांमुळे मला थिरुवल्लूवर आणि कंबर या दोन महान तामिळ कवींची ओळख झाली. तसेच ‘इंडोलॉजी’ या विषयात संशोधन करणारे फादर हेन्री हेरास, केंटिश कुमारस्वामी यांचीही ओळख झाली. यामुळे या इतिहासाच्या कालखंडाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. याचबरोबर प्राचीन काळातील व्यापारी संस्था, व्यापारी मार्ग, रेशीम मार्ग, न्यायव्यवस्था, शेती या विषयांवरही सध्या प्रचलित असलेल्या टपाल तिकिटांवरून लिहिता आलं.
काही ‘पोस्टल स्टॅम्प’ अत्यंत स्वस्तात सर्वत्र उपलब्ध असतात, तर काहींची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असते, हा फरक कशामुळे?
नवीन छापली गेलेली टपाल तिकिटांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. काही काळानंतर ही तिकिटं दुर्मीळ होऊ लागतात व त्यांची किंमत वाढते. उदाहरणच द्यायचं झालं, तर भारतीय टपाल खात्याने काढलेला पहिला 17 तिकिटांचा पुरातत्वीय संच 1949 साली वितरित केला. त्या संचाची त्यावेळी किंमत तीन-पाच रुपये होती. आज हा संच अत्यंत दुर्मीळ झाला आहे. आज या संचाची किंमत सुमारे 11 हजार रुपये एवढी आहे.
ब्रिटिश काळातील तिकिटे आणि स्वतंत्र भारताची तिकिटे यांच्या रचनेत कोणता मोठा फरक जाणवतो?
ब्रिटिश काळात टपाल खात्याने वितरित केलेल्या तिकिटांवर व्हिक्टोरिया राणी, पंचम जॉर्ज, किंग एडवर्ड यांची चित्रं होती. ब्रिटिश कालखंडातील तिकिटांमध्ये फारशी विविधता दिसत नाही. मात्र, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर वितरित झालेल्या तिकिटांमध्ये खूपच विविधता आढळते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर छापलेल्या पहिल्या तिकिटावर अशोकाच्या चार सिंहांचे चिन्ह होतं. त्यानंतर टपाल खात्याने तिकिटांवरती अनेक विषय हाताळले आहेत. आपली संस्कृती, वारसा, महनीय व्यक्ती, भारतातील महत्त्वाच्या संस्था अशा अनेक विषयांवरती तिकिटं काढली. प्रारंभीची तिकिटं ही एका रंगात छापलेली आहेत. त्यानंतर अनेक रंगातील आकर्षक तिकिटं टपाल खात्याने काढली. दि. 13 डिसेंबर 2006 साली एक चंदनातील कोरलेल्या हत्तीचं चित्र असलेलं तिकीट टपाल खात्याने काढलं. या तिकिटाला चंदनाचा वास होता. तसेच फेब्रुवारी 2007 साली काढलेल्या गुलाबावरील चार तिकिटांच्या संचालाही गुलाबाचा सुगंध होता. अशा अनेक सर्जनशील कल्पना वापरून टपाल खात्याने तिकिटं वितरित केली आहेत.
‘डिजिटल’ आणि ’एआय’च्या युगात ‘पोस्टल स्टॅम्प’चे भविष्य काय, आपल्याला काय वाटतं?
आज आपण ‘डिजिटल’ कालखंडात आहोत. ईमेल, व्हॉट्सअॅपच्या या जमान्यात पोस्टाने टपाल पाठवणं हे पूर्णतः बंद झालं आहे. त्यामुळे टपाल तिकिटांचं या ‘डिजिटल युगा’त काय काम? असा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. पण, आजही जगभरातील अनेक देश विविध विषयांवरची नवनवीन टपाल तिकिटं वितरित करतात. टपाल तिकिटांच्या संग्राहकांमध्ये या तिकिटांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. आज टपाल तिकिटांच्या खरेदी-विक्रीची जगभरातील उलाढाल ही सुमारे 71 हजार कोटी रुपये इतकी आहे आणि दरवर्षी ही उलाढाल वाढतच आहे.
9967826983